कोल्हापूर – अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे होणार्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने सकल हिंदू समाजाच्या वतीने कोल्हापूर येथे २१ आणि २२ जानेवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात २१ जानेवारीला दुपारी ४ वाजता बिंदू चौक येथे भव्य शोभायात्रा निघेल, तर २२ जानेवारीला दसरा चौक येथील मैदानात श्रीराममंदिराची भव्य प्रतिकृती ठेवण्यात येणार आहे. याच समवेत प्रभु श्रीराम यांची १०८ फूट उंचीची भव्य प्रतिमा उभारण्यात येणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिक, श्रीरामभक्त यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपचे खासदार श्री. धनंजय महाडिक यांनी सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत केले.
श्री. धनंजय महाडिक पुढे म्हणाले, ‘‘२२ जानेवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांसह आतषबाजी केली जाणार आहे. शहरात २२ ठिकाणी प्रभु श्रीरामाच्या प्रतिमा उभारल्या जाणार आहेत. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र यांच्या वतीने गर्भगृहातून अभिमंत्रित केलेल्या अक्षता आणि निमंत्रणपत्रिका प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अक्षता नागरिक त्यांच्या घराजवळील मंदिरात अर्पण करू शकतात.’’ श्री. गजानन तोडकर म्हणाले, ‘‘या दिवशी प्रत्येकाने त्यांच्या घरावर भगवे ध्वज उभे करावेत.’’
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे आणि श्री. उदय भोसले, भाजपचे माजी आमदार श्री. अमल महाडिक, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. पराग फडणीस, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई आणि शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अनिरुद्ध कोल्हापूरे यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.