Railway Facial Recognition Cameras : रेल्वेच्या ४४ सहस्र डब्यांच्या दरवाजांवर लावणार चेहरा ओळखणारे कॅमेरे !

कृत्रिम बुद्धीमत्तेच्या उपयोगातून गुन्हेगारीवर आळा घालण्याचा रेल्वे विभागाचा प्रयत्न !

नवी देहली – विमानतळांप्रमाणे आता देशातील रेल्वेगाड्यांची सेवाही अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न चालू झाला आहे. विशेष म्हणजे येथे कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केला जाणार आहे. रेल्वे विभागाने ४४ सहस्र डब्यांवर चेहरा ओळखणारे ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्यासाठी निविदा काढली आहे. यातून ट्रेनमधील गुन्हेगारीला आळा बसेल. ‘फेस रिकग्निशन कॅमेर्‍यां’त टिपलेली प्रतिमा गुन्हेगारांच्या ‘डेटाबेस’शी जोडून कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे त्यांची ओळख पटवण्यात येईल. त्यामुळे वारंवार गुन्हे करणार्‍यांना पकडण्यात साहाय्य होणार आहे. मध्य, पश्‍चिम आणि पूर्व रेल्वेच्या मार्गांवरील गाड्यांत हे कॅमेरे लावले जातील. ३८ सहस्रांहून अधिक डब्यांध्ये प्रत्येकी ८ कॅमेरे लावले जातील, तर २ सहस्र डब्यांमध्ये प्रत्येकी ४ आणि ९६० डब्यांमध्ये प्रत्येकी ६ कॅमेरे असतील.

सीसीटीव्ही कॅमेर्‍याची क्षमता अशी हवी !

निविदेमध्ये सांगण्यात आले आहे की, सीसीटीव्ही कॅमेर्‍यांत ‘इमेज क्रॉपिंग टूल’ असले पाहिजे. यामुळे चष्मा, गॉगल, स्कार्फ, अर्धा झाकलेला चेहरा ओळखता येऊ शकेल. मास्क असला, तरीही चेहर्‍याची ९५ टक्के ओळख अचूक असायला हवी. विना मास्कच्या चेहर्‍यात ९९ टक्क्यांपर्यंत अचूकता असली पाहिजे. कॅमेर्‍याची ताशी १०० चेहरे ओळखण्याची क्षमता असली पाहिजे. (या प्रशंसनीय उपक्रमासमवेत बुरखाबंदीसाठीही सरकारने प्रयत्न करावेत, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते. अन्यथा बुरख्याचा वापर करून गुन्हेगार गुन्हे अव्याहत करत रहातील ! – संपादक)