Brawl In Maldives Parliament : मालदीव येथील संसदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात हाणामारी !

माले – मालदीवच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे खासदार यांच्यात प्रचंड हाणामारी आणि गदारोळ झाला. राष्ट्रपती महंमद मोइज्जू यांच्या मंत्रीमंडळाला संसदेत मंजुरी मिळणार होती. विरोधी पक्षांचे खासदार संसदेच्या सभागृहाच्या आत जाऊ लागल्यावर सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र बहुतांश खासदार त्या वेळी सभागृहात पोचले होते. संसदेचे कामकाज चालू झाल्यावर विरोधी पक्षांच्या खासदारांनी ‘संसदेचे अध्यक्ष पक्षपातीपणा करत आहेत’, असा आरोप केला आणि  त्यांच्या कानाजवळ बिगुल वाजवण्यास आरंभ केला. याला सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी विरोध केला. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या खासदारांमध्ये हाणामारी झाली.

सौजन्य : विऑन न्यूज 

मालदीवचे राष्ट्रपती मोइज्जू यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याची शक्यता !

मालदीवचा सर्वांत मोठा विरोधी पक्ष एम्.डी.पी. संसदेत राष्ट्रपती महंमद मोइज्जू यांच्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव मांडण्याची शक्यता आहे. यानंतर मोइज्जू यांच्या विरोधात महाभियोगाची प्रक्रिया चालू होईल. मालदीवचे प्रसिद्ध उद्योगपती आणि जुम्हूरी पक्षाचे नेते कासिम इब्राहिम यांनी म्हटले आहे की, चीन दौर्‍यावरून परतल्यानंतर मोइज्जू यांनी भारतावर टीका केली होती. त्यामुळे त्यांनी भारताची क्षमा मागणे आवश्यक आहे.