‘मृत्यूनंतर जी आपल्या समवेत येईल तीच संपत्ती ! बाकी सगळी विपत्ती. बाकी सगळे दैन्य. मृत्यू धन हिरावून घेतो, सत्ता छिनून घेतो, प्रतिष्ठा हिरावून घेतो. सगळे येथेच रहाते. धन, प्रतिष्ठा, सत्ता, घरदार, बायका-पोरे, मित्र सगळे येथेच रहाते. एकटा माणूस निघून जातो. केवळ त्याच्या समवेत येते ते कर्म !
‘कर्मानुगो गच्छति जीव एक: ।’, म्हणजे परलोकाच्या मार्गावर एकट्या जिवासमवेत केवळ त्याचे कर्म येते. जीवनात काहीही आणि कितीही मिळवा; परंतु ते सर्व मृत्यू हिरावून घेईल ! जे येथेच रहायचे आहे, जे मृत्यू हिरावून घेणार आहे; म्हणून ते मिळवण्याकरता धावाधाव का करायची ? म्हणून भगवान सांगतात, ‘जे अविवेकी, मूर्ख, अविवेकी आहेत; म्हणूनच ते राक्षसी आसुरी बनतात. क्षुद्र इंद्रियांच्या सुखाकरता, चैनीकरता ते भगवंताला अंतरतात. त्याची आशा, कर्मे, त्याचे ज्ञान सगळे कवड्या, दमड्या गोळा करण्यात व्यय होते. जेथे कोहिनूर हिरा टाकून गारगोटी घेण्यासारखे त्याचे ज्ञान ! त्याची कर्मे फोल होतात. शांती, तृप्ती आणि समाधान त्यांना लाभत नाही. भगवंताच्या विन्मुख अशा राक्षसी वृत्तीचा दुर्गंध मिळतो. अशांती, बेचैनी, उद्वेग, चिंता आणि बंधन प्राप्त होते.’
‘संतांच्या जीवनात क्रांती घडवून आणणारा क्षण जाणून घेण्याजोगा आहे. नव्हे, जाणलाच पाहिजे. त्याचाच शोध जीवनात आम्हाला घ्यायचा असतो.’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साभार : मासिक ‘घनगर्जित’, डिसेंबर २०२२)