मंदिर पाडून बांधण्यात आलेली ‘ढाई दिन का झोपडा’ नावाची मशीद पुन्हा हिंदूंकडे सुपुर्द करा !

राजस्थानमधील जयपूर येथील भाजपचे खासदार रामचरण बोहरा यांची मागणी

भाजपचे खासदार रामचरण बोहरा

अजमेर (राजस्थान) – अजमेर येथील ‘ढाई दिन का झोपडा’ नावाची मशीद हे पूर्वीचे मंदिर असल्याने ते हिंदूंकडे सुपुर्द करण्याची मागणी जोर पकडू लागली आहे. भाजपचे खासदार रामचरण बोहरा म्हणाले की, या ठिकाणी पुन्हा एकदा संस्कृत मंत्रांचा ध्वनी दुमदुमणार. याविषयी त्यांनी पर्यटन आणि पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्री जी. किशन रेड्डी यांना पत्र लिहून हे स्थळ हिंदूंना परत मिळण्याची मागणी केली आहे.

१. ‘ढाई दिन का झोपडा’ मशीद हे मूळ सरस्वती कंठभरत महाविद्यालय होते. ते श्री सरस्वतीदेवीला समर्पित होते. तेथे मंदिरही होते. वर्ष ११९२ मध्ये महंमद घोरी याने महाराज पृथ्वराज चौहान यांचा पराभव करून अजमेर कह्यात घेतले.

२. त्यानंतर घोरी याने त्याचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबक याला शहरातील सर्व मंदिरे नष्ट करण्याचा आदेश दिला. यासह त्याने शहरात स्थळी ६० घंट्यांच्या आत मशीद बांधण्याचा आदेशही दिला होता. संस्कृत महाविद्यालयाच्या ठिकाणी अडीच दिवसांत मशीद बांधून पूर्ण झाल्यामुळे या मशिदीला ‘ढाई दिन का झोपडा’ म्हटले जाते.

३. बोहरा यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्या तेथे उभी असलेली वास्तू हा भारतीय समाजावर लागलेला कलंक आहे. त्यामुळे ही वास्तू तिच्या मूळ स्वरूपात परत आणणे महत्त्वाचे आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतात हिंदूंची मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्याच्या शेकडो घटना आहेत. त्यामुळे अशा प्रत्येक वास्तू परत देण्याची वेगवेगळी मागणी करत बसण्यापेक्षा भारतभरातील सर्वच मंदिरांची अशी सूची बनवून ती परत हिंदूंना परत देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत !
  • तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट’ हा कायदा बनवल्याने मंदिरे पाडून मशिदी बनवलेल्या कोणत्याच वास्तू परत मागता येत नाहीत. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने हा कायदाच रहित करणे हिंदूंना अपेक्षित आहे !