गोवा विधीकार दिन
पणजी, ९ जानेवारी (स.प.) : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ९ जानेवारीला म्हादई नदीचे पाणी वळवण्याचा प्रश्न केंद्र आणि सर्वोच्च न्यायालयात अत्यंत दृढतेने हाताळण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. ‘गोवा आणि तेथील जनतेच्या हिताशी सरकार कोणत्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही’, असे ते म्हणाले.
पर्वरी येथील गोवा विधानसभा संकुलात ६० व्या गोवा विधीकार दिनानिमित्त गोवा विधीमंडळ मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमात म्हादई नदीविषयी उपस्थित केलेल्या सूत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना डॉ. सावंत म्हणाले की, म्हादई नदीच्या प्रश्नावर शासन अत्यंत गंभीर असून, म्हादईची लढाई कर्नाटकला कधीही जिंकू देणार नाही; कारण म्हादई ही गोव्याची जीवनवाहिनी आहे. सरकार सातत्याने केंद्र सरकारकडे हे सूत्र उचलून धरत असून सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सक्षमपणे लढत आहे.
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) January 9, 2024
गोवा विधीमंडळ मंचाच्या गौरवशाली वाटचालीचे अभिनंदन करून डॉ. सावंत यांनी विविध माध्यमांतून विधीमंडळ भक्कम करण्यात मंचाचे मोठे योगदान असल्याचे सांगितले.
या वेळी उपस्थित महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या भाषणात लोकशाही व्यवस्थेत विधीमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्या महत्त्वावर भर दिला अन् प्रत्येक पैलूत तिचे सार्वभौमत्व राखण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. पाणी प्रश्नावर गोव्याला महाराष्ट्राकडून पुरेसे सहकार्य मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
नार्वेकर पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र आणि गोवा यांचे एकमेकांशी जातीय नाते आहे. दोन्ही राज्यांचे सांस्कृतिक नाते मराठी आणि कोकणी भाषांच्या गोडव्यात मिसळलेले आहे अन् त्यांची समृद्धता आणखी जपली पाहिजे.’’
गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी त्यांच्या स्वागतपर भाषणात गोवा विधीमंडळ मंचाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
विरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी त्यांच्या भाषणात म्हादई नदी आणि मांडवी नदीतील कॅसिनो या व्यतिरिक्त भूमीचे रूपांतर आणि विक्री यासंबंधीच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले.
माजी आमदार शंभूभाऊ बांदेकर, अशोक नाईक, प्रकाश वेळीप, मानू फर्नांडिस, श्रीमती संगीता परब यांचा केंद्रशासित प्रदेशाच्या काळातील विधानसभेच्या सदस्या म्हणून सत्कार करण्यात आला.
♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦