१. श्री जयंतच दिग्विजय प्राप्त करून देणार असल्याने कृष्णाने गुढीपाडव्याच्या दिवशी ‘श्री जयंताय नमः ।’ हा नामजप करण्यास सांगून त्यामागील कार्यकारणभाव सांगणे
‘मी गुढीपाडव्याच्या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले. तेव्हा मी श्रीकृष्णाला सूक्ष्मातून विचारले, ‘कृष्णा, मी आज कुठला नामजप करू ?’ तेव्हा श्रीकृष्णाने मला ‘श्री जयंताय नमः ।’ हा नामजप करण्यास सांगितला. मी कृष्णाला ‘हा नामजप का करायचा ?’, असे विचारले, तेव्हा त्याने सांगितले, ‘आज विजयाची गुढी उभी करायची आहे. श्री जयंतच आपल्याला दिग्विजय प्राप्त करून देणार आहेत; म्हणून आज ‘श्री जयंताय नमः ।’ हा जप करायचा आहे.’
२. रामनवमीच्या दिवशी आनंद असल्याने कृष्णाने साधिकेला ‘श्री आनंदाय नमः ।’ हा नामजप करण्यास सांगणे
रामनवमीच्या दिवशी श्रीकृष्णाने मला ‘श्री आनंदाय नमः ।’ हा नामजप करण्यास सांगितले. त्या वेळी मी श्रीकृष्णाला विचारले, ‘आज रामनवमी असल्याने श्रीरामाचा जप करू का ?’ तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, ‘आज आनंद आहे; म्हणून ‘श्री आनंदाय नमः ।’ हा नामजप कर.’ त्यानंतर संध्याकाळी श्रीमती मंदाकिनी डगवार या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता मिळाली. त्या वेळी ‘श्रीकृष्णाने आज ‘श्री आनंदाय नमः ।’ हा नामजप करण्यास का सांगितला ?’, ते लक्षात आले.
३. श्रीकृष्णाने साधिकेला भावप्रयोग करतांना केलेले मार्गदर्शन
मी श्रीकृष्णाच्या भुवयांचे भावपूर्ण स्मरण करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा श्रीकृष्णाने मला पुढील सूत्रे सांगितली. ही सूत्रे मला गुरुकृपेने ग्रहण करता आली.
३ अ. चित्ताची एकाग्रता साधण्याविषयी
१. श्रीकृष्णाने मला सांगितले, ‘भ्रुकुटीचा संबंध चित्ताशी असतो. भ्रुकुटी आज्ञाचक्राच्या जवळ असतात. आज्ञाचक्रातून प्रवाहित होणारे विचार चित्तामध्ये साठवले जातात; म्हणूनच साधक भावपूर्ण गुरुस्मरण करतात.
२. डोळे मिटल्यावर साधकाची एकाग्रता वाढते. डोळे मिटल्यावर काही क्षण चित्त ईश्वरचरणी लीन होऊन साधक अंतर्मुख होतो आणि त्याचे आत्मचिंतन वाढते.’
३. पूर्वीचे ऋषिमुनी वर्षानुवर्षे तपश्चर्येला बसायचे. तेव्हा त्यांची एकाग्रता साधली जायची. त्या माध्यमातून त्यांना दिव्यज्ञानाची प्राप्ती व्हायची.
४. व्यक्ती पुष्कळ विचार करत असतांना तिचे डोके दुखू लागते; पण सात्त्विक विचार, नामजप आणि ईश्वराचे अनुसंधान यांमुळे चित्तशुद्धी होऊन डोकेदुखीचा विकार होत नाही.
३ आ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाविषयी
१. साधकाच्या चित्ताची एकाग्रता जसजशी वाढत जाते, तसे त्याचे अनेक जन्मांचे अयोग्य संस्कार नष्ट होऊन त्याच्या चित्ताची शुद्धी होते. चित्तशुद्धी झाल्यावर त्याची ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वेगाने वाटचाल चालू होते.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आपल्याला गुरुकृपायोगानुसार साधना शिकवतांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया शिकवली. ही प्रक्रियाच महत्त्वाची आहे आणि ती आपल्या सर्व साधकांच्या साधनेचा केंद्रबिंदू आहे.
श्रीकृष्णाने मला भावप्रयोग करायला सांगून वरील सर्व सूत्रे शिकवली, यासाठी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.६.२०२२)
|