Ayodhya RamMandir PranPratishta : श्रीराममंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ११ दिवसांच्या अनुष्ठानाला प्रारंभ !

पंतप्रधान मोदी यांनी संदेश प्रसारित करून दिली माहिती !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून एक संदेश प्रसारित केला आहे. यात त्यांनी ते पुढील ११ दिवस अनुष्ठान करणार असल्याचे घोषित केले आहे. हे अनुष्ठान कशा प्रकारचे असेल ? हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

मोदी यांनी या संदेशात पुढे म्हटले आहे की,

१. जीवनाचे काही क्षण ईश्‍वराच्या आशीर्वादामुळेच प्रत्यक्षात उतरत असतात. आज जगभरातील श्रीराम भक्तांसाठी असेच पवित्र वातावरण आहे. सर्वत्र प्रभु श्रीराम यांच्या भक्तीचे अद्भुत वातावरण आहे. चारही दिशांना श्रीरामनामाचा जप ऐकू येत आहे. प्रत्येकजण २२ जानेवारीची आतुरतेने वाट पहात आहे.

२. आता अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला केवळ ११ दिवस उरले आहेत. मला या पुण्यप्रसंगाचा साक्षीदार होण्याची संधी मिळत आहे. माझ्यासाठी ही कल्पनेच्या पलीकडची अनुभूती आहे. मी भावुक झालो आहे. पहिल्यांदा आयुष्यात मी अशा प्रकारच्या मानसिक स्थितीतून जात आहे. माझ्यासाठी हा अनुभव एक वेगळीच संधी आहे.

३. अनेक पिढ्यांनी वर्षानुवर्षे जे स्वप्न उराशी बाळगले होते, त्या स्वप्नपूर्तीवेळी मला उपस्थित रहाण्याचे भाग्य लाभले आहे. ईश्‍वराने मला सर्व भारतियांचे प्रतिनिधित्व करण्याचे निमित्त बनवले आहे. हे फार मोठे दायित्व आहे.

४. आपल्या शास्त्रांमध्येही सांगितले आहे की, आपल्याला ईश्‍वराच्या यज्ञासाठी आराधना करण्यासाठी स्वत:मध्येही दैवी चेतना जागृत करावी लागते. शास्त्रांमध्ये व्रत आणि कठोर नियम सांगितले आहेत. या नियमांचे प्राणप्रतिष्ठेच्या आधी पालन करावे लागते. त्यामुळेच मला आध्यात्मिक व्यक्तींकडून जे मार्गदर्शन मिळाले, तसेच त्यांनी जे नियम सांगितले आहेत, त्यानुसार मी आजपासून ११ दिवसांच्या विशेष अनुष्ठानाला प्रारंभ करत आहे.

५. या पवित्र क्षणी मी परमात्म्याच्या चरणी, तसेच जनतेला प्रार्थना करत आहे. तुम्ही सगळ्यांनी मला आशीर्वाद द्या. जेणेकरून माझ्याकडून कोणतीही कमतरता रहाणार नाही.

६. या ११ दिवसांच्या अनुष्ठानचा प्रारंभ मी नाशिकधाम पंचवटीपासून करत आहे, हे माझे भाग्य आहे. पंचवटीमध्ये प्रभु श्रीराम यांनी बराच काळ वास्तव्य केले होते.