सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे (वय ६५ वर्षे) यांच्या चैतन्यदायी सत्संगात शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्या अनुभूती आणि लाभलेले अमूल्य मार्गदर्शन !

पू. पृथ्वीराज हजारे

१. पू. हजारेकाका यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. व्यवस्थितपणा : ‘पू. काकांच्या वस्तू आणि कपडे अत्यंत व्यवस्थित ठेवलेले असतात. त्यांकडे पाहूनही माझे मन स्थिर होते. कितीही उशीर झाला, तरीही ते स्वतःच्या वस्तू आवरून ठेवतात आणि मग झोपतात.

१ आ. काटकसरीपणा : पू. काकांच्या अनेक वस्तू पुष्कळ वर्षांपूर्वी घेतलेल्या आहेत. एकदा मी त्यांना त्यांच्या एका ‘पाऊच’बद्दल विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘हा ‘पाऊच’ १२ वर्षांपूर्वी घेतलेला आहे.’’ पू. काका नवीन वस्तू आणल्यावर त्यावर वस्तू आणल्याचा दिनांक घालून ठेवतात.

१ इ. साधकाला व्यायामाचे महत्त्व सांगून व्यायाम करण्यास प्रोत्साहन देणे : मी प्रतिदिन व्यायाम करण्यास जात असे. काही वेळा मला व्यायाम करायचा कंटाळा यायचा. ‘व्यायामाला जाऊ नये’, असे मला वाटायचे. त्या वेळी पू. काका मला व्यायामाचे महत्त्व सांगून व्यायाम करण्यास प्रोत्साहन द्यायचे. त्यांनी मला सांगितले, ‘‘एखाद्या कृतीत सातत्य आणण्यासाठी ती कृती प्रतिदिन जाणीवपूर्वक करावी लागते. काही दिवसांनी तिचे महत्त्व आपल्या मनाला पटते आणि आपोआपच त्या कृतीत सातत्य येते.’’

१ ई. गुरुकार्याची तीव्र तळमळ : पू. काकांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या द्वितपपूर्ती वर्धापदिनानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकाचे पूजन केले. पूजन झाल्यानंतर त्यांनी ‘दैनिकाचे वितरण वाढण्यासाठी समष्टी ध्येय काय ठेवले ?’, असे साधकांना विचारले. त्या वेळी पू. काका बोलत असतांना त्यांच्यातील ‘व्यापकता, गुरुकार्य आणि गुरूंचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची तळमळ’ पाहून माझी भावजागृती झाली.

१ उ. समष्टी भाव : पू. काका प्रतिदिन सूर्यनारायणाला प्रार्थना करतात. एकदा मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही काय प्रार्थना करता ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी सूर्यदेवाचा मंत्र म्हणतो आणि ‘त्यातून मिळणारे चैतन्य सर्व साधकांना मिळू दे’, अशी प्रार्थना करतो.’’ ‘मी माझ्यासाठी काहीच मागत नाही’, असे त्यांनी अत्यंत प्रांजळपणे सांगितले.

२. पू. हजारेकाकांची सेवा करत असतांना आलेल्या अनुभूती

श्री. दीप पाटणे

२ अ. मला काही दिवसांसाठी पू. हजारेकाकांचे कपडे धुण्याची सेवा मिळाली होती. त्यांचे कपडे हातात घेतल्यापासून ते धुऊन वाळत घालीपर्यंत माझे मन स्थिर आणि निर्विचार असायचे.

२ आ. ‘हे कपडे परात्पर गुरु डॉक्टरांचेच आहेत’, असा भाव माझ्याकडून आपोआप ठेवला जायचा आणि ती सेवा भावपूर्ण केली जायची.

२ इ. मी पू. काकांच्या तळपायांना तेल लावून काश्याच्या वाटीने घासत असे. तेव्हा पू. काकांच्या चरणांना स्पर्श झाल्यावर मला कृतज्ञता वाटायची आणि सेवेमध्ये शरणागती अन् लीनता अनुभवायला मिळायची.

२ ई. रुग्णाईत असतांनाही आनंदी आणि स्थिर असणे : एकदा पू. काका रुग्णाईत होते. त्यांना ‘सायटिका’चा पुष्कळ त्रास होत होता. तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर त्रास होत असल्याचा लवलेशही दिसत नव्हता. त्यांना पुष्कळ त्रास होत असतांनाही ते आनंदी आणि स्थिर होते. त्या वेळीही ते सेवा करत होते.

२ उ. ते रुग्णाईत असतांना मी त्यांना प्रसाद आणि महाप्रसाद देण्याची सेवा करत होतो. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांची आठवण येऊन माझी पुष्कळ भावजागृती झाली.

२ ऊ. पू. काकांची सेवा करतांना मी कृतज्ञता, शरणागती, स्थिरता, आनंद आणि निर्विचार स्थिती अनुभवू शकलो.

३. पू. हजारेकाकांच्या सहवासात असतांना आलेल्या अनुभूती

३ अ. घरी जाऊन आल्यावर मन अस्थिर असतांना पू. हजारेकाकाच्या सेवेला जाण्याचा निरोप मिळणे आणि त्या वेळी आनंद होणे : मी २ मास वैयक्तिक कामासाठी घरी गेलो होतो. त्यानंतर आश्रमात आल्यावर माझ्या मनात ‘मी आश्रमात पूर्वीसारखा रमेन का ? माझ्या मनात मायेतील विचार येणार नाहीत ना ?’ अशा प्रकारचे अनेक विचार येऊन माझे मन अस्थिर झाले होते. त्या वेळी मला साधकांकडून ‘तुला पू. हजारेकाकांच्या सेवेला जायचे आहे’, असा निरोप आला. तेव्हा ‘पू. हजारेकाकांच्या समवेत रहायला मिळणार’, या विचाराने मला पुष्कळ आनंद झाला.

३ आ. पू. काकांच्या सेवेत राहिल्याने माझ्यावर आलेले त्रासदायक आवरण न्यून होऊन माझ्या मनातील निरर्थक विचार उणावले.

३ इ. पू. काकांचा आवाज मधुर आहे. ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे मला वाटते.

३ ई. सकाळी लवकर उठवण्यासाठी गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर सकाळी ६ – ७ वेळा कुणाचा तरी स्थुलातून स्पर्श जाणवणे आणि पू. काकांनी ‘देवाने तुला उठवले’, असे सांगणे : एकदा मला सकाळी लवकर उठायचे होते. त्या वेळी मी घड्याळात गजर लावला आणि गुरुदेवांना ‘तुम्हीच मला सकाळी लवकर उठवा’, अशी प्रार्थना करून झोपलो. सकाळी गजर वाजल्यावर मला जाग आली; परंतु मी परत झोपलो. त्या वेळी मला उठवण्यासाठी माझ्या पाठीला ६ – ७ वेळा कुणीतरी स्थुलातून स्पर्श केल्याचे जाणवले. मी त्वरित मागे वळून पाहिले, तर तिथे कुणीच नव्हते. त्या वेळी मला गुरुदेवांची पुष्कळ आठवण येऊन माझी भावजागृती झाली. ही अनुभूती पू. काकांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तू देवाला प्रार्थना केली होतीस ना ! त्यामुळे देवाने तुला उठवले.’’

४. पू. हजारेकाकांनी साधनेविषयी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन

४ अ. प्रसंगातून शिकल्याने संघर्ष न होता आनंद मिळतो ! : एकदा मी पू. काकांना विचारले, ‘‘संत होण्यासाठी पुष्कळ संघर्ष करावा लागतो का ?’’ तेव्हा ते हसले आणि म्हणाले, ‘‘हो. देव प्रत्येक परिस्थितीतून आपल्याला घडवतो. एखाद्या प्रसंगात संघर्ष होत असेल, तर ‘देव आपल्याला काय शिकवत आहे ?’, याकडे लक्ष द्यायचे आणि त्यातून शिकायचे. त्यामुळे संघर्ष न होता आनंद मिळतो.’’

४ आ. साधनेची जाणीव वाढण्यासाठी पू. काकांनी करायला सांगितलेला प्रयत्न : एकदा मी पू. काकांना विचारले, ‘‘साधनेची जाणीव वाढण्यासाठी मी कोणते प्रयत्न करू ?’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘साधनेला प्रोत्साहन देणारी वाक्ये एका ठिकाणी लिहून ठेवायची आणि ती प्रतिदिन वाचायची. त्यामुळे हळूहळू जाणीव वाढत जाते. त्यांनी उदाहरण म्हणून त्यांच्या रोजनिशीमध्ये (‘डायरी’मध्ये) लिहिलेले एक वाक्य मला सांगितले. ते असे होते, ‘प्रेमभावाने मी साधकांचे मन जिंकू शकत नसेन, तर सर्वव्यापी ईश्वराचे मन कसे जिंकणार ?’’हे वाक्य मी एकदाच वाचल्यावर माझ्या मनात ‘प्रेमभाव आणि इतरांचा विचार’, हे गुण कसे वाढवू शकतो ?’, याचे चिंतन चालू झाले अन् मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

४ इ. ‘दिसेल ते कर्तव्य’, या भावाने प्रयत्न करावेत ! : पू. काका ‘लहान लहान कृतीतून साधना कशी होते ?’, हे सांगतांना म्हणाले, ‘‘येता-जाता कचरा पडला असेल, तर तो उचलणे, अनावश्यक दिवा बंद करणे, कुठे काही अव्यवस्थित दिसले, तर ते व्यवस्थित करणे’, या सर्व कृती दिसायला लहान आहेत; पण त्याही करण्यास आपल्या मनाची सिद्धता नसते. अशा लहान लहान कृतींमधूनही आपली साधना होते आणि असे प्रयत्न सातत्याने करत राहिल्याने आपली अध्यात्मात प्रगती होते.’’

४ ई. एकदा मी पू. काकांना विचारले, ‘‘वैयक्तिक कृतींमधूनही साधना कशी होते ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपल्याला चांगले करण्याची सवय लागते आणि आपल्यात तो गुण निर्माण होऊ लागतो.’’

४ उ. एकदा पू. काका म्हणाले, ‘‘आपण प्रतिदिन ३० मिनिटे तरी स्वतःसाठी वेळ काढून ‘मी कुठे न्यून पडलो ?’, याचे चिंतन करून त्यावर प्रयत्नांची दिशा ठरवायला हवी.’’

४ ऊ. ‘मला पूर्वी अंधाराची फार भीती वाटायची. त्यावर स्वयंसूचना दिल्यानंतर माझ्या मनातील भीती न्यून झाली’, असे मी पू. काकांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘साधनेने ‘देव सतत समवेत आहे’, असा भाव वाढत जातो. साधनेने मनुष्य निर्भय होतो.’’

५. स्वतःच्या साधनेविषयी सांगितलेली सूत्रे

५ अ. साधकांना त्वरित साहाय्य करणे : वर्ष २०१० मध्ये पू. काकांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती आणि त्यानंतर वर्ष २०१२ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ७१ टक्के होऊन ते संत झाले’, असे मला कळले. तेव्हा मी त्यांना ‘तुम्ही कसे प्रयत्न केले ?’, असे विचारले. त्या वेळी ते हसले आणि म्हणाले, ‘‘माझ्याकडे कुणी साधक अडचण घेऊन आला किंवा त्याने काही साहाय्य मागितले, तर मी त्यांना त्वरित साहाय्य करायचो.’’

५ आ. देहभान हरपून सेवा करणे : पू. काका पुढे म्हणाले, ‘‘मी सेवा करत असतांना मला वेळेचेही भान रहात नसे. घड्याळाकडे पाहिल्यावर उशीर झाल्याचे लक्षात यायचे आणि झोपण्याची वेळ झाली की, ‘झोपायला जायला हवे’, याची जाणीव व्हायची.’’

५ इ. ‘जगात जे लोक यशस्वी झाले, ते कसे झाले ? त्यांच्यामध्ये कोणते गुण आहेत ? कोणती कौशल्ये आहेत ?’, याचा अभ्यास पू. काका करतात.

६. पू. काकांनी सांगितलेले त्यांच्या हसण्याचे रहस्य !

एकदा पू. काका निरागसतेने हसत होते. त्या वेळी त्यांच्याकडे पाहून माझ्या मनात प्रश्न आला, ‘संत सतत आनंद कसा अनुभवत असतील ?’ मी त्यांना हा प्रश्न विचारला असता ते निरागसपणे म्हणाले, ‘‘मला आतूनच आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. त्यामुळे तो चेहर्‍यावरही दिसतो.’’

७. परात्पर गुरु डॉक्टरांप्रतीचा भाव

पू. काका परात्पर गुरु डॉक्टरांविषयी घडलेले जुने प्रसंग आणि आठवणी सांगतात. त्या वेळी प्रत्येक प्रसंगातून त्यांचा गुरुदेवांप्रतीचा भाव प्रकर्षाने जाणवतो.

८. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘प.पू. गुरुदेव, मला वाटायचे, ‘मला कधी तुमची सेवा करायला मिळेल का ? तुमचा सहवास कधी अनुभवायला मिळेल का ?’ ‘माझ्या मनातील या इच्छा जाणून तुम्ही मला पू. हजारेकाकांच्या समवेत ठेवले आणि त्या इच्छा पूर्ण केल्या’, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता ! ‘हे गुरुमाऊली, पू. काकांच्या सहवासात ज्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्या मला कृतीच्या स्तरावर आचरणात आणता येऊ दे. ‘मला माझे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून गुणवृद्धीसाठी माझ्याकडून सातत्याने अन् चिकाटीने प्रयत्न होऊ देत’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करतो.’

– श्री. दीप संतोष पाटणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.६.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक