बालपणापासूनच दैवी गुण आणि नामजपाची आवड असलेले सनातनचे ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी (वय ३४ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पौष शुक्ल चतुर्दशी (२४.१.२०२४) या दिवशी सनातनचे ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी यांचा ३४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईला त्यांच्या विषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत. (भाग १)

पू. संकेत गुरुदास कुलकर्णी

पू. संकेत गुरुदास कुलकर्णी यांच्या चरणी त्यांच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

‘माझ्या मुलाच्या (संकेतच्या) जन्मापूर्वी आम्ही चमचमीत खाणे, मौजमजा करणे आणि चित्रपट पहाणे, असे सुखासीन जीवन जगत होतो. आमचे सासरे ‘थिएटर मॅनेजर’ होते. आम्ही चित्रपट पाहून त्यातील आभासी जीवनात रमून जात होतो. ९.१.१९९० या दिवशी आमच्या मुलाचा (संकेतचा) जन्म झाला. तो जन्मतःच अपंग आहे. त्यांच्या जन्मानंतरच आमची साधना खर्‍या अर्थाने चालू झाली. तो संतपद गाठेपर्यंत त्याचा साधनाप्रवास येथे दिला आहे.

१. संकेतच्या बालपणी त्याला झालेले त्रास 

सौ. सुजाता गुरुदास कुलकर्णी

१ अ. संकेतच्या जन्मानंतर त्याला तिसर्‍याच दिवशी रक्त द्यावे लागणे आणि त्याची सहनशीलता पाहून आश्चर्य वाटणे : संकेतच्या जन्मानंतर तिसर्‍याच दिवशी त्याला रक्त द्यावे लागले. त्या वेळी तो मोठ्या माणसाप्रमाणे निपचित पडून राहिला. रात्री १.३० वाजता त्याला लावलेली रक्ताची बाटली काढल्यानंतर त्याने हातपाय हलवले आणि तो आमच्याकडे पाहून हसला. तेव्हा त्याची सहनशीलता पाहून आम्हाला आश्चर्य वाटले. रुग्णालयात त्याच्या वयाची मुले पुष्कळ रडत असत; पण संकेत कधीच रडला नाही. रुग्णालयातील सर्व कर्मचारी संकेतची स्वच्छता किंवा खोलीची स्वच्छता मनापासून करत असत.

१ आ. ‘संकेत कधीच चालू शकणार नाही’, हे समजल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसणे; मात्र त्याच्या बाललीला पहातांना सर्वांना दुःखातून बाहेर पडण्यास साहाय्य होणे : संकेतच्या जन्मापूर्वी माझ्या भावाचा विजेचा धक्का लागून जागच्या जागी मृत्यू झाला होता. त्यानंतर ६ मासांनी संकेतचा जन्म झाला. भावाच्या मृत्यूच्या धक्क्यातून मी सावरत असतांनाच ‘संकेत कधीच चालू शकणार नाही’, असे समजल्यानंतर मला मोठा धक्का बसला; मात्र संकेतच्या बाललीला पाहून आम्हाला त्या दुःखातून बाहेर पडण्यास साहाय्य झाले. संकेतच्या भोवतीच आमचे जग होते. त्याच्या हसण्याने घर हसत होते. ही आमच्यावरील भगवंताची पुष्कळ मोठी कृपा होती.

१ इ. संकेतला ४ वर्षांपर्यंत बोलता न येणे आणि त्याचे शस्त्रकर्म झाल्यावर तो बोलू शकणे : त्याची पडजीभ टाळूला चिकटली असल्याने त्याला ४ वर्षांपर्यंत बोलता येत नव्हते. आम्ही बोललेले त्याला कळायचे; पण ‘तो काय बोलत आहे ?’, हे आम्हाला समजत नसे. तेव्हा तो त्याच्या पायाचा अंगठा चावून पुष्कळ रडत असे. ‘त्याला काय हवे आहे ?’, ते आम्हाला कळत नसे. नंतर त्याचे शस्त्रकर्म झाल्यानंतर तो बोलू लागला.

२. संकेत लहान असतांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

२ अ. संकेतच्या जन्मानंतर ८ ते १० दिवसांनी माझ्या सासर्‍यांनी (कै. विनायक कुलकर्णी यांनी) सांगितले, ‘‘संकेत आपल्या घराण्यातील कुणीतरी मोठा पुण्यात्मा आहे.’’

२ आ. शाळेत आवडीने जाणे : संकेतला असलेल्या शारीरिक व्याधीमुळे त्याला सर्वसाधारण मुलांसाठी असलेल्या शाळेत जाऊन शिक्षण घेणे शक्य नव्हते. आम्ही त्याला मतिमंद मुलांसाठी असलेल्या शाळेत घातले. तेथे मुलांच्या शारीरिक स्वच्छतेची काळजी घेतली जात असे. तेथे मुलांना लहान-सहान कृती करण्याचे शिक्षण दिले जात असे.  संकेतला शाळेत जायला पुष्कळ आवडत असे. त्याला शाळेच्या ‘बस’मध्ये बसवून देणे आणि आणणे, हे आम्हाला पुष्कळ अवघड वाटत असे; मात्र त्याचा आनंदी चेहरा पाहून आम्हाला पुष्कळ आनंद होत असे.

२ इ. नीटनेटकेपणा : संकेत शाळेत गेल्यावर त्याच्या शिक्षिकेने वर्गातील एका मुलाला संकेतचे दप्तर सर्वांची दप्तरे ठेवतात, त्या ठिकाणी नेऊन ठेवायला सांगितले. त्या मुलाने संकेतचे दप्तर व्यवस्थित ठेवले नव्हते. ते पाहिल्यावर संकेत तेथे रांगत गेला आणि त्याने त्याचे दप्तर व्यवस्थित ठेवले.

२ ई. सभाधीटपणा : संकेत शाळेतील स्नेहसंमेलनात भाग घेत असे. शाळेत पाहुणे आल्यावर संकेतला स्वागतगीत म्हणायला आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायला आवडत असे. तो श्रीरामरक्षास्तोत्र पठणाच्या स्पर्धेत भाग घेत असे.

२ उ. साधी वेशभूषा आवडणे : त्याला सात्त्विक रंगाचे आणि साधे कपडे आवडत असत. त्याला ‘फॅशन’चे कपडे घातल्यावर तो ते कपडे काढून टाकायला सांगत असे.

२ ऊ. आरती म्हणायला आणि ऐकायला आवडणे : आमच्या कुटुंबात कुलाचारांचे पालन होत असे. माझे सासरे देवपूजा करतांना संकेत पहात असे आणि तो आजोबांकडून देवांविषयी माहिती विचारून घेत असे. त्याला आरती म्हणायला आणि ऐकायला आवडत असे. आमच्याकडे गणेशोत्सवात आणि नवरात्रीच्या कालावधीत सकाळ-संध्याकाळ आरती होत असे. तेव्हा आरतीची वेळ झाली की, संकेत आनंदाने टाळ्या वाजवत असे.

३. पुरोहितांनी संकेतकडून मौजीबंधनाचे संस्कार भावपूर्ण करून घेणे आणि त्यानंतर संकेतच्या बोलण्यात पुष्कळ पालट होणे

संकेतचे मौजीबंधन वयाच्या ८ व्या वर्षी झाले. त्या वेळी पुरोहितही मिळत नव्हते. नंतर काशी येथील पुरोहित उपलब्ध झाले. त्यांनी संकेतकडून मुंजीचे संस्कार पुष्कळ भावपूर्ण करून घेतले. त्यानंतर संकेतच्या बोलण्यात पुष्कळ पालट झाला.

४. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणे

४ अ. संकेत कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करतांना ‘त्याने केलेला नामजप ऐकत रहावा’, असे वाटणे : वर्ष १९९५ मध्ये आम्ही सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. तोपर्यंत आम्हाला नामजपाचे महत्त्व ठाऊक नव्हते. आम्ही सर्व जण प्रतिदिन संध्याकाळी दिवेलागणीनंतर बसून श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र म्हणत असू. त्या वेळी आम्ही कुलदेवता आणि दत्त यांचा नामजप करत असू. तेव्हा ‘संकेत करत असलेला नामजप ऐकत रहावा’, असे आम्हाला वाटत असे. एखाद्या दिवशी मी बाहेर गेले, तर संकेत त्याच्या बहिणींना दिवा लावायला सांगत असे आणि स्तोत्र अन् नामजप करत असे.

४ आ. संकेतचा नामजप सहजतेने होत असणे : संकेत ५ वर्षांचा असल्यापासून सलग ३ घंटे नामजप करत असे. तो सहजतेने नामजप करत असे. आम्हाला मात्र प्रयत्नपूर्वक नामजप करावा लागत असे. आम्ही ५ घंटे सामूहिक नामजप करत असू. तेव्हा संकेत अखंड नामजप करत असे. त्यात थोडाही खंड पडत नसे.

४ इ. संकेतने प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आवडीने म्हणणे : संकेतला प.पू. भक्तराज महाराज यांची भजने, क्षात्रगीते लगेच मुखोद्गत होत असत. तो भजने पुष्कळ आवडीने म्हणत असे. तो ‘सदैव साधका पुढेच जायचे’ हे गीत पुष्कळ आवडीने म्हणत असे.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा लाभलेला सत्संग !

५ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रवचन ऐकल्यावर साधना करण्याचा दृढ निश्चय होणे : आम्ही अनुमाने नोव्हेंबर १९९५ पासून रत्नागिरी येथील विठ्ठल मंदिरात प्रत्येक आठवड्याला होत असलेल्या सत्संगाला जाऊ लागलो. तेव्हा उत्तरदायी साधिकेने सांगितले, ‘‘पुढच्या मासात परात्पर गुरु डॉ. आठवले रत्नागिरी येथे येणार आहेत.’’ तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. ‘मी त्यांना कधी एकदा पहाते’, असे मला वाटत होते. ३१.१२.१९९५ या दिवशी आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांना लांबून पाहिले. त्यांचे प्रवचन ऐकल्यावर ‘मला साधनाच करायची आहे’, असा माझा दृढनिश्चय झाला. त्यानंतर नामजप करणे, सत्संगाला जाणे आणि सत्सेवा करणे, अशी आमची साधना चालू झाली.

५ आ. व्यासपिठावर बसलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांना संकेतने नमस्कार करणे : वर्ष १९९६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले आणि काही संत रत्नागिरी येथे आले होते. तेव्हा डॉ. (सौ.) कुंदा आठवले परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत होत्या. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून पुष्कळ साधक आले होते. डॉ. (सौ.) कुंदाताईंना बसण्यासाठी व्यासपिठाजवळ आसंदी ठेवली होती. त्या वेळी मी सेवेत असतांना संकेत सरकत सरकत डॉ. (सौ.) कुंदाताईंच्या आसंदीजवळ गेला. संकेतने डॉ. (सौ.) कुंदाताईंना विचारले, ‘‘तुम्हाला सरबत हवे का ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आता नको.’’ संकेतच्या विचारण्याचे डॉ. (सौ.) कुंदाताईंना पुष्कळ कौतुक वाटले. त्यांनी संकेतला विचारले, ‘‘तुला काय हवे ?’’ तेव्हा संकेतने त्यांना सांगितले, ‘‘मला व्यासपिठावर जाऊन प.पू. डॉक्टरांना नमस्कार करायचा आहे.’’ सौ. कुंदाताईंनी एका साधकाला सांगितले, ‘‘याला व्यासपिठावर न्या. याला प.पू. डॉक्टरांना नमस्कार करायचा आहे.’’ त्यानंतर संकेतने प.पू. डॉक्टरांना नमस्कार केला. (क्रमश:)

(ही सूत्रे श्री. संकेत कुलकर्णी संतपदी विराजमान होण्यापूर्वीची असल्याने त्यांना ‘पूज्य’ असे संबोधले नाही. – संकलक)

– सौ. सुजाता कुलकर्णी (पू. संकेत कुलकर्णी यांची आई), ढवळी, फोंडा, गोवा. (२३.३.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/758186.html