महाकुंभची भूमी वक्फ बोर्डाची असल्याचे विधान केल्याचे प्रकरण
प्रयागराज – येथील महाकुंभाची भूमी वक्फ बोर्डाची असल्याचे विधान केल्याच्या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेने मौलाना शहाबुद्दीन यांच्याविरुद्ध येथील सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. मौलानांनी धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या संदर्भात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. विहिंपच्या कायदा विभागाचे संयोजक तथा अलाहबाद उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अरविंद कुमार भारद्वाज यांनी ही तक्रार प्रविष्ट केली. या वेळी सर्वश्री ब्रिजेश ओम प्रकाश सिंह, अखिलेश शुक्ला, विनय पांडे, प्रताप सिंग, जयराज सिंग तोमर, अमरेश तिवारी, वीरेंद्र सिंग राजभर, शिव गोपाल सिंग, राम आधार, जितेंद्र पाल सिंग जदौन, डी. त्रिपाठी, राजन शर्मा, आदी उपस्थित होते.
या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, प्रयागराजमधील पावन भूमीवर अनादि काळापासून कुंभमेळा भरत आहे. चंद्रगुप्त मौर्य यांच्या कार्यकाळात काही विदेशी प्रवाशांनी त्यांच्या पुस्तकात प्रयागराज येथे कुंभमेळा भरत असल्याचा उल्लेख केला आहे. अशात मौलानांचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करून समाजात भांडणे लावणारे आहे. त्यांचे हे तथ्यहीन विधान हे हिंदु धर्माची प्रतिमा मलीन करण्याचा केलेला प्रयत्न आहे.