Raja Bhaiya : कळस तोडून भिंतीवर घुमट बनवल्याने ती गंगा-जमुनी संस्कृती होत नाही !

लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार राजा भैय्या यांनी उत्तरप्रदेशातील विधानसभेत मुसलमानांचे ढोंग केले उघड !

(गंगा-जमुनी संस्कृती (तहजीब) म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या तिरांवर वास्तव्य करणार्‍या हिंदू अन् मुसलमान यांच्यातील कथित ऐक्य दर्शवणारी संस्कृती. तिचे पालन करण्यासाठी केवळ हिंदूंवरच दबाव बनवला जातो.)

लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार राजा भैय्या

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – कळस तोडून भिंतीवर घुमट बनवल्याने ती गंगा-जमुनी संस्कृती होत नाही. हिंदूंची मंदिरे आक्रमणकर्त्यांनी तोडली, हे स्पष्ट आहे, असे विधान उत्तरप्रदेशातील लोकतांत्रिक पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार रघुराज प्रताप सिंह उपाख्य  राजा भैय्या यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलतांना केले.

‘बाबर आणि औरंगजेब यांचे अनुकरण केले, तर कधीच शांतता मिळणार नाही.’

‘श्रीराममंदिर, काशी विश्‍वनाथ मंदिर आणि श्रीकृष्णजन्मभूमी यांना आक्रमकांनी लक्ष्य केले आहे.’

– आमदार राजा भैय्या

आमदार राजा भैय्या यांनी मांडलेली सूत्रे

१. प्रभु श्रीराम यांची सभागृहात सर्वाधिक चर्चा झाली. राममनोहर लोहिया यांच्यावर विश्‍वास ठेवणारेही मान्य करतील की, लोहिया यांनी प्रतिवर्षी रामायण जत्रेचे आयोजन ‘सर्वसामान्य जनतेला रामाच्या आदर्शाचे अनुकरण करावे’, या उद्देशाने केले होते. (लोहिया हे सामजवादी आणि पुरोगामी नेते होते.)

२. ‘बाबर, गझनी, घोरी, औरंगजेब हे दरोडेखोर होते’, असे विधान स्वतः लोहिया यांचे होते. रस खान आणि रहीम हे आमचे पूर्वज होते. हे येथे सांगणे आवश्यक आहे; कारण गेल्या अनेक दिवसांपासून वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न होत असल्याचे पहायला मिळत आहे. अगदी हल्द्वानीचेही उदाहरण घ्या. आपल्या राज्यात कोणताही गडबड होऊ नये, यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; मात्र कुठेतरी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.

३. ज्ञानवापी येथील व्यासजींच्या तळघरात होणारी पूजा शेकडो वर्षांपासून अखंडपणे चालू  आहे. ही माहिती जगासमोर आली पाहिजे. वर्ष १९९३ मध्ये स्थानिक प्रशासनाने यावर बंदी घातली होती. या पूजेवर कोणत्याही न्यायालयाने बंदी घातली नाही.

४. या सदनाच्या माध्यमातून आम्ही व्यासजींच्या तळघराच्या कुलुपाची किल्ली ३१ वर्षे जपून ठेवणार्‍या पुजार्‍यालाही आदरांजली वहाणार आहोत; कारण त्याचा विश्‍वास होता की, एक दिवस असे सरकार येईल, जे हे कुलूप उघडेल.

५. अल्लामा इक्बाल ही पहिली व्यक्ती होती, जिने ‘हिंदु आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत’ असे म्हटले होते. ‘मुसलमानांना वेगळ्या देशाची आवश्यकता आहे’, असे पाकिस्तानचे वैचारिक जनक डॉ. जिना यांनीही हिंदु आणि मुसलमान एकत्र राहू शकत नाहीत, असे म्हटले. यामुळेच फाळणी झाली. ‘सारे जहां से अच्छा’ ही कविता यामुळेच अर्धवट ठरते. वर्ष १९१० मध्ये लिहिलेल्या या कवितेत म्हटले होते की, भारत, चीन, अरब ही सर्व आमची राष्ट्रे आहेत आणि ती सर्व इस्लामी राष्ट्रे आहेत.

६. आमच्या हयातीत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर पाहण्याचे सौभाग्य आम्हाला लाभले आहे. माझा असाही विश्‍वास आहे की, आदि शंकराचार्यांच्या पश्‍चात सनातन उत्थानाचे, हिंदु उत्थानाचे कार्य कुणी करत असेल, तर ते नरेंद्र मोदी आहेत.

संपादकीय भूमिका

राजा भैय्या यांना आता याची आठवण झाली, हेही नसे थोडके ! आता त्यांनी ज्ञानवापी आणि श्रीकृष्णजन्मभूमी यांच्या मुक्ततेसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !