Gifts Nepal Ramlala: श्री रामललासाठी नेपाळ येथील सासरच्या मंडळींकडून ५ सहस्र भेटवस्तू !

  • श्री रामलला विशेष !

  • ५०० जण ४५० किमी दूर असलेल्या मिथिला येथून अयोध्येत पोचले !


अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथे २२ जानेवारी या दिवशी श्री रामललाच्या(श्री रामलला म्हणजे श्रीरामाचे बालरूप) मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या सासरच्या म्हणजेच नेपाळच्या मिथिला येथून ५०० लोक अयोध्येत पोचले आहेत. त्यांनी श्रीरामासाठी ५ सहस्र भेटवस्तू आणल्या आहेत. यांमध्ये कपडे, फळे, सुका मेवा, चांदीची भांडी आणि दागिने यांचा समावेश आहे.

१. नेपाळहून आलेले लोक ४ जानेवारी या दिवशी मिथिलाहून ३६ वाहनांतून अयोध्येला निघाले होते. यात्रेचे नेतृत्व जानकी मंदिराचे महंत रामतापेश्‍वर दास यांनी केले.


२. महंत गिरीशपती त्रिपाठी यांनी या लोकांचे अयोध्येत स्वागत केले. महंत रामतापेश्‍वर दास यांनी या भेटवस्तू श्रीरामजन्मभूमी मंदिर न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांच्याकडे सुपूर्द केल्या.

३. या प्रसंगी महंत रामतापेश्‍वर दास म्हणाले, काही भेटवस्तू अयोध्येतील इतर मंदिरांमध्ये स्थापित भगवान सीताराम यांना अर्पण केल्या जातील. त्यानंतर ही यात्रा मिथिला येथे परतेल. मिथीला येथील परंपरेनुसार या भेटवस्तू अयोध्येत आणण्यात आल्या आहेत. जेव्हा कन्या विवाह करून सासरी जाते, तेव्हा माहेरच्या लोकांकडून तिला संसार थाटण्यासाठी लागणार्‍या वस्तू भेट दिल्या जातात, अशी तेथील परंपरा आहे.

४. या वेळी महंत गिरीशपती त्रिपाठी म्हणाले की, आम्ही अयोध्यावासी मिथिलावासियांचा नेहमीच आदर करतो; कारण ते माता जानकीचे नातेवाईक आणि भाऊ आहेत. जेव्हा ५०० वर्षांच्या संघर्षानंतर भगवान श्रीराम भव्य मंदिरात विराजमान होत आहेत, अशा वेळी सासरच्या मंडळींकडून जी काही भेटवस्तू येते, ती संस्मरणीय असते.