राणे आणि भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
चिपळूण – माजी खासदार नीलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर चिपळूण येथे दगडफेक करण्यात आली. त्यामुळे नीलेश राणे आणि ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला.
१६ फेब्रुवारी या दिवशी दुपारी नीलेश राणे चिपळूणहून गुहागरकडे सभेला जाण्यासाठी निघाले होते. दुपारी साडेचारच्या दरम्यान राणे आणि त्यांचे कार्यकर्ते चिपळुणातील आमदार जाधव यांच्या कार्यालयासमोरून जात असतांना राणे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाही दिल्या आणि एकमेकांवर दगडफेकही करण्यात आली.
वादाची पार्श्वभूमी !
चिपळूण येथील ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दौर्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी माजी खासदार नीलेश राणे यांनी ‘आपण त्यांच्या (भास्कर जाधव यांच्या) मतदार संघातच सभा घेऊ आणि तेथेच उत्तर देऊ’, असे घोषित केले होते आणि त्यासाठीच गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे १६ फेब्रुवारी या दिवशी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याच सभेचा प्रचारही जोरदार करण्यात आला होता. ‘हिशोब चुकता करणार’, अशा प्रकारचे ‘पोस्टर्स’ही झळकवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जाधव समर्थक कार्यकर्त्यांनीही चिपळूण पोलिसांना निवेदन देत नीलेश राणे यांची सभा रहित करण्याची मागणी केली होती.