प्रभु श्रीरामाच्या चरणी प्रार्थना !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

श्रीराम प्रभु ! घनीभूत आनंद व ज्ञान हेच ज्याचे स्वरूप आहे, देश-काल-वस्तू ज्याला मर्यादा घालू शकत नाहीत. लक्षावधी वेदवचनांनी ज्याचे स्वरूप अत्यंत अस्पष्ट-भासमान होते, ज्या सगुण साकार दर्शनाने उपासकांचा महान पुरुषार्थ मोक्ष सिद्ध होतो, असे श्रीराम प्रभु स्वरूपातील ब्रह्मतत्त्व आमच्यासमोर आहे, हे आमचे परम सौभाग्य आहे.

प्रभु ! तुमचा हा ‘रामावतार’ आमच्या या पुरुषार्थ प्राप्तीकरता असूनही काही क्षुद्रजन मन, वाणी आणि बुद्धी यांद्वारे तुमची निंदा करतात; परंतु प्रभु आम्ही मात्र तापत्रय विनाशाकरता अत्यंत निश्चल चित्ताने सर्वस्वरूप श्रीरामप्रभूचा आश्रय घेतो. प्रभु तुमचे लीलामय शरीर रज आणि तम यांपासून पूर्ण मुक्त आहे. आपला दृश्य देह परमनिर्मल आहे; म्हणूनच त्यात प्रविष्ट असलेले अनावृत्त परमानंद चिन्मय ब्रह्माचे निरंतर भान होते. प्रभु ! श्रवण-मनन काळात सकल इंद्रियांना परम तृप्त, परम आल्हाददायक असा आपला सहज ग्रहण करता यावा, असा श्रीविग्रह (प्रभूंचे सगुण साकार रूप) आहे, त्यात आम्ही कसे रमू ? ती भक्ती आम्हाला साध्य झाली, तरच आम्ही धन्य होऊ !!

– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : ‘रामायणाचे उत्तरकांड’ ग्रंथातून)