सांस्कृतिक निर्वसाहतीकरणाचे प्रतीक म्हणजे अबु धाबी येथील हिंदु मंदिर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच संयुक्त अरब अमिराती (यूएई)मधील अत्यंत महत्त्वाचे शहर असणार्‍या अबु धाबी आणि दुबई या महामार्गावर ‘बी.ए.पी.एस्.’कडून बांधण्यात आलेल्या भव्य हिंदु मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी जगभरातून सहस्रो भाविक उपस्थित होते. या सोहळ्याकडे केवळ विदेशात बांधण्यात आलेल्या एका मंदिराचा उद्घाटन समारंभ एवढ्या संकुचित दृष्टीकोनातून पहाता येणार नाही, तसेच या मंदिरामुळे भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील संबंध घनिष्ट होणार आहेत, दोन्ही देशांतील व्यापारउदीम वाढण्यास साहाय्य होणार आहे, केवळ याही अर्थाने याकडे पहाता येणार नाही, तर या मंदिराच्या संपूर्ण उपक्रमाकडे अत्यंत व्यापक अशा सांस्कृतिक आणि संकल्पनात्मक दृष्टीकोनातून पहाणे आवश्यक आहे. अबू मुरीकाह जिल्ह्यात स्थित ही भव्य रचना भारत आणि यूएई यांच्यातील अतूट मैत्रीचा पुरावा तर आहेच; पण त्यासह बहुसांस्कृतिकतावाद, सांस्कृतिक सौहार्द आणि सहकार्याची भावना यांचे प्रतीक आहे.

वाळवंटात बांधण्यात आलेले आणि पश्‍चिम आशियातील सर्वांत मोठे ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिर’ !

१. ‘बी.ए.पी.एस्.’ मंदिराची वैशिष्ट्ये !

इस्लामी देशांमध्ये आजघडीला हिंदु मंदिरे नाहीत, अशी स्थिती नाही. यूएईमधील दुबईमध्येच ४ ते ५ हिंदु मंदिरे आहेत. अन्य देशांमध्येही काही हिंदु मंदिरे आहेत. अशा स्थितीत या मंदिराचे महत्त्व का ? याचे कारण संयुक्त अरब अमिरातीसारख्या सौदी अरेबियाचा अत्यंत जवळचा मित्र असणार्‍या देशाकडे संपूर्ण इस्लामी जगताचे नेतृत्व करणारा देश म्हणून पाहिले जाते. अशा देशाने भारताला एक हिंदु मंदिर उभे करण्यासाठी २७ एकर जागा देऊ केली आणि या जागेमध्ये भव्य दिव्य असा मंदिराचा प्रकल्प उभारण्यात आला. हे मंदिर गुलाबी राजस्थानी वाळूचा खडक आणि पांढर्‍या इटालियन संगमरवरी दगडापासून बनवलेले आहे. हे दगड भारतात कोरलेले असून त्यानंतर ते मंदिराच्या बांधकामासाठी यूएईमध्ये नेण्यात आले. अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स (राजा) शेख महंमद बिन झायेद अल नाहयान यांनी वर्ष २०१५ मध्ये पंतप्रधान मोदींच्या दौर्‍याच्या वेळी मंदिराच्या बांधकामासाठी १३.५ एकर भूमी दान केली होती. यानंतर जानेवारी २०१९ मध्ये मंदिरासाठी आणखी १३.५ एकर भूमी दान केली. अशा प्रकारे एकूण २७ एकर भूमीवर हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात विविध देवतांची तीर्थक्षेत्रे असून भारताच्या उत्तर, पूर्व, पश्चिम आणि दक्षिण भागांतील विविध देवतांना समर्पित प्रत्येकी एकूण ७ मंदिरे आहेत. यामध्ये श्रीराम आणि सीता, जगन्नाथ, श्री अक्षर पुरुषोत्तम महाराज, तिरुपति बालाजी आणि अय्यप्पा यांचा समावेश आहे. एका इस्लामी देशामध्ये हिंदु मंदिरासाठी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी संपूर्ण प्रकारचे शासकीय साहाय्य देणे यांकडे बहुसांस्कृतिकतावादाच्या दृष्टीकोनातून पहावे लागेल.

२. पंतप्रधान मोदी यांच्याकडून ‘सांस्कृतिक निर्वसाहतीकरणा’चा प्रयत्न !

पंतप्रधान मोदी आणि क्राऊन प्रिन्स (राजा) शेख महंमद बिन झायेद अल नाहयान यांची  भेट

भारत सातत्याने या बहुसांस्कृतिकतावादाचा आग्रह धरत आला आहे; पण अलीकडच्या काळात इस्लामी देशांची यासंदर्भातील भूमिका सकारात्मक होतांना दिसत आहे. विशेष म्हणजे भारत आणि इस्लामी जग या दोघांनाही पश्चिमी देश अन् संस्कृती यांकडून अनेक प्रकारच्या नकारात्मक अनुभवांचा सामना करावा लागला आहे. पश्चिमी देश आणि संस्कृती यांचे प्राबल्य, प्रभाव, त्यांच्या संस्कृतीचे श्रेष्ठत्व जगावर लादण्यासाठी गेल्या काही शतकांपासून केले गेलेले जाणीवपूर्वक प्रयत्न भारतासह इस्लामी देशही पहात आले आहेत. ‘केवळ पश्चिमी तत्त्वज्ञान, संस्कृती, धार्मिक मूल्येच कशी श्रेष्ठ आहेत ? आणि अन्य धर्म, धर्मीय, त्यांचे धार्मिक तत्त्वज्ञान दुय्यम आहे’, अशा प्रकारची धार्मिक अन् सांस्कृतिक वसाहतवादाची मांडणी करून मोठ्या प्रमाणावर आशियातील लोकसमूहांची मानसिकता पालटण्याचा प्रयत्न गेल्या अनेक शतकांपासून झाला. या वसाहतवादी गुलामगिरीच्या मानसिकतेतून संपूर्ण आशिया खंडाला किंवा दक्षिणेकडच्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आशियातील काही मोजक्या नेत्यांकडून केला जात आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांचे नाव अग्रस्थानी आहे. पंतप्रधान मोदी यांचा प्रयत्न हा प्रामुख्याने ‘सांस्कृतिक निर्वसाहतीकरणा’चा आहे. याला ‘कल्चरल डीकोलनायजेशन’ म्हटले जाते. पश्चिमी देशांचा दरारा, दबाव, पगडा दूर करून, त्यातून बाहेर पडून आशियाची संस्कृती आणि धर्माचे विशेष करून हिंदु धर्माचे महत्त्व जगाला पटवून देण्याचे प्रयत्न अत्यंत गांभीर्याने पंतप्रधान मोदींकडून केले जात आहेत. त्याला सकारात्मक साद इस्लामी जगताकडून मिळत आहे, हे उल्लेखनीय म्हणावे लागेल.

३. इस्लामी देशांच्या मानसिकतेत पालट होण्यामागील कारणे !

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

यामागचे कारण म्हणजे इस्लामी जगताच्या एकंदरीतच मानसिकतेमध्ये आता परिवर्तन होत आहे. इस्लामी जग हे आता भारताकडे केवळ ‘हिंदु देश’ म्हणून पहात नाही. किंबहुना पाकिस्तानच्या अपप्रचारामुळे अनेक इस्लामी देशांची अशी मानसिकता सिद्ध झाली होती की, भारतामध्ये अल्पसंख्यांक मुसलमान समुदायावर अनन्वित अत्याचार केले जातात; पण आता ती पालटत चालली आहे, तसेच तेलाच्या अर्थकारणापलीकडे जाऊन हे देश आता आर्थिक विकासात्मक गोष्टींकडे वळत आहेत. इस्लामी देशांच्या मानसिकतेत पालट होण्यामागे २ कारणे आहेत.

अ. एक म्हणजे पश्चिमी देश सातत्याने इस्लामी जगतात हस्तक्षेप करत आहे. नेपोलियन बोनापार्टपासून अलीकडे अमेरिकेपर्यंत सातत्याने इस्लामी जगतामध्ये हस्तक्षेपवादी भूमिका पश्चिमी जगताने घेतली आहे. त्याला अत्यंत कठोर प्रतिक्रिया इस्लामी जगताने दिली आहे. ‘पश्चिमी संस्कृती श्रेष्ठ आहे’, असे सांगत ती लादण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न झाला आणि इस्लामी देशांच्या अंतर्गत कारभारामध्ये, धार्मिक कार्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न जेव्हा झाला, तेव्हा इस्लामी जगताने कडाडून त्याला विरोध केला. नेपोलियन बोनापार्टपासून इराकमध्ये अमेरिकेने केलेल्या हस्तक्षेपापर्यंतचा काळ इस्लामी जगत कदापि विसरू शकणार नाही.

आ. दुसरी गोष्ट म्हणजे इस्रायलला समर्थन देऊन किंवा त्यांना पश्चिम आशियामध्ये वसवून अमेरिकादी पश्चिमी राष्ट्रांनी ज्या प्रकारे ध्रुवीकरणाच्या राजकारणाला खतपाणी घातले आणि इस्लामी जगतामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, त्याचाही राग या देशांमध्ये आहे.

असे असतांना तिसरीकडे भारताविरोधात कितीही कांगावा केला जात असला, तरी काही गोष्टी नाकारता येण्याजोग्या नाहीत. उदाहरणार्थ भारतामध्ये मुसलमानांची लोकसंख्या वाढत चालली आहे. वर्ष २०११ मध्ये झालेल्या शेवटच्या जनगणनेनुसार भारतात मुसलमानांची संख्या १४ टक्क्यांनी वाढली आहे. भारतात जर अल्पसंख्यांकांसाठी असुरक्षित वातावरण असते, तर मुसलमानांची संख्या इतकी वाढली नसती. इस्लामी जगतात पश्चिमी देशांचा प्रचंड हस्तक्षेप होत असल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत, याची जाणीव त्यांना झाली आहे. त्यामुळे भारताची आर्थिक आणि सांस्कृतिक भूमिका यांविषयी इस्लामी जग आता गांभीर्याने विचार करू लागले आहे.

४. मंदिराच्या माध्यमातून इस्लामी जगताला भारतीय संस्कृतीची ओळख !

अबु धाबीमधील मंदिर हे बहुसांस्कृतिकतावादाचे प्रतीक आहे. दोन विचारसरणी एकत्र नांदू शकतात, हे इस्लामी जगताला दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. या मंदिराची रचनाही त्या दृष्टीने करण्यात आली आहे. अनेक धर्मियांची प्रतिके त्यामध्ये आहेत. त्यामुळे ‘भारताची हिंदु संस्कृती किती उदार आहे, ‘वसुधैव कुटुम्बकम्’, (संपूर्ण पृथ्वी ही कुटुंब आहे) ही भारतीय मूल्यांवर आधारलेली विचारसरणी किती व्यापक आहे आणि ती कशा पद्धतीने इतर धर्मियांना स्वीकारणारी आहे, ती कशी बहुसांस्कृतिकतावादावर आधारलेली आहे’, हा संदेश जगाला देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. आज भारत ज्या ‘ग्लोबल साऊथ’चे (पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात स्थित देशांचा समूह) प्रतिनिधीत्व करत आहे, ते केवळ आर्थिक स्वरूपाचे नसून ते धार्मिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचेही आहे, हे यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे ७०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले; म्हणून या मंदिराकडे पाहून चालणार नाही. हे मंदिर भारत आणि इस्लामी जगतामधील पालटत्या मानसिकतेचे प्रतीक म्हणून पहावे लागेल. दोन्ही देशांना अत्यंत जवळ आणणारे हे मंदिर आहे; कारण खर्‍या अर्थाने आता भारतीय संस्कृतीची ओळख आता इस्लामी जगताला होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक असे हिंदू आहेत की, जे हिंदूंच्या सांस्कृतिक आधाराला जगामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करत नाहीत, तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्थात्मक संरचना उभ्या करत आहेत. अशा स्वरूपाची अनेक मंदिरे येत्या काळात इस्लामी देशांमध्ये उभी राहिल्यास नवल वाटता कामा नये.

– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक (२६.२.२०२४)

(डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या फेसबुकवरून साभार)

संपादकीय भूमिका 

अबु धाबीमध्ये हिंदु मंदिर उभारले जाणे, म्हणजे भारताच्या ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भारतीय मूल्याची विश्वात जोपासना करणे होय !