हिंदूंना त्यांचा स्वतःचा देश का मिळाला नाही ?

  • उद्या २६ जानेवारी या दिवशी ‘प्रजासत्ताकदिन’ आहे. त्या निमित्ताने…

  • फाळणीचा इतिहास सांगणार्‍या ‘हे राम’ ग्रंथाचा मराठीत अनुवाद करणारे व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांची ‘न्यूज डंका’ या यू ट्यूब वाहिनीने घेतलेली मुलाखत !

यंदा आपण देशाचा ७५ वा प्रजासत्ताकदिन साजरा करत आहोत. वर्ष २०२१ मध्ये आपण स्वातंत्र्याचाही अमृतमहोत्सव साजरा केला. असे असले, तरी प्रत्येकाच्या हृदयात किंवा मनात एक जखम आहे, तिची आठवण अशा राष्ट्रीय सणांच्या वेळीच होतेच. ती आहे फाळणीची जखम ! याविषयाच्या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार प्रखर श्रीवास्तव यांनी ‘हे राम’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकामध्ये फाळणीतील सर्व घटना, त्या काळातील नेत्यांच्या भूमिका आणि त्या भूमिकांमध्ये असलेले परस्परविरोध यांमागील इतिहास परखडपणे दिलेला आहे. हे पुस्तक हिंदी भाषेतील आहे; पण या पुस्तकाचा मराठी भाषेतील अनुवाद डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केला आहे. त्या अनुषंगाने श्री. महेश विचारे यांनी व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांची ‘न्यूज डंका’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीवर मुलाखत घेतली. त्यातील निवडक अंश येथे प्रसिद्ध करत आहोत.

१. धर्माच्या आधारावर देशाचे विभाजन !

डॉ. सच्चिदानंद शेवडे

‘धर्म’ या नावाखाली देशाचा एक भाग जेव्हा स्वतंत्र करण्यात आला, त्याला धर्माच्या आधारावर विभाजन करून ‘पाकिस्तान’ हे नाव देण्यात आले. धर्माच्या आधारे विभाजन झाले. मग एक देश मुसलमानांचा, मग उरलेला देश हा सर्वांचा आहे, असे कसे होऊ शकते ? तत्कालीन नेत्यांनी हिंदूंना त्यांच्या भूमिकेविषयी विचारले होते; पण प्रत्यक्षात ती भूमिका त्या त्या नेत्यांनीच परस्पर ठरवली.

२. निवडणुकीतील विजयानंतर झालेल्या विभाजनास काँग्रेस उत्तरदायी !

तत्कालीन निवडणुकांच्या वेळी हिंदु महासभेची धूळधाण झाली आणि काँग्रेसला प्रचंड विजय मिळाला. तेव्हा काँग्रेसने बर्‍याचशा घोषणा हिंदु महासभेच्या संदर्भात घेतल्या. हिंदु महासभेचे अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर होते. त्या काळात त्यांना विषमज्वर झाल्याने ते बाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे विजयानंतर काँग्रेसने प्रथम दोन तुकडे करण्याचाच ठराव संमत केला.

३. हिंदूंना त्यांचा देश न मिळणे दुर्दैवी !

जर धर्माच्या आधारावर दोन भाग झाले, तर मग हिंदूंना त्यांचा स्वतःचा देश का नाही मिळाला ? भारत देश सगळ्यांचाच कसा काय झाला ? याही प्रश्नांचा विचार व्हायला हवा; पण तसे झाले नाही, हे दुर्दैव !

४. हिंदू मरणाच्या दारात ढकलले गेले !

मुसलमानांनी वेगळा पाकिस्तान मागूनही ‘तुम्ही इथेच रहा’, हा आग्रह सातत्याने केला गेला. ‘मेवातमध्ये मुसलमानांनी रहावे’, या उद्देशासाठी प्रत्यक्ष मोहनदास गांधी तेथे त्यांना समजवायला गेले होते. पाकिस्तानात जाणार्‍या लोकांना थांबवण्यात येत होते. असे करण्यामागे नेमका काय विचार होता ? अशा भूमिकेमुळे आपल्याच लोकांना (हिंदूंना) आपण मरणाच्या दारामध्ये सोडून दिले, असेच झाले.

५. भारताला स्वातंत्र्य मिळाले; पण पाकिस्तानातील हिंदू मरत होते !

ज्या वेळेला आपल्याकडे स्वातंत्र्याचा उद्घोष होत होता, ‘वन्दे मातरम्’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या जात होता, ढोल-ताशा वादन केले जात होते, गुलाल उधळला जात होता, त्या वेळेला आपलेच लोक (हिंदु) पाकिस्तानात मरत होते. त्यांच्या किंकाळ्याही आम्हाला ऐकू येत नव्हत्या.

६. पाकिस्तानच्या निर्मितीस मुस्लिम लीग कारणीभूत !

कथा अणि भाषाप्रभु पु.भा. भावे यांनी याचे विदारक वर्णन केले आहे. ‘ही नागव्या स्त्रियांची रांग कशी लागली होती ? बलात्कार कसे केले गेले ? या सगळ्याची जर जाणीवच नव्हती, तर मग ही फाळणी का केली गेली ?’, असाही प्रश्न िनर्माण होतो. तेव्हा झालेल्या प्रांतीय विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मुस्लिम लीग जिंकली. तिने पाकिस्तान निर्माण केले.

७. फाळणीची झळ उत्तर भारतातील नागरिकांना अधिक प्रमाणात बसली !

जर पाकिस्तान झाला नसता, तर आज आपली लोकसंख्या किती झाली असती ? त्यामुळे एका परीने पाकिस्तान झाले, तर बरेच झाले. प्रश्न हा आहे की, त्या वेळेला जे सहस्रो लोक मृत पावले, त्यांचे काय ? त्यांच्याविषयी आपल्याला काहीच संवेदना राहिल्या नाहीत का ? कदाचित् फाळणीचा मोठा भाग किंवा ज्याला आपण झळ म्हणतो, ती झळ भारताच्या मध्यभागापासून खाली, म्हणजे महाराष्ट्रापासून खाली तुलनेत अल्प प्रमाणात बसली आहे. पाकिस्तानातून आलेले लोक देहली आणि उत्तरप्रदेश येथे स्थायिक झाले. त्यांनी पुष्कळ भोगले.

८. सध्याच्या पिढीकडून राष्ट्र-धर्माविषयीच्या लिखाणाची अपेक्षा !

सध्याची नवीन पिढी बुद्धीमान आहे, तसेच त्यांच्याकडे अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. सामाजिक माध्यमांवर असलेल्या इतिहास अभ्यासकांकडून अशा विषयांच्या संदर्भातील लिखाणाची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणे, हे आपले काम आहे.

(साभार : ‘न्यूज डंका’ यू ट्यूब वाहिनी)