११ फेब्रुवारी या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा वर्धापनदिन सोहळा आहे. त्या निमित्ताने संतांचे संदेश

प्रत्येक हिंदूने कृतज्ञता व्यक्त करावी, असे कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’ करत आहे ! – प.पू. उल्हासगिरी महाराज, मठाधिपती, ओणी-कोंडिवळे, ता. राजापूर, जि. रत्नागिरी.

।। ॐ चैतन्य गगनगिरीनाथाय नम: ।।

प.पू. उल्हासगिरी महाराज

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या द्वितपपूर्ती वर्धापनदिनानिमित्त पुढील वाटचालीसाठी आध्यात्मिक शुभेच्छा ! परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संकल्प, ईश्वराची कृपा आणि संतांचे आशीर्वाद त्याचप्रमाणे साधकांची मेहनत यांमुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दैनिक ‘सनातन प्रभात’ (रत्नागिरी आवृत्ती) २५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. ‘हिंदु धर्माची बाजू परखडपणे मांडणारे ‘सनातन प्रभात’ हिंदु बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे’, याचा आम्हाला अभिमान आहे. ‘हिंदु बांधवांचे प्रबोधन करून त्यांनी धर्माचरण करणे, ही काळाची आवश्यकता आहे’, हे सर्वप्रथम सांगणारे प्रसारमाध्यम,म्हणजे ‘सनातन प्रभात’ होय. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची भूमिका प्रभावीपणे बजावत असतांना ‘सनातन प्रभात’ने पत्रकारितेमध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे. प्रत्येक हिंदूने कृतज्ञता व्यक्त करावी, असे कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’ करत आहे. या कार्याला आमचे शुभाशीर्वाद ! (२.२.२०२४)

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात ‘सनातन प्रभात’ची भूमिका महत्त्वपूर्ण ! – सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, जिल्हा सिंधुदुर्ग

सद्गुरु सत्यवान कदम

आज दैनिक ‘सनातन प्रभात’ने २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. इतर दैनिके आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांचा विचार केला, तर अन्य दैनिके केवळ बातम्या देतात; परंतु दैनिक ‘सनातन प्रभात’ हिंदु धर्मावर कशा प्रकारे आघात होत आहेत ? ते रोखण्यासाठी काय करावे ? धर्म कसा जगावा ? पूजा कशी करावी ? आपली संस्कृती काय आहे ? आणि तिचे रक्षण कसे करावे ? याचे ज्ञान ‘सनातन प्रभात’मधून होत असते. त्याच समवेत ‘समाजाला ईश्वरप्राप्ती व्हावी, यासाठी साधना करणे का महत्त्वाचे आहे ?’ हेही ‘सनातन प्रभात’ समाजाच्या मनावर बिंबवत असते.

आज हिंदु समाजाला भेडसावणार्‍या ज्या समस्या आहेत, त्यावर ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव पर्याय आहे. ते स्थापन होण्यासाठी ‘सनातन प्रभात’ महत्त्वाची भूमिका निभावत आहे. असा अद्वितीय ‘सनातन प्रभात’ सर्व लोकांपर्यंत पोचणे महत्त्वाचे आहे आणि तो सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणे, ही आपली समष्टी साधनाच आहे. (२.२.२०२४)

दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्य अद्वितीय ! – पू. श्रीकृष्ण आगवेकर, सनातनचे ७९ वे संत, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.

पू. श्रीकृष्ण आगवेकर

दैनिक ‘सनातन प्रभात’ हे गेली २४ वर्षे धर्मशिक्षण, धर्मजागृती आणि हिंदुत्वाची जाण यांसाठी सतत प्रयत्न करत आहे. धर्म आणि राष्ट्र यांसंदर्भात जनजागृतीचे शिवधनुष्य उचलत आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून केलेल्या प्रबोधनामुळे उत्तरप्रदेशमध्ये ‘हलाल जिहाद’वर बंदी कायदा आला, तसेच ‘लव्ह जिहाद’पासून सहस्रो मुली वाचल्या आहेत.

राष्ट्र आणि धर्म यांवर असीम प्रेम करणार्‍यांची माहिती देणे आणि देशातील हिंदु धर्मावर आघात होणार्‍या घटना समाजासमोर आणणे, यांचे मोठे कार्य ‘सनातन प्रभात’मुळे झाले आहे. त्यामुळे प्रत्येक घरी दैनिक ‘सनातन प्रभात’ असलाच पाहिजे. अशा या दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्य अद्वितीय आहे. (२.२.२०२४)

दैनिक ‘सनातन प्रभात’ हे देवदूताचे काम करते ! – पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये, सनातनच्या ९४ व्या संत, तपोधाम, आयनी मेटे, खेड, जिल्हा रत्नागिरी.

पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये

दैनिक ‘सनातन प्रभात’ हे देवदूताचे काम करते. त्यामध्ये राष्ट्र आणि धर्म यांची सध्याची काय स्थिती आहे ? या स्थितीला सामोरे कसे जायचे ? याचाही दृष्टीकोन सांगितला जातो, तसेच आयुर्वेद अन् होमिओपॅथी औषधांची माहितीही सांगितली जाते. साधक आणि समाज यांना जे काही त्रास होतात, त्यावर संत, सद्गुरु, आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगतात. तो केल्यामुळे काय लाभ झाला ? हेही अनुभूतींच्या रूपात सांगितले जाते. येणार्‍या आपत्काळाविषयी सूचना आणि उपाययोजना सांगितलेल्या असतात. अध्यात्मात प्रगती केलेले समाजातील लोक, साधक आणि संत यांची माहिती असते. हे वाचून आपणही अध्यात्मात प्रगती करू शकतो, असे वाचकाला वाटते आणि अशी प्रगती या नियतकालिकांच्या अनेक वाचकांनी केली आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने हे देवाचे पत्र आहे. म्हणून अशा या देवदूताचे म्हणजे दैनिक ‘सनातन प्रभात’ हे सर्व लोकांपर्यंत पोचणे आवश्यक आहे.(२.२.२०२४)