पू. रेखा काणकोणकर यांनी टप्याटप्याने करून घेतलेली साधना !अ. पू. रेखाताईंनी पुनःपुन्हा मनमोकळेपणे बोलण्यास सांगणे : पू. रेखाताई स्वयंपाकघरात सेवा करणार्या आम्हा काही साधकांच्या साधनेचा आढावा घेतात. आढाव्यात साधक त्यांच्याकडून झालेले साधनेचे प्रयत्न आणि झालेल्या चुका सांगतात. ते ऐकतांना माझ्या मनात यायचे, ‘मला चुका सांगायची भीती वाटत असल्यामुळे माझ्याकडून आढाव्यात चुका सांगितल्या जात नाहीत.’ पू. रेखाताई प्रत्येक वेळी मला म्हणायच्या, ‘‘तुमची सेवा होते; पण मनमोकळेपणाने बोलणे होत नाही.’’ मी त्यांना सांगायचे, ‘‘मी सर्वांशी बोलते’’, तरी पू. रेखाताई मला म्हणायच्या, ‘‘अजूनही मनमोकळेपणाने बोलणे होत नाही.’’ अ १. यजमानांनी ‘तू पू. रेखाताईंशीच मनमोकळेपणे बोलत नाही’, असे लक्षात आणून दिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘पू. रेखाताईंच्या सहवासाचा लाभ करून घ्या’, असे सांगितलेले स्मरून कृतज्ञता वाटणे : एकदा मी यजमानांना (श्री. दिलीप माणगावकर यांना) म्हणाले, ‘‘मी सगळ्यांशी जेवढे बोलायचे, तेवढे बोलते; पण प्रत्येक वेळी पू. रेखाताई मला म्हणतात, ‘तुम्ही मोकळेपणाने बोलत नाही.’’ यजमान मला म्हणाले, ‘‘तू सर्वांशी बोलतेस; पण पू. रेखाताईंशीच मोकळेपणाने बोलत नाहीस.’’ तेव्हा श्री गुरुकृपेने मला आठवले, ‘श्री गुरूंनी मला सांगितले होते, ‘पू. रेखाताईंशी जवळीक करा. त्यांच्या सहवासाचा लाभ करून घेऊन साधनेचे प्रयत्न करा.’ ते आठवल्यावर मला कृतज्ञता वाटली. आ. पू. रेखाताईंनी सांगितल्यावर व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू होणे : माझ्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत नव्हते. मला सारणी (टीप) लिखाण करणे फार अवघड वाटून माझ्याकडून ते टाळले जायचे. एक दिवस आढाव्यात पू. रेखाताई मला सहज म्हणाल्या, ‘‘सारणी लिहिण्याचा प्रयत्न करा.’’ तेव्हापासून माझ्याकडून सारणी लिहिण्याचे प्रयत्न होत आहेत. पू. रेखाताईंनी मला सेवा करतांना मनात येणारे विचार सारणीत लिहायला सांगितले. त्यांनी मला ‘साधनेसाठी कसे प्रयत्न करायचे ?, कुटुंबियांशी कसे वागायचे ?’, इत्यादी सांगून सर्वांशी मिळूनमिसळून वागायला सांगितले. टीप : स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या अयोग्य कृती आणि विचार वहीत लिहून त्यापुढे योग्य कृती किंवा विचार लिहिणे. पू. रेखाताईंच्या माध्यमातूनच माझे सतत गुरुस्मरणही होत आहे; म्हणून माझ्या मनात विचार येतो, ‘श्री गुरुच मला पू. रेखाताईंच्या माध्यमातून घडवत आहेत. श्री गुरूंची माझ्यावर किती कृपा आहे !’ – सौ. कविता दिलीप माणगावकर |
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. रेखा काणकोणकर यांच्याकडून सर्व शिकून घेण्यास आणि त्यांचा साधनेसाठी लाभ करून घेण्यास सांगणे
‘काही वर्षांपूर्वी मला गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला. मी स्वयंपाकघरात सेवा करत असल्यामुळे आणि स्वयंपाकघराच्या संदर्भातील सर्व सेवा पू. रेखाताई (पू. (कु.) रेखा काणकोणकर, सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत) पहात असल्यामुळे गुरुदेव मला म्हणाले,‘‘पू. रेखाताईंच्या सहवासात राहून त्यांच्याकडून सर्व शिकून घ्यायचे आणि त्यांचा साधनेसाठी लाभ करून घ्यायचा.’’
२. बहिर्मुखतेमुळे सेवेतून आनंद न मिळणे
यावरून माझ्या लक्षात आले की, सेवा करतांना माझ्या मनात बहिर्मुखतेचे विचार असायचे. साधकांचे गुण न पहाता ‘साधक कुठे चुकतात ?’, ‘कसे वागतात ?’, यांकडे माझे लक्ष असायचे. ‘मी करते, ते योग्यच आहे’, असे वाटून मी माझ्या चुकांकडे दुर्लक्ष करायचे. यामुळे मला सेवेतील आनंद मिळत नव्हता.
३. प्रसंग घडल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी सूक्ष्मातून बोलल्यावर मनाला हलके वाटणे
एखादा प्रसंग झाल्यावर ‘मनातील विचार कुणाला सांगू ?’, असे वाटून गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) सूक्ष्मातून सर्व सांगून झाल्यावर माझे मन शांत होत असे. तेव्हा माझ्या मनात विचार यायचा, ‘श्री गुरूंनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) सांगितल्याप्रमाणे अजूनही माझ्याकडून प्रयत्न होत नाहीत’; पण ‘मी कुठे अल्प पडते ?’, ते मला कळत नव्हते. मी ‘पू. रेखाताईंनी सांगितल्यानुसार प्रत्येक कृती करण्याचा प्रयत्न करत होते; पण तरीही मला आनंद मिळत नव्हता.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून ‘इतरांच्या चुकांतून शिकून योग्य कृती करायची’, असे सुचवणे
एखादा प्रसंग झाल्यावर गुरुदेव सूक्ष्मातून मला सुचवायचे, ‘आपण येथे कशासाठी आलो आहोत ? आपण केवळ स्वतःकडे पहायचे. कुणी काही चुकीचे केले, तर ‘त्यातून मला काय शिकायचे आहे ?’, हे पाहून त्यानुसार कृती करायची. वर्तमानात राहून प्रत्येक कृती करायची.’ आता माझ्याकडून तसे प्रयत्न होत आहेत.
५. मनाची नकारात्मकता न्यून होऊन अनुभवलेली सकारात्मकता !
५ अ. सारणी लिखाण केल्यामुळे स्वभावदोषांवर काही प्रमाणात मात करता येणे : काही वेळा पुष्कळ प्रसंग घडून मला निराशा यायची. मला वाटायचे, ‘मलाच त्रास का होतो ?’ तेव्हा देवाने माझ्या लक्षात आणून दिले, ‘माझ्यातील स्वभावदोषांमुळे होणार्या चुकांमुळे मला त्रास होतो.’ आता ईश्वराच्या कृपेनेच मला सकारात्मक रहाता येऊन माझ्या स्वभावदोषांवर थोडी मात करता येत आहे. देव मला सांभाळत आहे; पण मीच त्याचे साहाय्य घ्यायला अल्प पडते.
५ आ. प्रसंग घडल्यामुळेच देवाच्या अनुसंधानात रहाता येणे : सर्व चांगले घडले, तर ‘मी कुठे चुकते ?’, याची मला जाणीव कशी होणार होती ? मी देवाशी कशी बोलले असते ? एखादा प्रसंग घडून त्याचा त्रास झाल्यावर माझे देवाशी अनुसंधान वाढते; म्हणून देव प्रसंग घडवतो. ‘प्रत्येक साधक श्री गुरूंचा असून श्री गुरु त्यांच्या माध्यमातून मला ‘मी कुठे चुकले ?’, ते सांगतात’, असे मला वाटते.
५ इ. नकारात्मकता न्यून होऊन मन सकारात्मक होणे : आता मला वाटते, ‘श्री गुरूंना माझ्याकडून अपेक्षित आहेत, तसे प्रयत्न करूया. ईश्वरच माझ्याकडून सर्व करून घेईल.’ सेवेत असतांना मी आनंदी असते, त्यामुळे ‘सेवेतच रहावे’, असे मला वाटते. माझे देवाशी असलेले अनुसंधान वाढले आहे. माझ्याकडून ‘मुले किंवा यजमान यांच्याकडे ‘साधक’ या दृष्टीने पाहून वागण्याचा प्रयत्न होत आहे.
६. अनुभवलेली गुरुकृपा !
६ अ. ‘ईश्वर साहाय्य करतो’, हे अनुभवता येणे : आता अडचणी आल्या, तरी ईश्वराच्या कृपेने सर्व अडचणी सुटतात. ‘ईश्वर कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून साहाय्य करतो’, असे अनुभवल्यामुळे आता मला आहे, त्यात समाधानी रहाता येते. न मागताही देव आवश्यक, ते सर्व देतो. कधी काही न्यून पडत नाही; म्हणून ‘माझ्याकडे काही नाही’, असे कधी म्हणू नये. ‘जे आहे, त्यात समाधानी रहावे’, हे ईश्वराने (श्री गुरूंनी) मला शिकवले.
६ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले सांभाळत असल्यामुळे आनंदी रहाता येणे : आम्हाला अनेक जण म्हणतात, ‘‘तुम्ही किती आनंदी आणि समाधानी आहात !’’ तेव्हा त्यांना मी एकच सांगते, ‘‘आमचे श्री गुरुच आम्हाला सांभाळतात. तेच आम्हाला आनंदात ठेवतात.’’
६ इ. देवाविषयी कृतज्ञताभाव वाढणे : आपण जी काही धडपड करतो, ती स्वतःसाठी करतो. देवासाठी नाही, तरीही देव आपल्याला काही न्यून पडू देत नाही. मग ‘आपण त्याचे केवळ स्मरण, त्याची सेवा करायला का न्यून पडतो ?’, असे विचार येऊन मन भरून येते.
हे सर्व मी श्री गुरूंच्या संकल्पामुळे शिकू शकले. त्यांनीच मला पू. रेखाताईंच्या सहवासात राहून शिकायला सांगितले. त्यानुसार माझ्याकडून शिकण्याचे प्रयत्न होत आहेत. ईश्वरच मला शक्ती आणि बळ देऊन माझ्याकडून सर्व करून घेत आहे. ‘हे गुरुदेवा, तुमची कृपा आम्हा सर्वांवर असू दे’, अशी तुमच्या चरणी कोटीशः प्रार्थना आहे.’
–सौ. कविता दिलीप माणगावकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा