स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाषाशुद्धीविषयक विचार

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे चालू असलेल्या ‘९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या निमित्ताने…

‘मुंबई येथे वर्ष १९३८ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. या संमेलनाचे स्वातंत्र्यवीर सावरकर हे अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांनी भाषण करतांना भाषाशुद्धीविषयक जे विचार मांडले, ते येथे देत आहोत.

स्वातंत्र्यवीर सावरकर

१. स्वभाषाभिमान आणि भाषाशुद्धीचा आग्रह

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यावर ‘राज्यव्यवहार कोष’ लिहिला. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी भाषाशुद्धीची चळवळ पुढे चालवली. या सर्वांमध्ये ‘स्वभाषाभिमान’ हाच एक गुण प्रकर्षाने जाणवतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर भाषाशुद्धीची चळवळ २० व्या शतकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी चालू केली. स्वातंत्र्यविरांनी विचार प्रवर्तनासह भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. ते एक निरलस प्रचारक होते.

२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भाषाशुद्धीची मुख्य सूत्रे

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भाषाशुद्धीविषयक मूलतत्त्वे वाचल्यास भाषाशुद्धीचा आग्रह नको, असे कुणासही वाटणार नाही; मात्र त्यासाठी त्यांची सूत्रे प्रत्येकाने नीट अभ्यासली पाहिजेत.

भाषाशुद्धीच्या संबंधात असा एक अपसमज आहे की, मराठीत कुणाचाही उर्दू वा इंग्रजी शब्द असा वापरायचाच नाही. भाषाशुद्धीचा हा आरोप स्वातंत्र्यविरांनी फेटाळून लावला. त्यांनी भाषाशुद्धीची मुख्य सूत्रे सांगितली ती पुढीलप्रमाणे –

अ. आपल्या भाषेत ज्या अर्थाचे शब्द होते, आहेत किंवा उद्भवणे सुसाध्य आहे, अशा अर्थाचे परकीय शब्द आपण वापरू नयेत. मग ते जुने असोत वा नवे. आपले अर्थबोध करणारे शब्द मारून जे परकीय शब्द रूढ होतात, पुढे ते सर्रास वापरले जातात. त्याने काही आपली शब्द संपत्ती वाढत नाही.

आ. ज्या अर्थाचे शब्द, त्या वस्तू पूर्वी आपल्यात नव्हत्या म्हणून आपल्या भाषेत मुळातच नाहीत किंवा उद्भवणे दुर्घट आहेत, असे परकीय शब्द वापरण्यास आडकाठी नाही. त्या परशब्दांनी मात्र आपली शब्द संपत्ती काही अंशी वाढेल, जसे की, कोट, बूट, गुलाब, जॅकेट, पेन्सिल, टेबल, टेनिस इत्यादी.

३. भाषाशुद्धीच्या मुख्य धोरणाकडे पाठ फिरवता कामा नये !

मुंबईतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘लिपीशुद्धी सुधारणा आणि भाषाशुद्धी’विषयक विचार मांडले. ते म्हणतात, ‘भाषाशुद्धीची ही २ मुख्य सूत्रे जर ध्यानात ठेवली, तर तिच्यावर अपसमजाने येणारे ९९ टक्के आक्षेप गळून पडतील. ज्याच्या तोंडी जो येईल, तो परशब्द – ‘फादर, मदर, इलेक्शन हाऊस, डोअर, मुबारक, अफताब, वाईफ, मिटींग, इन्व्हिटेशन’, असे सरसकट अन् रोखठोकपणे स्वतःच्या बोलण्यात वा साहित्यात घुसू द्यावे, असे म्हणणारा सद्गृहस्थ विरळाच ! बाकी मतभेद जे आहेत ते फुटकळ प्रकरणीच उरलेले आहेत. अमका शब्द स्वकीय वा परकीय, अमक्या शब्दात विशेष छटा आहे कि नाही, तमका नवा शब्द सुटसुटीत आहे वा बोजड, हे मतभेद मुख्य धोरणाला बाधा आणत नाहीत. एकाने काढलेला स्वकीय नवा शब्द बोजड वाटला, तर दुसर्‍याने दुसरा योजावा. जो तगेल तो जगेल. आपला शब्द मारून अनावश्यक परकीय शब्द भाषेत नि साहित्यात घुसू देऊ नयेत. या मुख्य धोरणाकडे आपण पाठ फिरवली नाही, म्हणजे झाले.’

४. राष्ट्र्रीयत्वाच्या प्रमुख घटकात भाषेला महत्त्वाचे स्थान ! 

याचे उत्तम उदाहरण, म्हणजे इंग्रजी भाषेला दूर लोटून आयर्लंडने गॅलिक भाषा पुनरुज्जीवित केली. त्याचप्रमाणे ज्यू लोकांनी इस्रायल हे राष्ट्र स्थापन केल्यानंतर सहस्रो वर्षे अक्षरशः मृतप्राय झालेल्या आपल्या हिब्रू भाषेला अवघ्या १० वर्षांत राष्ट्रभाषा नि राज्यभाषा करून परराष्ट्र दूतावासांनीही स्वतःची हिब्रू भाषाच वापरली पाहिजे, असे निश्‍चित केले. रियेल्यूने फ्रेंच अ‍ॅकेडमी स्थापन केली.

५. स्वतःचे नाव लिहितांना इंग्रजी आद्याक्षरांचा उपयोग निंदनीय

स्वतःची नावे लिहितांना इंग्रजी आद्याक्षरांचा उपयोग करण्याची निंद्य प्रथा रूढ होत आहे. जसे की, एस्.एम्. जोशी, आर्.एम्. भट, पी.के. पाटील, बी.डी. समेळ. याचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तीव्रपणे निषेध केला आहे.’

(स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी वर्ष १९३८ मध्ये भाषाशुद्धीविषयी मांडलेले विचार आज ८६ वर्षांनंतरही तंतोतंत लागू आहेत. यावरून मराठी भाषाशुद्धी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी किती प्रयत्न करायला हवेत, ते यातून लक्षात येते ! – संपादक)

संकलक : डॉ. (सौ.) सुमेधा प्र. मराठे

(साभार : मासिक ‘प्रज्वलंत’, फेब्रुवारी १९९९)

‘जगाला एक लिपी हवी, तर त्यासाठी योग्य आहे शास्त्रशुद्ध देवनागरी लिपी !’ – स्वातंत्र्यवीर सावरकर