Citizenship Amendment Act : पुढील ७ दिवसांत देशभरात लागू होणार नागरिकत्व सुधारणा कायदा !

  • केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांनी केला दावा

  • बंगाल राज्यात लागू होऊ देणार नाही ! – तृणमूल काँग्रेस

केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर

कोलकाता (बंगाल) – मी निश्‍चिती देतो की, नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात पुढील ७ दिवसांत लागू होईल. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, हा कायदा केवळ बंगालमध्येच नाही, तर देशभर लागू होईल, असा दावा केंद्रीय मंत्री शांतनू ठाकूर यांनी केला आहे. ठाकूर हे बंगालच्या बनगावचे भाजपचे खासदार असून ते दक्षिण २४ परगणा येथील काकद्वीप येथे एका सभेला संबोधित करत होते.

१. ठाकूर यांच्या वक्तव्यावर राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा पुनरुच्चार करत म्हटले की, राज्यात कोणत्याही परिस्थितीत नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला जाणार नाही. ‘लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकांची दिशाभूल करण्यासाठी केंद्र सरकार अशा बातम्या प्रसृत करत आहे’, असा आरोप तृणमूल काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कुणाल घोष यांनी केला.

२. गेल्या महिन्यात कोलकाता येथे झालेल्या एका सभेच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ‘नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी कुणीही रोखू शकत नाही’, असे म्हटले होते.

३. यावर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, शहा यांना लोकांमध्ये फूट पाडायची आहे. पूर्वी नागरिकत्व कार्ड हे जिल्हाधिकार्‍यांचे दायित्व होते; मात्र आता ते केवळ राजकारणासाठी हिसकावून घेतले गेले आहे. त्यांना ते काहींना द्यायचे आहे आणि इतरांना ते वंचित करायचे आहे. कोणत्याही समाजाला नागरिकत्व मिळत असेल, तर ते इतरांनाही मिळायला हवे.

संपादकीय भूमिका

मुसलमानांच्या, विशेषकरून बांगलादेशातील घुसखोरांच्या लांगूलचालनावर आधारित राजकारण करणार्‍या तृणमूल काँग्रेसकडून अशी भूमिका घेतली जाणे, यात काय आश्‍चर्य ?