पू. पृथ्वीराज हजारे यांच्या ‘वाहन चालवतांना मिळणारी गुणसंवर्धनाची संधी’ याविषयीच्या मार्गदर्शनातून श्री. हर्षद खानविलकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे

पू. पृथ्वीराज हजारे यांच्याकडून श्री. हर्षद खानविलकर यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. पृथ्वीराज हजारे

१. वाहन चालवतांना गुणसंवर्धन करण्याविषयीची पू. पृथ्वीराज हजारे यांनी सांगितलेली सूत्रे

‘कोरोनामुळे उद्भवलेल्या दळणवळण बंदीच्या कालावधीनंतर साधारणतः दीड वर्षांनी गुरुकृपेने आमचे हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत प्रसार सेवेसाठी विविध जिल्ह्यांमधील दौर्‍यांचे नियोजन चालू झाले. कोरोनाच्या दृष्टीने समाजातील गर्दीशी संपर्क येऊ नये, यासाठी आमचे चारचाकी वाहनाने प्रवास करण्याचे नियोजन करण्यात आले होते. २७.९.२०२२ या दिवशी मी नगर जिल्ह्यात असतांना मला सनातनचे २५ वे संत पू. पृथ्वीराज हजारे यांचा भ्रमणभाष आला. त्यांनी ‘दौरा कसा चालू आहे ?’, यासंदर्भात माझ्याकडे सहज विचारणा केली. त्यानंतर पू. हजारेकाकांनी ‘वाहन चालवतांना गुणसंवर्धन करण्याची पुष्कळ मोठी संधी असते’, असे सांगून ‘ते कसे करू शकतो ?’, या संदर्भातील काही सूत्रे मला सांगितली.

श्री. हर्षद खानविलकर

अ. ‘‘चालकाने गाडी ‘ओव्हरटेक’ करतांना (पुढच्या गाडीच्या पुढे स्वतःची गाडी नेतांना) ‘पासिंग लाईट’ (आपल्या समोरील वाहनाला लाईटद्वारे केलेला इशारा) दिल्यास आणि ‘हॉर्न’(भोंगा) वाजवल्यास ‘इतरांचा विचार करणे’, हा गुण वाढतो. इतरांना आपण सतर्क करून पुढे जातो.

आ. दुसर्‍या गाडीतील चालक त्याची गाडी आपल्या गाडीच्या पुढे काढत असतांना (तो वाहन क्रॉसिंग करतांना), त्याला तसे करू द्यावे. तेव्हा आपल्याला ‘कमीपणा घेणे’ आणि ‘माघार घेणे’, हे गुण वाढवण्याची संधी असते. अशा प्रकारे तू निरीक्षण करू शकतोस.’’

हे ऐकल्यावर मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘देव मला साधनेसाठी किती साहाय्य करत आहे !’, असा विचार माझ्या मनात येऊन मी त्यानुसार प्रयत्न करायला आरंभ केला. ‘आरंभी वाहन चालवतांना चुका कुठे होत नाहीत ना ?’, हा माझा विचार अधिक असायचा आणि मी ते निरीक्षण करण्याचा प्रयत्न करायचो. पू. हजारेकाकांनी सांगितल्यानंतर गुणसंवर्धनाचे प्रयत्न करत वाहन चालवत असतांना त्यादृष्टीने झालेले माझे चिंतन, लक्षात आलेले विविध पैलू आणि झालेले प्रयत्न पुढे देत आहे.

२. गुणसंवर्धनासाठी प्रयत्न करत असतांना झालेले चिंतन आणि लक्षात आलेले विविध पैलू

२ अ. वेगमर्यादेच्या नियमांचे पालन केल्याने ‘संयम’ गुण वाढणे : महामार्गाने (हायवेने) किंवा द्रुतगती महामार्गाने (एक्सप्रेस हायवेने) जातांना मार्ग मोकळा दिसल्यावर ‘वाहन वेगमर्यादेच्या पुढे जाऊ नये, यासाठी मला ‘संयम’ हा गुण वाढवायचा आहे’, असा माझा विचार देवाच्या कृपेने व्हायचा. अनेकदा मोकळा मार्ग दिसल्यावर ‘आपल्याला गुणसंवर्धन करायचे आहे’, हा विचार मनात चालू झाल्यामुळे मला गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवता आले.

२ आ. नियमानुसार दर्शवलेल्या लेन’मधून गेल्याने ‘शिस्त’ हा गुण वाढवण्याचा प्रयत्न होणे : वाहन चालवतांना मला ‘शिस्त’ हा महत्त्वाचा गुण शिकायला मिळाला. ‘लेन’ची (वाहनांसाठी ठरवलेल्या रांगेची) शिस्त पाळा’, असा फलक (बोर्ड) प्रत्येक महामार्गावर लावलेला असतो; पण त्याकडे पहातांना गुणांच्या दृष्टीने माझा कधी विचार झाला नव्हता. या वेळी गाडी चालवतांना ज्या रांगेतून (लेनमधून) जायचे आहे, ती रांग पकडूनच गाडी चालवण्याचा माझा प्रयत्न झाला. ‘शिस्त पाळून वाहन चालवल्याने आपल्यावर शिस्तीचा संस्कार होतो आणि आपल्या अयोग्य पद्धतीने गाडी चालवल्यामुळे इतरांना होणारा त्रास टळतो, तसेच आपला प्रवासही सुखरूप होतो’, हे माझ्या लक्षात आले.

२ इ. ‘रात्रीची गाडी चालवण्याची सवय होईल’, असे पू. हजारेकाकांनी सांगणे आणि त्यांच्या या संकल्पाचा लाभ झाल्याचे जाणवणे : रात्रीच्या वेळी डोळ्यांवर येणार्‍या समोरच्या गाड्यांच्या दिव्यांच्या प्रकाशाच्या झोतामुळे मला त्रास व्हायचा. पू. काकांनी ‘तुला रात्रीची गाडी चालवण्याची हळूहळू सवय होईल’, असे मला सांगितले होते. पू. काकांच्या या वाक्याने माझा आत्मविश्वास पुष्कळ वाढल्याचे मला जाणवले. जणू काही ‘त्यांनी माझ्यासाठी संकल्प केला’, असेच मला वाटले. त्या दिवसापासून मला रात्रीचे वाहन चालवतांना कधीच अडचण आली नाही. ‘देवानेच पू. काकांच्या संकल्पानुसार गाडी चालवून घेतली’, असे मला अनुभवायला मिळाले.

२ ई. ‘सतर्कता, जाणीव, शिस्त आणि वाहन योग्य प्रकारे चालवण्याची पद्धत’ यांची जाणीव करून देणारे मार्गातील फलक म्हणजे गुणवृद्धीचे मोठे साधनच ! : मार्गांवर निरनिराळी वाक्ये (सुवचने) लिहिलेले फलक (बोर्ड) लावलेले असतात, उदा. ‘लेनची शिस्त पाळा’, ‘अती घाई संकटात नेई’, ‘मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ ‘पुढे शाळा आहे’, ‘अपघाती वळण आहे. वाहने सावकाश चालवा’ इत्यादी. हे सर्व फलक म्हणजे देवाने दिलेले ‘गुणवृद्धीचे पुष्कळ मोठे साधन आहे’, असे मला वाटले. या आधी माझा या फलकांच्या संदर्भात कधी असा विचार झाला नव्हता. ‘या फलकांवरील सूचनांच्या आधारे जरी वाहन चालवले, तरी पुष्कळ गुणांची वृद्धी प्रत्येकामध्ये होऊ शकते’, असे माझ्या लक्षात आले.

३. संत म्हणजे ‘साक्षात् भगवंताचे रूपच’, या वाक्याची प्रचीती येणे

संत जीवनात असणे, अतिशय महत्त्वाचे आहे. ‘प्रत्येक कृतीच्या माध्यमातून साधना कशी करू शकतो ?’, हे गुरूंच्या नंतर संतच शिकवतात. साक्षात् संतांनी दाखवलेल्या मार्गाने मार्गक्रमण करतांना मिळणारा आनंद हा वेगळाच असतो, हे मला शिकायला मिळाले. माझी काहीच पात्रता नसतांना देवाने या दैवी प्रवासात जवळपास ५ सहस्रांहून अधिक किलोमीटरचा प्रवास ३८ दिवसांमध्ये करवून घेतला आणि मला त्यातील आनंद अनुभवण्याची अन् शिकण्याची संधी दिली. ‘संत म्हणजे साक्षात् भगवंताचे रूपच’, या वाक्याची प्रचीती देणार्‍या संतांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.

गुरुदेव, सद्गुरु आणि संत यांच्या चरणी मी वरील अनुभूतींसाठी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. हर्षद खानविलकर

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक