येमेनजवळ भारतीय कर्मचारी असणार्‍या व्यापारी नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण

भारतीय नौदलाने पाठवली युद्धनौका !

नवी देहली – येमेनजवळील अरबी समुद्रात ‘जेन्को पिकार्डी’ या व्यापारी नौकेवर ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. या नौकेवरील २२ कर्मचार्‍यांपैकी ९ कर्मचारी भारतीय आहेत. आक्रमणानंतर या नौकेला आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. हे आक्रमण १६ जानेवारीला रात्री ११ च्या सुमारास झाल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली. आक्रमणाची माहिती मिळताच नौदलाने ‘आय.एन्.एस्. विशाखापट्टणम्’ ही युद्धनौका साहाय्यासाठी पाठवली. ‘हे आक्रमण कुणी केले ?’, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अमेरिकेकडून हुती बंडखोरांवर आक्रमणे चालूच !

अमेरिकेच्या सैन्याने येमेनमधील हुती बंडखोरांवर १७ जानेवारी या दिवशी चौथ्यांदा क्षेपणास्त्रांद्वारे आक्रमण केले. यात हुतीची १४ क्षेपणास्त्रे नष्ट झाली. अमेरिकेचे म्हणणे आहे की, येमेनमध्ये आक्रमणे करून अरबी समुद्रातील व्यापारी नौकांवर हुतीकडून होणारी आक्रमणे थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे हुती बंडखोरांचे म्हणणे आहे की, ते गाझाच्या समर्थनार्थ नौकांवरील आक्रमणे चालूच ठेवणार आहेत.