सातारा येथील ‘कस्तुरबा’ रुग्णालयासाठी आधुनिक वैद्यांची वानवा !

तातडीने आधुनिक वैद्य उपलब्ध करून न दिल्यास आंदोलन करण्याची चेतावणी !

सातारा, १ फेब्रुवारी (वार्ता.) – शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या ‘कस्तुरबा’ रुग्णालयासाठी एम्.बी.बी.एस्. शिक्षण घेतलेले आधुनिक वैद्य मिळत नाहीत. आधुनिक वैद्य मिळण्यासाठी विज्ञापन देऊन ३ आठवडे झाले, तरी कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे कस्तुरबा रुग्णालयात एम्.बी.बी.एस्. आधुनिक वैद्यांची वानवा आहे. ‘जिल्हा आरोग्ययंत्रणेने तातडीने आधुनिक वैद्य उपलब्ध करून द्यावा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल’, अशी चेतावणी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे.

‘कस्तुरबा’ रुग्णालय वर्ष २०१० पर्यंत सातारा नगरपालिकेच्या नियंत्रणात होते. नंतर ‘राष्ट्रीय आरोग्य’ अभियानांतर्गत हे रुग्णालय जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळामध्ये या रुग्णालयाचा प्रभावीरित्या उपयोग करण्यात आला; मात्र पुढील काळात एम्.बी.बी.एस्. आधुनिक वैद्य नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ लागली. शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले. आधुनिक वैद्य मिळत नसल्यास बी.ए.एम्.एस्. वैद्य द्यावा, असेही जिल्हा आरोग्ययंत्रणेला सूचित करण्यात आले आहे; मात्र ‘तुम्हीच एकदा वैद्यकीय अधिकारी सुचवा’, असे उत्तर जिल्हा आरोग्ययंत्रणेकडून मिळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत.

अशी चेतावणी का द्यावी लागते ? जिल्हा आरोग्ययंत्रणेला जनतेची गैरसोय लक्षात येत नाही का ? यातून जनतेच्या जिवाची पर्वा प्रशासनाला किती आहे ? हे लक्षात येते !