२४ जानेवारी २०२४ या दिवशीच्या अंकात आपण श्री. संकेत कुलकर्णी यांना असलेली नामजपाची आवड, त्यांना असलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाण्याची ओढ आदी सूत्रांविषयी जाणून घेतले. आजच्या लेखात श्री. संकेत कुलकर्णी संतपदी विराजमान झाल्यानंतर त्यांच्या आईला त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे दिली आहेत. (भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/757755.html
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा लाभलेला सत्संग !
५ इ. घरी दूरभाषची (फोनची) सुविधा उपलब्ध झाल्यावर संकेतने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी बोलणे आणि तेव्हापासून त्याने ‘परम पूज्य माझे आहेत’, असे सांगणे : वर्ष १९९६ – १९९७ मध्ये आमच्याकडे दूरभाषची (टेलीफोनची) सुविधा उपलब्ध झाली. तेव्हा संकेत उत्साहाने म्हणाला, ‘‘मला प.पू. डॉक्टरांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) बोलायचे आहे. त्यांना दूरभाष लावून दे.’’ आम्ही दूरभाष केल्यावर परात्पर गुरु डॉक्टर संकेतशी ५ – ६ मिनिटे बोलले. संकेतने आजी-आजोबांना सांगितले, ‘‘परम पूज्य माझे आहेत.’’ तेव्हापासूनच संकेत दिवसातून २ – ३ वेळा तरी ‘परम पूज्य माझे आहेत’, असे सांगत असे. तेव्हा ‘त्याचे बोलणे ऐकत रहावे’, असे मला वाटत असे.
५ ई. संकेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणे : मी संकेतला समवेत नेऊन प्रचारसेवा करत होते. एकदा वर्ष १९९८ मध्ये लांजा येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकांना मार्गदर्शन होते. तेव्हा आमची त्यांच्याशी भेट झाली. त्यानंतर मी आणि संकेत पुष्कळ दिवस भावावस्थेत होतो. तेव्हा ‘मला तर माझे विश्वच पालटले आहे’, असे जाणवत होते. मला परात्पर गुरुदेवांचे सतत स्मरण होत होते. ‘संकेत परात्पर गुरु डॉक्टरांच्या भेटीपासून त्यांच्या अनुसंधानात आहे’, असे माझ्या लक्षात आले.
६. संकेतला लाभलेले संतांचे कृपाशीर्वाद
६ अ. प.पू. जोशीबाबा, पू. काडसिद्धेश्वर महाराज, पू. बेजन देसाई, प.पू. शामराव महाराज आणि प.पू. परूळेकर महाराज यांनी ‘संकेत तुमच्या कुळाचा उद्धार करण्यासाठी आला आहे’, असे सांगणे अन् कुटुंबियांनी संकेतची निरपेक्षभावाने सेवा करणे : आम्ही साधनेला आरंभ केल्यापासून आम्हाला अनेक संतांचा सत्संग लाभला. त्या संतांनी संकेतला पुष्कळ प्रेमाने कृपाशीर्वाद दिला. प.पू. जोशीबाबा, पू. काडसिद्धेश्वर महाराज, पू. बेजन देसाई, प.पू. शामराव महाराज आणि प.पू. परूळेकर महाराज या संतांनी आम्हाला सांगितले, ‘‘संकेतला पुष्कळ जपा आणि याची सेवा करा. हा तुमच्या कुळाचा उद्धार करण्यासाठी आला आहे.’’ तेव्हापासून आमची संकेतकडे पहाण्याची दृष्टी पालटली. आम्ही साधनेत येण्यापूर्वीही संकेतची सेवा करतांना ‘त्याचे कसे करू ?’, असा विचार कधीच केला नाही; मात्र संतांनी सांगितल्यापासून आम्ही त्याची सेवा निरपेक्षभावाने करू लागलो.
७. संकेतची आध्यात्मिक उन्नती होणे
१५.९.२०१३ या दिवशी आमच्या मुलीच्या लग्नानिमित्त घरी सत्यनारायण पूजा होती. त्याचे औचित्य साधून सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘संकेतची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के झाली’, असे घोषित केले.
८. वर्ष २०१६ मध्ये आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग लाभला. तेव्हा ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही आता संकेतची काळजी करू नका. तो साधनेत पुढे गेला आहे. तुम्ही तुमच्या साधनेचा विचार करा.’’
९. २४.५.२०१९ या दिवशी मिरज येथील सनातनच्या आश्रमात पू. संकेतदादांचा संतसन्मान सोहळा झाला.
१०. पू. संकेतदादांविषयी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
अ. आमच्या घरी काही साधक ‘ऑनलाईन’ स्वभावदोष आणि अहं-निर्मूलन सत्संग ऐकण्यासाठी येत असत. तेव्हा पू. दादाही गांभीर्याने ते सत्संग ऐकत असत. ‘आम्हीही ते सत्संग गांभीर्याने ऐकावेत’, यासाठी पू. दादा सतत आम्हाला सांगत असत. ते कधी कधी हातातील वस्तू टाकून देऊन आमचे लक्ष वेधून घेत आणि आमच्याकडे रागाने पहात असत.
आ. आमच्याकडून काही चूक झाली आणि आम्ही ती गांभीर्याने स्वीकारली नाही, तर पू. दादा ‘अल्पाहार न करणे, दिवसातून एकदाच जेवणे’, असे प्रायश्चित्त घेतात.
इ. साधक आमच्या घरी आल्यावर पू. दादांना नमस्कार करत. तेव्हा पू. दादा प्रत्येक साधकाशी वेगळे वागत. ते कधी काही जणांकडे दुर्लक्ष करत, तर काही जणांकडे बघून गोड हसत. काही साधक पू. दादांना नमस्कार करत असतांना पू. दादा साधकाच्या मस्तकावर हात ठेवत.
ई. साधक पू. दादांना भेटायला आल्यावर पू. दादांमधील चैतन्य जागृत होऊन साधकांना आध्यात्मिक लाभ होतात. साधकांना त्या उपायांचा परिणाम पुष्कळ वेळ जाणवतो. पू. दादा साधकांशी त्यांच्या प्रकृतीनुसार बोलतात.
उ. वर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीत पू. दादांना आध्यात्मिक त्रास झाले. तेव्हा पू. दादांना अपचन, पोटात दुखणे, झोप न लागणे इत्यादी त्रास होत होते. तेव्हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार आम्ही (मी आणि माझे यजमान श्री. गुरुदास) पू. दादांसाठी ३ घंटे बसून नामजपादी उपाय करत होतो.
ऊ. या कालावधीत आमच्या कुटुंबात मनाला अस्थिर करणारे अनेक प्रसंग घडले. आम्ही सतत तणावात होतो; मात्र या वातावरणाचा पू. दादांच्या साधनेवर कधीच परिणाम झाला नाही. तेव्हा ते सतत साधनारत होते.
ए. त्यांचे जन्मतःच लघवी होण्यावर नियंत्रण नव्हते. त्यामुळे त्यांचे कपडे सतत पालटावे लागत; पण जशी त्यांची अंतर्मुखता वाढत गेली, तसे त्यांचे लघवीवरील नियंत्रण वाढत गेले. आता दिवसातून ४ वेळाच त्यांचे कपडे पालटावे लागतात. यासाठी आम्ही कोणताही उपाय केला नाही. देवाच्या कृपेने हे पालट होत गेले
ऐ. पू. संकेतदादांची जन्मापासूनच अंगकांती नितळ आणि गोरी आहे. त्यांना ३४ वर्षे पूर्ण झाली, तरीही त्यांची अंगकांती तशीच नितळ आणि गोरी आहे. त्यांचे हात आणि पाय आताही कापसासारखे मऊ आहेत. त्यांना सतत लघवी होत होती, तरीही त्यांना कधीच शय्याव्रण (‘बेडसोर्स’) झाले नाहीत. त्यांना जंतूसंसर्ग होऊ नये, यासाठी गोळी चालू आहे. त्यांना या व्यतिरिक्त कोणतीही औषधे चालू नाहीत.
११. पू. संकेतदादा संतपदी विराजमान झाल्यावर त्यांना अनिष्ट शक्तींनी त्रास देणे आणि त्यांचे कपडे काही मासांतच जीर्ण होणे
पू. संकेतदादा संत झाल्यानंतर काही मासांनंतर त्यांना अनिष्ट शक्तींनी त्रास देण्याचे प्रमाण वाढले. तेव्हा त्यांचे कपडे १ – २ मासांत जीर्ण होत असत. त्यांचा सदरा आणि पायजमा यांची जाळी होत असे.
१२. पू. संकेतदादा संतपदी विराजमान झाल्यावर वास्तूत झालेले पालट
पू. संकेतदादा संतपदी विराजमान झाल्यावर आमच्या वास्तूत पालट झाले. आमच्या वास्तूत शांत वाटते. वास्तूतील लादीचा रंग पालटला आहे आणि लादी गुळगुळीत झाली आहे.
१३. कृतज्ञता
पू. संकेतदादांच्या आतापर्यंतच्या साधनेतील वाटचालीविषयी कृतज्ञता ! आम्हाला पू. संकेतदादांचे माता-पिता होण्याचे भाग्य लाभले, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. गुरुमाऊली, पू. संकेतदादांना जाणून घेणे आणि त्यांच्याविषयी लिहिणे, हे माझ्या दृष्टीने शिवधनुष्यच आहे. आपणच मला ते पेलवण्याचे सामर्थ्य दिले. गुरुदेव, आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (समाप्त)
– सौ. सुजाता कुलकर्णी (पू. संकेत कुलकर्णी यांच्या आई), ढवळी, फोंडा, गोवा (२३.३.२०२२)
|