सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव असलेले लोटे, जिल्हा रत्नागिरी येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके (वय ५१ वर्षे ) !

लोटे, जिल्हा रत्नागिरी येथील ‘श्री. महेंद्र चाळके यांच्या समवेत मला सेवा करण्याची संधी मिळाली. दादांच्या समवेत सेवा करतांना मला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. महेंद्र चाळके

१. प्रेमभाव

अ. दादा सर्वांशी आपुलकीने आणि प्रेमाने बोलतात. ते सर्व साधकांची प्रेमाने विचारपूस करतात. दादा साधकांशी भ्रमणभाषवर बोलतांना साधकांना ‘कसे आहात ?’, असे विचारून नंतर सेवेविषयी विचारतात.

आ. एकदा आम्ही (मी, महेंद्रदादा आणि सौ. भक्ती महाजन) रत्नागिरी सेवाकेंद्रात एका शिबिराच्या नियोजनाच्या संदर्भात सेवा करत होतो. मी आणि भक्तीताई लिखाण करण्यात व्यस्त होतो. त्या वेळी चहाची वेळ झाल्यावर दादांनी आमच्यासाठी चहा बनवला. ते उन्हाळ्याचे दिवस होते. त्या वेळी दादांनी आम्हाला वेळच्या वेळी थंड पाणी दिले. तेव्हा मला दादांच्या कृतीतून निरपेक्ष प्रेम जाणवत होते. मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींची आठवण आली.

२. सकारात्मकता

सौ. दीपा औंधकर

दादांना काही प्रश्न विचारल्यास ते नेहमी सकारात्मक उत्तर देतात. त्यामुळे मला सेवेविषयी येणारा ताण अल्प व्हायला साहाय्य होते. मी दादांना कधी ‘सेवेत साधकांचे साहाय्य मिळेल का ? साधक ही सेवा करतील का ?’, असे विचारते. तेव्हा दादा मला सांगतात, ‘‘साधक चांगले आहेत. ते चांगल्या प्रकारे सेवा करतात.’’ मला दादांकडून ‘साधकांविषयी सकारात्मक असायला हवे’, असे शिकायला मिळाले.

३. सेवेची तळमळ

अ. जिल्हा स्तरावर एखाद्या उपक्रमाचे नियोजन करायचे असल्यास दादा तळमळीने साधकांना ‘त्या सेवेचे गांभीर्य आणि सेवेतून होणारे लाभ’ यांविषयी सांगतात. साधक त्या सेवेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात.

आ. एखाद्या उपक्रमाचे दायित्व घेण्यासाठी साधक सिद्ध होत नसल्यास दादा त्यांना जाणीव करून देतात. त्यामुळे साधकांना दायित्व घेण्यास प्रोत्साहन मिळते.

४. साधकांच्या साधनेची तळमळ

अ. ‘जिल्ह्यातील सर्व साधकांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, त्यांना सेवा मिळावी’, यासाठी आणखी काय प्रयत्न करू ?’, असा दादांचा विचार असतो.

आ. सत्संगात साधकांना चुका मांडण्यात अडचण येत होती. ‘चुका कशा लिहाव्यात ? स्वभावदोषांच्या मुळापर्यंत कसे जावे ? सत्संगात चुका कशा सांगाव्यात ?’, हे साधकांनी शिकावे’, यासाठी दादांनी जिल्ह्यातील सर्व साधकांसाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया वर्ग चालू करायला सांगितले. त्यामुळे साधकांमध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी उत्साह निर्माण झाला.

५. मनमोकळेपणा

दादा ‘ते स्वतः कोणत्या स्वभावदोषांवर स्वयंसूचना सत्रे देत आहेत. त्या स्वयंसूचना योग्य आहेत का ? ते कसे प्रयत्न करत आहेत ?’, यांविषयी माझ्याशी मनमोकळेपणाने बोलतात. मी त्यांना त्यांची चूक सांगितल्यावर ते सहजतेने स्वीकारतात आणि स्वतःत पालटही करतात. मला त्यांच्याशी बोलतांना ताण येत नाही.

६. अल्प अहं

अ. दादांच्या वागण्यात सहजता आहे. त्यांच्याकडे जिल्ह्यातील साधकांच्या साधनेचे दायित्व आहे; पण त्यांच्यात वेगळेपणा जाणवत नाही. एकदा मी आणि दादा सत्संग झाल्यानंतर पादत्राणे घ्यायला गेलो असतांना दादांनी ‘स्टॅन्ड’मधून त्यांच्या पादत्राणांसह माझीही पादत्राणे काढून दिली.

आ. दादांना सेवांच्या संदर्भातील तांत्रिक गोष्टी करतांना अडचण येते. दादा साधकांना त्याविषयी सहजतेने सांगून त्या सेवेत साधकांचे साहाय्य घेतात. दादांना ‘सेवा पूर्ण व्हावी’, हा एकच ध्यास असतो.

इ. त्यांना सेवेतील एखादे नावीन्यपूर्ण सूत्र सुचवले, तर ते लगेच स्वीकारतात.

७. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या प्रती भाव

अ. ‘महेंद्रदादांना सद्गुरु सत्यवानदादांचा नेहमी सहवास लाभतो आणि त्यांचे मार्गदर्शन मिळते’, त्याबद्दल महेंद्रदादा सतत कृतज्ञताभावात असतात.

आ. दादा सद्गुरु सत्यवानदादांच्या विषयी बोलत असतांना त्यांच्या बोलण्यातून सद्गुरु सत्यवानदादांच्या प्रती भाव जाणवतो.

इ. एखादी धारिका सद्गुरु सत्यवानदादांना वाचायला द्यायची असल्यास ‘सद्गुरु दादांना कोणतीही अडचण येऊ नये किंवा त्यांचा प्रश्न विचारण्यात वेळ जाऊ नये’, असा महेंद्रदादांचा विचार असतो.

८. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रती भाव

महेंद्रदादा नेहमी सत्संगात ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली सर्व साधकांसाठी किती करतात ! आपण गुरुकार्य करण्याची तळमळ कशी वाढवायला हवी ?’, याविषयी तळमळीने सांगतात. त्यांच्या बोलण्यातून गुरुदेवांप्रतीचा भाव जाणवतो.

‘दादांच्या समवेत सेवा करायची आहे’, हे समजल्यावर मला ‘त्यांच्या समवेत सेवा करायला जमेल का ?’, या विचाराने ताण आला होता; मात्र गुरुदेवांच्या कृपेने मला दादांमधील गुण लक्षात आले. ‘सहसाधकाचे गुण लक्षात आल्यावर त्याच्या समवेत सेवा करतांना मनाच्या स्तरावर अडचणी येत नाहीत आणि सेवा परिपूर्ण होण्यात साहाय्य होते’, हे मला शिकायला मिळाले. त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी. (२९.९.२०२३)