रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर कु. अश्विनी खत्री यांना आलेल्या अनुभूती

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. रामनाथी आश्रम, गोवा येथे येण्यापूर्वी नकारात्मक विचार येणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण केल्यावर चांगले वाटणे

‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येण्यापूर्वी माझ्या मनात पुष्कळ नकारात्मक विचार येत असत. त्यामुळे मी अभ्यासही करू शकत नव्हते. माझे मन स्थिर होऊ शकत नव्हते. मला कुणाशीही बोलण्यात रस वाटत नव्हता. घरात असतांना माझी पुष्कळ चिडचिड होत होती. एक दिवस मला गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्मरण झाले आणि त्यांनी मला म्हटले, ‘तू रामनाथी आश्रमात (वैकुंठलोकात) ये. तुला येथे येऊन पुष्कळ दिवस झाले आहेत. येथे आल्यावर तुझ्या मनाला चांगले वाटेल.’

कु. अश्विनी खत्री

२. आश्रमात आल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून सांगितल्याप्रमाणे मन सकारात्मक आणि हलके होणे

जेव्हा मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून सांगितल्याप्रमाणे घडले. गुरुदेवांनी सूक्ष्मातून सांगितल्याप्रमाणे माझे मन सकारात्मक झाले आणि मला पुष्कळ हलकेपणा जाणवला. मला साधनेविषयी पुष्कळ शिकायला मिळत होते. गुरुदेव माझ्याकडून सेवा करून घेऊन मला पुष्कळ आनंद देत होते.

३. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी सांगितलेल्या मंत्राप्रमाणे कृती करण्याचे घरी प्रयत्न न होणे; परंतु आश्रमात आल्यावर देहबुद्धी जाऊन आत्मबुद्धी स्थिरावल्याची अनुभूती येणे

सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांनी आम्हाला भावसत्संगामध्ये ‘देहबुद्धिनाशम् आत्मबुद्धिस्थितम्।’ म्हणजे ‘देहबुद्धीचा नाश झाला की, आत्मबुद्धी स्थिर होते’ हा मंत्र सांगून त्यानुसार प्रयत्न करायला सांगितले होते. या मंत्रानुसार माझ्याकडून घरी कृती करण्याचे प्रयत्न होत नव्हते; परंतु आश्रमात आल्यावर तसे प्रयत्न होत असल्याचे मल अनुभवता आले.

‘भाव ठेवून प्रार्थना करणे, तसेच प्रत्यक्ष जीवनात आलेल्या प्रसंगांत चिंतन करून आपले विचार आणि कर्म देहबुद्धी वाढवणारे किंवा त्यानुरूप आहे का ?’, ते पडताळणे आणि तेथे निष्कामभाव, भगवद्भाव किंवा गुरूंना अपेक्षित असा विचार करून निर्णय घेणे आणि कृती करणे असे प्रयत्न करण्यास सांगितले होते. ‘मनाला सतत ध्येय लक्षात रहाण्यासाठी या वाक्याचे स्मरण करणे’, असे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाका यांनी सांगितले होते.’

४. आश्रमात सेवा करतांना देहाचे भान नसणे आणि ‘मी देह नसून तो आत्मा आहे’, याची अनुभूती येणे

मला आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा मिळाली. मी सेवा करतांना ‘ती सेवा कधी संपली’, हे मला समजत नव्हते. आश्रमात सतत ७ घंट्यांची सेवा माझ्याकडून होत होती. सेवा करतांना मला देहाचे भान रहात नसे. ‘स्वतः गुरुदेवांनीच सेवा केली’, असे मला वाटत असे. तेव्हा सेवा झाल्यानंतर मला पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली आणि प्रतिदिन पुष्कळ आनंद मिळत असे. ‘मी देह नसून तो आत्मा आहे’, याची मला अनुभूती येऊन ‘आत्मा प्रत्येक क्षणी गुरुदेवांच्या सेवेतच रहावा’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना होत असे.

५. स्वयंपाकघरामध्ये गाजरांच्या वर्गीकरणाची सेवा करतांना ‘गाजरांना चैतन्य आणि आनंद मिळत आहे’, असे वाटणे

मला स्वयंपाकघरामध्ये गाजरांचे वर्गीकरण करण्याची सेवा मिळाली होती. तेव्हा मला वाटले की, ‘ती आश्रमात आल्यामुळे पुष्कळ आनंदी आहेत आणि त्यांना चैतन्य मिळून त्यांचा उद्धार होत आहे.’ जसे एखादे रोपटे उगवण्यासाठी माती हवी असते. तेव्हाच पाणी आणि माती यांमुळे ते रोपटे तग धरते. तेव्हा त्याच्यामध्ये नवीन पाने फुटू लागतात. तसेच या गाजरांमध्ये अशी हिरवी कोवळी पाने उगवत आहेत. आश्रमातून त्यांना चैतन्यरूपी माती आणि पाणी मिळत असल्याने ती आनंदी होऊन नवीन जन्म घेत आहेत. ती कोवळी पाने अतिशय सुंदर कोमल फुलासारखी होती. ती कोवळी पाने पाहून माझे मन पुष्कळ प्रफुल्लित होत होते. ‘मला सेवा करण्यात आणि गाजरांना आश्रमात आल्यामुळे आनंद मिळत होता’, असे मला वाटत होते.

६. मकरसंक्रांतीच्या दिवशी साडी नेसल्याने दिवसभर हलके वाटणे

मी मकरसंक्रांतीच्या दिवशी साडी नेसले होते. ती साडी मला संगीतादीदीने (सुश्री (कु.) संगीता मेनराय यांनी) नेसवली. तेव्हा ‘देवीनेच मला साडी नेसवली आहे’, असे मला वाटले. त्यामुळे मला दिवसभर पुष्कळ हलके वाटत होते. सर्व साधक माझी प्रशंसा करत होते. एरव्ही मी थोडा वेळच साडी नेसते आणि नंतर पंजाबी पोशाख घालते; पण त्या दिवशी ‘मला साडी पालटू नये’, असेच वाटत होते. त्यामुळे मी दिवसभर साडी नेसले होते.

७. आश्रमात येण्यासाठी कुटुंबियांचा विरोध मावळणे

घरातून रामनाथी येथील आश्रमात येण्यापूर्वी नेहमी कुटुंबातील सदस्य मला आश्रमात जाण्यासाठी नकार द्यायचे; परंतु या वेळी माझ्या वडिलांनी काहीच म्हटले नाही. त्या वेळी मला गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटली. आता वडील आश्रमात येण्यासाठी मला अडवणार नाहीत.

८. आश्रमात आल्यावर सेवा आणि अभ्यास दोन्हीही करता येणे

आश्रमात आल्यावर मला सेवा आणि अभ्यासही करायचा होता. आश्रमात संपूर्ण दिवसभर सेवा करून निवासस्थानी गेल्यावर मी अभ्यासही करत होते. त्या वेळी मला थकवा न येता हलकेपणा जाणवत होता आणि मला झोपही येत नसे. उलट अभ्यास आणि सेवा दोन्ही करण्यात मला पुष्कळ आनंद होत असे. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटू लागली. माझी गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

९. आश्रमात राहिल्यावर साधकांकडून पुष्कळ आनंद मिळणे

मी सर्व साधकांमध्ये गुरुदेवांचेच रूप पहाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सर्वांनी मला पुष्कळ प्रेम दिले. ते पाहून ‘हाच माझा खरा परिवार आहे’, असे मला वाटले. मला सर्व साधकांकडून पुष्कळ आनंद मिळाला आणि माझी सर्वांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. ‘व्यावहारिक जीवनात केवळ स्वार्थासाठी सर्व जण विचारतात’, याची मला जाणीव झाली; परंतु येथे आम्ही एकमेकांना फारसे ओळखतही नाही, तरीही सर्वांनी मला एवढे प्रेम दिले. त्या सर्वांबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता व्यक्त करायची आहे. सर्व संत आणि साधक यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.

‘हे गुरुदेवा, ‘आपणच माझ्याकडून साधना करून घ्यावी. मला आश्रमात १५ दिवस राहून पुष्कळ चैतन्य आणि शक्ती मिळाली. ‘मी कुठे अल्प पडते’, हे माझ्या लक्षात आणून द्यावे. मला रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करायची आहे. आपण माझे प्रारब्ध लवकर संपवून मला ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवा’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

प.पू. गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या तिन्ही मोक्षगुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. अश्विनी खत्री, उज्जैन, मध्यप्रदेश. (२८.१.२०२२)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक