वक्त्याने आपल्या विवेचनात आपले म्हणणे सिद्ध करणारे पुरावे अवश्य द्यावेत. त्यासाठी संतवचने, सुभाषिते, निरनिराळ्या शास्त्रांतील सिद्धांत, ऐतिहासिक आणि बोधप्रद कथा यांचा उपयोग आवर्जून करावा; पण त्यातही स्मरणशक्ती वा पाठांतराचे प्रदर्शन नसावे. आपले विवेचन हे आपला धर्म, आपली संस्कृती, आपल्या परंपरा यांचे वैशिष्ट्य आणि श्रेष्ठत्व पटवून देणारे असावे. आवश्यक तर या परंपरादीकांवर तथाकथित बुद्धीवादी, पुरोगामी किंवा नास्तिक जे आक्षेप घेतात, धर्म संस्कृतीचा उपहास करतात, त्याचा योग्य तो परामर्श कीर्तनकारादिकांनी आवर्जून घेतला पाहिजे. समर्थपणे, तर्कबुद्धीच्या बळावर, पुराव्यानिशी त्यांचे खंडण आवर्जून केले पाहिजे. ‘जाऊ द्या की…’, असे म्हणून अशा गोष्टींची उपेक्षा करता कामा नये. चांगल्याची जो निंदा करतो, त्यालाच तेवढे पाप लागते असे नाही, तर ती निंदा निमूटपणे ऐकून घेणाराही तितकाच पापी असतो, हे लक्षात ठेवले पाहिजे !
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘मनुस्मृती सार्थ भाष्य’)