कानपूर येथे शस्त्रास्त्रांच्या कारखान्याचे उद्घाटन : पाकिस्तान अस्वस्थ !

दक्षिण आशियातील ‘सर्वांत मोठा’ संरक्षण कारखाना !

इस्लामाबाद – उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये शस्त्रास्त्रांचा कारखाना सिद्ध  करण्यात आला आहे. हा दक्षिण आशियातील सर्वांत मोठा संरक्षण कारखाना असून त्याचा उद्देश भारताच्या संरक्षण आवश्यकतांसह जागतिक मागणी पूर्ण करणे हा आहे. ५०० एकरांवर पसरलेल्या या कारखान्यामध्ये ‘अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस’ आस्थापनाने ३ सहस्र कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हा दक्षिण आशियातील सर्वांत मोठा कारखाना आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी या दिवशी या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. यामध्ये क्षेपणास्त्रेही सिद्ध केली जातील. या कारखान्यात लहान ‘कॅलिबर बुलेट’ बनवण्यास प्रारंभ झाला आहे. अदानी समूहाच्या अंदाजानुसार, हे भारताच्या आवश्यकतेच्या केवळ २५ टक्के आहे, जे कालांतराने वाढवले जाईल. हे पाहून पाकिस्तानच्या तज्ञांना धक्का बसला आहे.

पाकिस्तानी पत्रकार कमर चीमा यांनी सांगितले की, पाकिस्तानने जेव्हा भारतीय विमान पाडले, तेव्हापासून भारत आपले संरक्षण सशक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताला आता घरच्या घरी ड्रोन बनवायचे आहेत. भारत दोन आघाड्यांवर युद्धाची सिद्धता करत आहे. भारत स्वदेशीवर काम करत आहे. केवळ स्वत:साठीच नाही, तर निर्यातीसाठीही तो काम करत आहे.