President Droupadi Murmu : अयोध्येत श्रीराममंदिर उभारण्याची आकांक्षा यावर्षी पूर्ण झाली ! – राष्ट्रपती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला केले संबोधन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

नवी देहली – शतकानुशतके अयोध्येतील श्रीराममंदिर उभारण्याची आकांक्षा होती, ती यावर्षी पूर्ण झाली आहे. इंग्रजांच्या काळातील कायदे आता इतिहासजमा झाले आहेत. सरकारने तिहेरी तलाकची वाईट प्रथा बंद करण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी केल्या आहेत, असे वक्तव्य राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आरंभी लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, वर्ष २०२३ मध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. ‘चंद्रयान-३’चे यश, श्रीराममंदिराच्या उभारणीचे स्वप्न पूर्ण होणे, महिला आरक्षण कायदा होणे, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक पदके मिळणे आदी महत्त्वपूर्ण कामगिरी आपण बजावली. राष्ट्रपतींनी श्रीराममंदिराचा उल्लेख करताच उपस्थित खासदारांनी टेबलावर हात मारून त्यांचे अभिनंदन केले.

गोंधळ घालणार्‍यांना कुणी लक्षात ठेवत नाही ! – पंतप्रधान

अधिवेशनाच्या आधी पंतप्रधान मोदी यांनी सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘ज्याला जो मार्ग सुचला, त्याने संसदेत त्या पद्धतीने काम केले. संसदीय सदस्य म्हणून स्वतःच्या कार्यकाळात काय केले, याचे प्रत्येक जण आत्मपरीक्षण करील, अशी मी आशा करतो. जे कुणी सकारात्मक योगदान देतील, ते सर्वांच्या स्मरणात रहातील; मात्र जे गोंधळ घालतील, ते कुणाच्या क्वचित् लक्षात रहातील.

हे अधिवेशन म्हणजे (गोंधळ घालणार्‍यांना) पश्‍चात्ताप करण्याची आणि सकारात्मक पाऊलखुणा सोडण्याची संधी आहे. ती संधी गमावू नका.’’