संस्कृतीरक्षणाचे कार्य प्रत्येक हिंदूने करण्याचे आवाहन !
वसई (पालघर) – आपला भारत देश एकेकाळी विश्वगुरु होता. मध्यंतरीच्या काळात आपल्या काही चुकांमुळे परकियांनी आपल्यावर राज्य केले. आपली संस्कृती, आपली मंदिरे, आपले वैभव नष्ट केले. या परिस्थितीतही आपल्या पूर्वजांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपले राष्ट्र आणि संस्कृती यांचे रक्षण केले. याचे वर्तमानातील उदाहरण म्हणजे अयोध्येतील श्रीराम मंदिर आहे. दीर्घ संघर्षानंतर आज आपण अयोध्येत प्रभु श्रीराम यांचे भव्य मंदिर निर्माण करत आहोत. हा हिंदूंच्या एकजुटीचा परिणाम आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी येथे केले. वसई (पश्चिम) येथील अयप्पा मंदिराच्या सभागृहात आयोजित हिंदु महासंमेलनात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘आपण संघटित नव्हतो, तेव्हा अनेक परकीय सत्तांनी आपल्यावर राज्य केले. तरीही परमेश्वराने सांगितलेल्या मार्गावर हिंदु चालत असल्यामुळेच एवढ्या आघातांनंतरही आपण टिकून आहोत. ‘पसायदाना’त सांगितल्याप्रमाणे आपली संस्कृती सर्वसमावेशक आणि महान आहे. ही संस्कृती वाचवण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न केले पाहिजेत. आज हिंदूंच्या संघटित शक्तीमुळेच अयोध्या येथील श्रीराम मंदिर आणि काश्मीरमधील कलम ३७० चे प्रश्न मार्गी लागले आहेत.’’
६ ते ८ जानेवारी या कालावधीत आयोजित या हिंदु महासंमेलनात देशभरातून अनेक संत आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी महाकाल भैरव आखाडा येथील स्वामी कैलासपुरी महाकाल बाबा उपस्थित होते. या वेळी शेकडो भक्तांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमाचे आयोजन सनातन धर्मसभा, वसई यांनी केले होते. ‘भाजपचे महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्टचे संयोजक उत्तम कुमार हे हिंदुत्वाचे कार्य नेटाने करत आहेत’, असे श्री. नाईक म्हणाले.
या वेळी कोलथूर अद्वैत आश्रमाचे स्वामी चिदानंदपुरी, श्री रामदास आश्रम मुंबईचे स्वामी कृष्णानंद सरस्वती, श्री कोल्लूर मुकांबिका मंदिराचे डॉ. के. रामचंद्र अडिगा, भाजप केरळचे प्रवक्ते संदीप वाचस्पती, अरनमुला पल्ली योडा सेवा संघाचे के.एस्. राजन, हिंदु जागरण मंचच्या प्रीती राऊत, प्रज्ञाताई कुलकर्णी, पालघरचे खासदार राजेंद्र गावित, कामगार नेते अभिजित राणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा पालघर लोकसभा निरीक्षक विजय पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, राजन नाईक, केदारनाथ म्हात्रे, मनोज पाटील, अर्चना पाटील, सुभाष भट्टे उपस्थित होते.