शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांचा ‘व्हीप’ ठाकरे गटाच्या आमदारांनाही लागू होईल ! – राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

एका पक्षात २ व्हीप असू शकत नाहीत !

शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले

मुंबई – ‘शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांचाच व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांनाही लागू होईल. माझ्यासमोर असलेला निवाडा सोडवतांना विधीमंडळ पक्षातील गट आहेत, त्यातील मूळ राजकीय पक्ष आहे. त्या संदर्भात मी निर्णय दिला आहे. त्यामुळे एका पक्षात २ व्हीप असू शकत नाहीत. मी ज्यांची ‘व्हीप’ म्हणून नियुक्ती केली. त्यांचा व्हीप सर्वांना लागू होईल’, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.

राहुल नार्वेकर म्हणाले, ‘सर्वाेच्च न्यायालयाने शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु यांची नियुक्ती कायमस्वरूपी योग्य ठरवली अन् गोगावले यांची नियुक्ती अयोग्य ठरवली’, असा समज अपसमज समाजात पसरवला जात आहे. न्यायालयाने म्हटले की, ज्या वेळी नरहरि झिरवळ यांनी सुनील प्रभु आणि अजय चौधरी यांना निवडले, त्या वेळी २१ जून २०२२ या दिवशी त्यांच्याकडे फक्त उद्धव ठाकरे यांचे पत्र होते. त्या वेळी त्यांच्याकडे एकनाथ शिंदे यांचे पत्र नव्हते. त्यामुळे त्यांना एकच राजकीय पक्ष असल्याचे वाटले, त्यामुळे त्यांनी दोघांची निवड केली आहे.

सर्वाेच्च न्यायालयाने सांगितले की, अध्यक्षांनी आता राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवावे आणि त्यांनतर प्रतोद अन् विधीमंडळ नेत्यांची निवड करावी. त्यामुळे हा जो अपसमज पसरवला जात आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. मी जो निर्णय दिला आहे तो सर्वाेच्च न्यायालयाने दिलेली नियमावली पाळून १०० टक्के दिला आहे, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.