सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांमुळे आफ्रिकेत अपहरण झालेले साधिकेचे भाऊ घरी सुखरूप परत येणे

सौ. नीता सोलंकी

१. आफ्रिकेतील सामान्य जनतेची भयावह स्थिती !

‘माझा मोठा भाऊ श्री. मनोज जसवंतलाल पानाचंद हा मोझांबिक, आफ्रिका येथे असतो. २०.७.२०२३ या दिवशी संध्याकाळी ६ वाजता माझा भाऊ दुकान बंद करून गाडीत बसत असतांना त्याला काही लोकांनी अडवले आणि बंदुकीच्या धाकावर त्याचे अपहरण केले. याच प्रकारे ४ वर्षांपूर्वी माझ्या भावाच्या मुलांचे अपहरण केले होते. पुष्कळ पैसे दिल्यावर त्यांना २१ दिवसांनंतर सोडले होते. आफ्रिकेमध्ये असे प्रकार प्रतिदिन चालू असतात. काही वेळेला पैसे देऊनसुद्धा त्या व्यक्तींना जिवंत सोडत नाहीत. उलट त्या व्यक्तींना मारून त्याचे तुकडे करून कचर्‍याच्या पेटीत टाकून देतात आणि घरच्या मंडळींना तसे केल्याचे कळवतात.

२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची सूक्ष्मातून जाणण्याची अफाट क्षमता !

आम्ही हा प्रसंग सद्गुरु मुकुल गाडगीळकाकांना कळवला. तेव्हा त्यांनी ‘नामजपादी उपाय करण्यास सांगून तुमचे भाऊ परत येतील’, असे मला सांगितले. एवढंच नाही, तर सद्गुरु मुकुल गाडगीळ यांना सूक्ष्मातून असे दिसले की, ‘माझ्या भावाला त्याच्या घराच्या दारासमोर उभे राहिल्यावर पूर्व दिशेला ६० – ६५ किलोमीटर अंतरावर अपहरण करून ठेवले आहे.’

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांतून झालेला सकारात्मक परिणाम अनुभवता येणे

नामजपादी उपाय केल्यावर ४ दिवसांनंतर, म्हणजेच २५.७.२०२३ या दिवशी माझा भाऊ सुखरूप घरी पोचला. पुढे आम्हाला समजले, ‘जेव्हा माझ्या भावाचे अपहरण केले होते, तेव्हा त्या संदर्भातील बातमी आफ्रिकेतील एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती. ही बातमी माझ्या भावाचे एक पोलीस अधिकारी असणारे चांगले मित्र आहेत, त्यांनी वाचली. त्यांनी माझ्या भावाला पुढाकार घेऊन सोडवण्यासाठीचे सर्व साहाय्य केले. या वेळी माझ्या भावाला एकही पैसा द्यावा लागला नाही. या प्रसंगातून आध्यात्मिक ज्ञानाचे महत्त्व आणि सद्गुरु मुकुल गाडगीळकाकांच्या नामजपादी उपायांची अचूकता अन् त्याचे सकारात्मक परिणाम मी अनुभवले.

४. भावाने आफ्रिकेतून स्थलांतर केल्यावरही खंडणी मागणार्‍या लोकांचे दूरभाष येणे

या प्रसंगानंतर माझा भाऊ काही मास झाल्यावर मोझांबिक (आफ्रिका) सोडून पोर्तुगाल येथे स्थलांतरित झाला. तिकडे स्थलांतर केल्यानंतरही त्याला अनेक वेळा वेगवेगळ्या क्रमांकावरून दूरभाष आले. त्यांचे म्हणणे असे होते की, माझ्या भावाने त्यांना खंडणीची रक्कम दिली नाही. तेव्हा भावाने त्यांना सांगितले, ‘तुम्ही मला खंडणी न मागता पोलीस ठाण्यामध्ये सोडलेत.’ या प्रसंगावरून सद्गुरु गाडगीळकाकांनी दिलेल्या उपायांची परिणामकारता लक्षात येते.

याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. नीता मनोज सोलंकी, मडगाव, गोवा. (ऑगस्ट २०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक