चीनशी भारताप्रमाणे व्यवहार केला असता, तर चीनने चहुबाजूंनी आमची गळचेपी केली असती ! – मालदीवचे एक अधिकारी

  • मालदीवच्या एका अधिकार्‍याचे वक्तव्य !

  • भारत औदार्य दाखवत असून मालदीवमधील प्रकल्प वेगाने पूर्ण करत आहे !

माले (मालदीव) – मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांच्या चीनवरील प्रेमामुळे भारत-मालदीव संबंधात तणाव निर्माण झाले आहेत. असे असूनही मालदीवमध्ये भारताकडून चालू असलेल्या बांधकाम प्रकल्पांमध्ये वाढ झाली आहे. मालदीवच्या एका अधिकार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मालदीवचे सरकार आणि नेते यांनी भारत अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जसा व्यवहार केला आहे, तसा चीनसोबत केला असता, तर चीनने आतापर्यंत मालदीवची चारही बाजूंनी गळचेपी केली असती. भारताने मात्र औदार्य दाखवत तो प्रकल्प वेगाने पूर्ण करत आहे.

मालदीवच्या जनतेचा काहीही दोष नाही ! – भारतीय अधिकारी

या वर्षी भारताने ४०० कोटी रुपयांचे पूर्वी ठरवलेले अर्थसंकल्पीय साहाय्य ७०० कोटी रुपये केले आहे. भारतीय अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, मालदीवच्या काही नेत्यांच्या कृतीमुळे मालदीवच्या लाखो लोकांसाठी विकसित केल्या जाणार्‍या सुविधा बंद कराव्यात, असे त्यांचे सरकार नाही; कारण यात जनतेचा काहीही दोष नाही.

मुइज्जू यांच्या चीनसमर्थक धोरणामुळे भारताने मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्याची मालदीवची मागणी मान्य केली आहे. या सैनिकांच्या जागी भारत आता तांत्रिक कर्मचारी पाठवणार आहे. मालदीवची जनता आणि विरोधक यांनी मुइज्जू यांच्या या वृत्तीवर नाराजी व्यक्त केली आहे.

भारत मालदीवच्या बांधकाम प्रकल्पांत करत असलेले साहाय्य !

भारताने कर्ज म्हणून दिलेल्या ५०० दशलक्ष डॉलर (साधारण ४ सहस्र १५० कोटी रुपये) मूल्याच्या प्रकल्पांमध्ये राजधानी मालेच्या आजूबाजूचे रस्ते आणि पूल बांधले जाणार आहेत. तसेच मालदीवच्या दुर्गम बेटांवर प्रत्येकी १३० दशलक्ष डॉलर्समध्ये (साधारण १ सहस्र १०० कोटी रुपये) दोन विमानतळ बांधली जाणार आहेत.

संपादकीय भूमिका 

मालदीव जर भारताशी फटकून वागत असेल, तर भारताने औदार्य का दाखवावे ? ‘अशा देशांच्या विरोधात आक्रमक धोरण राबवणे आवश्यक आहे’, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !