Chinese MANJA : चिनी मांजामुळे झालेल्या दुखापतीत २ जण ठार !

  • भाग्यनगर येथील एक सैनिक, तर कर्णावतीत ५ वर्षीय मुलाचा मृत्यू !

  • राजधानी देहलीत चिनी मांजावर आहे बंदी !

भाग्यनगर/कर्णावती – भाग्यनगर येथे चिनी मांजामुळे भारतीय सैन्यदलात सेवारत एका सैनिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. १३ जानेवारीच्या सायंकाळी ही घटना घडली. येथील गोलकोंदा क्षेत्रात २८ वर्षीय के. कोटेश्‍वर रेड्डी हे सैनिक सैन्याच्या रुग्णालयात चालक होते.

दुसरीकडे गुजरातच्या बोर्डी गावात वडिलांसमवेत दुचाकीवरून जाणार्‍या ५ वर्षाच्या मुलाची मान पतंगाच्या दोरीने कापली गेली. गंभीर घायाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यात आले; परंतु डॉक्टर त्याचा प्राण वाचवू शकले नाहीत. राज्यातील गोध्रा शहरात चिनी मांजामुळे ४ जण घायाळ झाले आहेत.

वर्ष २०१७ पासून राजधानी देहलीत चिनी मांजावर बंदी आहे. असे असतांनाही कुणी मांजा वापरतांना किंवा बनवतांना पकडले, तर त्याला ५ वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा आहे.

संपादकीय भूमिका 

अशा जीवघेण्या वस्तूवर खरेतर भारतभरात बंदी घातली पाहिजे. सरकारने यासाठी कायदा केला पाहिजे !