रत्नागिरी – अयोध्येतील श्रीराममंदिर स्थापनेचा आनंद देशभर उत्साहात साजरा झाला. रत्नागिरीतील प्रसिद्ध अशा टिळकआळीतील श्री लोकमान्य सहकारी गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांनी एकत्र येत श्रीराममंदिराची भव्य रंगावली साकारली. तसेच रामरक्षा पठण करून आनंदोत्सव साजरा केला. सर्व रहिवाशांनी पारंपरिक वेशभूषा केली होती.
श्री लोकमान्य गृहनिर्माण संस्थेतील प्रा. (सौ.) तेजश्री भावे यांनी श्रीराममंदिर आणि श्री रामललामूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सर्वांनी मिळून रंगावली व कार्यक्रम करूया, अशी संकल्पना मांडली. सर्व सभासद, महिलांनी ही संकल्पना उचलून धरली आणि रंगावली साकारली. ३० फूट बाय २० फुटांची श्रीराममंदिराची रंगावली साकारली.याकरिता ८० किलो रंगावली लागली. रंगावली साकारण्यासाठी सुमारे १६ तास लागले. ही रंगावली अवनी मुकादम, जिया आणि केदार पेजे, रिद्धि हजारे, सोनाली चव्हाण, पौर्णिमा साठे, तेजश्री भावे, सुनेत्रा गिजरे, सीमंतिनी करमरकर यांनी काढली. विशेष साहाय्य स्वरूप साळवी यांचे लाभले. सभासदांनीही सहकार्य केले. या रंगावलीसह ‘जय श्रीराम’ लिहून त्यावर पणत्या ठेवून दीपोत्सवही साजरा करण्यात आला. त्यानंतर सामूहिक रामरक्षा पठण कार्यक्रम झाला आणि स्नेहभोजनाने सांगता झाली.