१. मनुष्याच्या मनात अनेक कारणांनी असुरक्षिततेची भावना निर्माण होणे, यावर स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेसह डॉ. मिनू रतन यांनी सांगितलेली ‘सेफ प्लेस रेमेडी’ही प्रक्रिया उपयुक्त असणे
‘प्रत्येक मनुष्य जीवनात कधीतरी स्वतःला असुरक्षित समजतो, म्हणजे तशी भावना त्याच्या मनात निर्माण होते. काहींना ‘परीक्षेच्या काळात उत्तरपत्रिका नीट लिहिता येईल ना ?’, याचे भय असते. काहींना प्रवासाचे, तर काहींना नोकरीनिमित्त मुलाखतीला जातांना ‘आपण सर्व प्रश्नांची उत्तरे नीट देऊ शकू ना ?’, याचे भय असते. काहींना आपल्या वरिष्ठांसमोर बोलण्याचे भय असते. त्यामुळे अशा व्यक्ती एखाद्या बैठकीमध्ये स्वतःची सूत्रे नीट मांडू शकत नाहीत. अशा अनेक कारणांमुळे माणसाचे मन असुरक्षित असते. या असुरक्षिततेच्या भावनेमुळे व्यक्तीचा आत्मविश्वास न्यून होतो आणि काही वेळेला काही चूक नसतांनाही मनुष्य बचावात्मक पवित्र्यात (‘डिफेन्सिव्ह मोड’मध्ये), म्हणजे स्वतःचे समर्थन करण्यासाठी प्रयत्नशील रहातो. हा स्वभावदोष घालवण्यासाठी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया उपयुक्त आहेच; परंतु काहींना यावर लगेचच मात करता येत नाही. यासाठी मुंबईतील विख्यात समुपदेशक डॉ. मिनू रतन यांनी सांगितलेली ‘सेफ प्लेस रेमेडी’ सर्वांना नक्कीच उपयुक्त ठरेल’, असे वाटते.
२. व्यक्तीला असुरक्षित वाटल्यावर ज्या ठिकाणी तिला पूर्वी निर्भय आणि शांत स्थितीचा अनुभव आला असेल, अशा ठिकाणी मानस रूपाने जाऊन तिने नामजप, ध्यानादी करावे !
डॉ. मिनूदीदी सांगतात, ‘‘प्रत्येक मनुष्य त्याच्या आयुष्यात कुठेतरी अशा एखाद्या ठिकाणी वावरलेला असतो की, त्या ठिकाणी तो पूर्णतः निश्चिंत, निर्भय आणि शांत स्थितीचा अनुभव करत असतो. प्रत्येकाने आपल्या जीवनातील अशा एखाद्या ठिकाणाचा शोध घ्यावा. ज्या वेळी मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते, त्या वेळी त्या ठिकाणी मानस रूपाने जाऊन बसावे आणि जे काही करता येणे शक्य आहे, उदा. नामजप करणे, ध्यान करणे, श्वासावर लक्ष केंद्रित करून स्वस्थ बसणे, असे प्रयोग करून तेथे काही वेळ बसावे. त्यानंतर आपल्या मनातील असुरक्षिततेची भावना नक्कीच न्यून झालेली असेल, यात शंका नाही.’’
३. साधकाने मन असुरक्षित आणि अस्वस्थ झाल्यावर मानसरूपाने सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयोग करणे अन् तेथे जाऊन नामजप केल्यावर असुरक्षितता न्यून झाल्याचे अनुभवणे
मलाही माझ्या जीवनात परीक्षेचा नेहमीच ताण यायचा. आजही काही नवीन सेवा आल्यास किंवा काही मोठे आव्हान समोर निर्माण झाल्यास मला असुरक्षित वाटते आणि त्यामुळे अस्वस्थही वाटते. यावर उपाय म्हणून मी मिनूदीदी यांच्या मार्गदर्शनानुसार प्रयोग केला. माझ्या जीवनात मी ज्या ठिकाणी सर्वांत सुरक्षित असल्याचा अनुभव करत होतो, त्या ठिकाणी मी काही वेळ मानसरूपाने जाण्याचा प्रयोग केला आणि खरोखरंच ‘तेथे जाऊन नामजप केल्यानंतर माझी असुरक्षितता न्यून झाली’, असे माझ्या लक्षात आले.’
– श्री. योगेश जलतारे (सनातन प्रभात, समूह संपादक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१.२०२४)