श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लागणारा कालावधी न्यून करण्यासाठी धडपडणारे पंढरपूर येथील डॉ. अतुल आराध्ये !

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे येणारे वारकरी डोळ्यात प्राण आणून श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी धडपडत असतात. प्रत्यक्षात विठ्ठलाच्या देवळात आल्यावर त्यांना अनेक घंटे दर्शनासाठी रांगेत उभे रहावे लागते. यात वयस्कर, महिला आणि रुग्णाईत असलेल्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे हा कालावधी न्यून करण्यासाठी पंढरपूरमधील प्राध्यापक डॉ. अतुल आराध्ये यांनी त्यावर ‘पीएच्.डी.’ (विद्यावाचस्पति पदवी) केली, तसेच त्यांनी मुखदर्शनासाठी ‘विशेष रँप’ (उंचवटा) उभा करण्याची सूचना देवस्थान समितीला केली. यामुळे वारकर्‍यांना विठ्ठलाचे दर्शन योग्य प्रकारे, अल्प वेळेत आणि समाधानकारक होऊ शकले. त्या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन त्यांना हे कसे सुचले ? यासाठी त्यांनी कसे प्रयत्न केले ? हे जाणून घेतले, ते आमच्या वाचकासांठी देत आहोत त्यांच्याच शब्दांत !

श्री. अजय केळकर, कोल्हापूर

१. ‘पीएच्.डी.’च्या मार्गदर्शकांकडून वारकर्‍यांसाठी काहीतरी करण्याचे आवाहन !

माझे शिक्षण ‘मास्टर्स मॅनेजमेंट’ (व्यवस्थापकीय पदविका) आणि ‘मेकॅनिकल इंजिनीअरिंग’ (अभियांत्रिकी पदवी) झाले आहे. डॉ. श्रीकांत कल्लूरकर हे माझे ‘पीएच्.डी.’चे मार्गदर्शक होते. त्यांची आणि माझी भेट झाल्यावर त्यांनी मला, ‘तू पंढरपूरच्या वारकर्‍यांसाठी काही का करत नाहीस ?’, असे विचारले. त्या वेळी माझे शिक्षण अभियांत्रिकीमधून झाले असल्याने ‘वारकर्‍यांसाठी नेमके काय करायचे ?’, असा प्रश्न माझ्यासमोर होता. तेव्हा माझे मार्गदर्शक यांनी मला वारकर्‍यांच्या सध्याच्या अडचणी विचारल्या. त्यांना मी दोन-तीन अडचणी सांगून ‘वारकर्‍यांसाठी दर्शन वेळ, ही एक मोठी अडचण आहे’, असे सांगितले. यात नियमितच्या दिवशी २ ते ३ घंट्यांपासून ३ ते ४ घंटेही लागतात, तसेच वारीच्या कालावधीत १२ ते २४ घंटे दर्शनासाठी लागतात’, असे मी सांगितले. त्यावर त्यांनी ‘तू त्यांची दर्शन वेळ न्यून करणे यावर का काम करत नाहीस ?’, असे विचारणा केली.

त्यांनी ‘अभियांत्रिकीमध्ये ‘इन्व्हेंटरी’ (मालाची सूची) नावाची संकल्पना असून वारकरी म्हणजे ‘मटेरियल’ (वस्तू), दर्शन म्हणजे ‘प्रोसेस’ (प्रक्रिया) आणि दर्शन झालेला वारकरी, म्हणजे ‘फिनिष्ड प्रोडक्ट’ (सिद्ध झालेले उत्पादन)’, अशी एक कल्पना घेऊन ‘इन्व्हेंटरी’ आणि त्यामध्ये ‘कॅनबॅन सिस्टीम’ (कामाच्या योग्य व्यवस्थापनासाठी पद्धत) या पद्धतीने कार्यवाहीत आणण्यास सांगितले.

डॉ. अतुल आराध्ये

२. मुखदर्शनासाठी प्रारंभी केवळ एक छोटी खिडकी आणि नंतर जागा वाढवल्याचा झालेला लाभ !

त्यामध्ये पहिली कल्पना म्हणजे ‘ऑनलाईन बुकिंग’ ती सध्या राबवली जात आहे. दुसरी होती मुखदर्शन ! वर्ष २०१२ च्या आधी मुखदर्शनासाठी एक छोटी खिडकी असायची आणि ज्यातून केवळ एक वारकरी दर्शन घेऊ शकायचा. त्यामुळे ती जागा थोडी वाढवली, तर त्यातून अधिक वारकरी दर्शन घेऊन शकतील, असे लक्षात आल्यावर ती जागा वाढवली. त्यामुळे आता ज्या ठिकाणी पूर्वी एक वारकरी दर्शन घ्यायचा त्या ठिकाणी एका वेळेस किमान ५० वारकरी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतात. याचसमवेत आता दर्शनाची वेळ ही ८ पटींनी वाढली आहे. पूर्वी दर्शनासाठी प्रत्येक वारकर्‍याला केवळ १.२ सेकंदाचा कालावधी मिळायचा, तो आता जवळपास ८ ते ९ सेकंद मिळत आहे. ज्यामुळे वारकरी आता शांतपणे, समाधानाने दर्शन घेऊ शकतात.

वारकरी जेव्हा येतात, तेव्हा ते रांगेत उभे रहातात, तेव्हा त्यांना दर्शन किती कालावधीनंतर होणार ? याची निश्चित माहिती नसते आणि त्यामुळे त्यांचा वेळ अकारण वाया जातो. हा वेळ न्यून करता येण्यासाठी ‘ऑफलाईन नोंदणी’ची संकल्पना पुढे आली. यात जेव्हा वारकरी पंढरपूर येथे येतील, तेव्हा त्यांनी नोंदणी करावी आणि त्या वेळी त्यांना दर्शनाची एक ठराविक वेळ समजेल. त्या वेळेतच त्यांनी दर्शनासाठी यावे आणि दर्शन घेऊन जावे. यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक क्यू (रांग)’ असेल.

सध्या ‘ऑनलाईन नोंदणी’मध्ये काही अडचणी येत आहेत. याची क्षमता साधारणत: प्रत्येक घंट्याला ५०० ठेवलेली आहे; मात्र दशमी, एकादशी, द्वादशी सोडून अन्य वेळी केवळ २०० वारकरी ‘ऑनलाइन नोंदणी’ करत असल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे बहुतांश वारकरी वृद्ध आणि अशिक्षित आहेत. त्यामुळे त्यांना ‘ऑनलाईन नोंदणी’ कल्पना  समजत नाही; पण ज्या वेळी आपण ‘ऑफलाईन नोंदणी’ चालू करू त्या वेळेस त्यांना ‘इलेक्ट्रॉनिक क्यू’मध्ये जावेच लागेल. प्रारंभी थोडी अडचण येऊन नंतर सवयीने हळूहळू लक्षात येईल.

३. एका गणेश मंदिरात असा प्रकल्प यशस्वी !

पखालपूर येथील एका गणेश मंदिरामध्ये चतुर्थीला आम्ही हा प्रयोग केला होता. पूर्वी तिथे दर्शनासाठी ‘बॅरिकेड्स’ लावले जायचे आणि भाविक रांगेमध्ये थांबून दर्शन घ्यायचे. या ठिकाणचे ‘बॅरिकेड्स’ आम्ही काढले आणि तिथे भाविकांना बसण्यासाठी चटया घातल्या. भाविकांना आम्ही एका रांगेत बसायला सांगितले. ज्या रांगेचा क्रमांक येईल, त्या रांगेमधील भाविकांनी उठायचे आणि दर्शन घ्यायचे. तो अनुभव पुष्कळ चांगला होता; कारण सगळे भाविक खाली बसलेले होते. मध्येच एखादा भाविक अभंग म्हणायचा. हे मंदिर छोटे असल्याने २५ भाविकांची आम्ही रांग केली होती. सकाळी १० ते ५ लोकांचे दर्शन अत्यंत चांगल्या प्रकारे झाले.