श्रीराममंदिरातील सोहळ्याला सनातन संस्थेच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी यांची वंदनीय उपस्थिती !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मभूमीसाठी ५०० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर रामजन्मभूमी मुक्त झाली आणि आज साक्षात् प्रभु श्रीरामचंद्रांच्या भव्य राममंदिराची उभारणी होऊन रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आम्ही आज पहात आहोत, हा सनातन हिंदु धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. देशभरातील सर्व संत-महंतांना मान देऊन आणि त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. रामलला पुन्हा श्रीराममंदिरात प्रतिष्ठापित होणे, ही रामराज्याची नांदी आहे, असे उद्गार सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी या वेळी काढले.
ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा अयोध्येतील श्रीराममंदिरातील मूर्तीच्या भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे सरचिटणीस श्री. चंपत राय यांनी सनातन संस्थेच्या दोन्ही आध्यात्मिक उत्तराधिकारी यांना सन्मानपूर्वक आमंत्रित केले होते.
कलियुगांतर्गत सत्ययुगाच्या नवनिर्मितीच्या सूर्योदयाची नांदी ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
‘आसेतुहिमालयापासून हिंदसागरापर्यंत प्रत्येकाला एकात्मतेच्या बंधनात बांधणारे श्रीराम हे एक अलौकिक राष्ट्रसूत्र आहे ! प्रत्येकाच्या मनातील श्रीरामाच्या मंदिराची उभारणी हे न केवळ अधर्मावर धर्माचा विजय; परंतु त्याचसमवेत कलियुगांतर्गत सत्ययुगाच्या नवनिर्मितीची, हिंदूंच्या अलौकिक ‘हिंदु राष्ट्र निर्मिती’ची, म्हणजेच स्वधर्माधिष्ठित स्वराष्ट्र, सर्वशक्तीसंपन्न, सुव्यवस्थाप्रधान, सर्वसुविधांयुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत सुराज्याच्या सूर्योदयाची नांदी आहे, असे उद्गार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी या प्रसंगी काढले.
या वेळी दोन्ही उत्तराधिकारींनी श्रीरामाच्या मूर्तीप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होता आले, याबद्दल श्रीरामाच्या प्रती कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त केली.