मुंबई – तमिळनाडू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून ‘केंद्रशासनही मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी पावले उचलण्याच्या सिद्धतेत आहे’, असे लक्षात येते. ते त्यांनी लवकरात लवकर करावे आणि महाराष्ट्र शासनानेही यावर कार्यवाही करावी, असे आवाहन ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी ५ जानेवारी या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिलेल्या मुलाखतीत केले.
श्री. सुरेश चव्हाणके पुढे म्हणाले, ‘‘ज्यांची देवावर श्रद्धा नाही, असे नास्तिक लोक मंदिरांमध्ये अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार आणि मंदिरांच्या निधीचा दुरुपयोग करतात. याला मंदिर सरकारीकरणाची व्यवस्था कारणीभूत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करायला हवीत. मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात ‘सुदर्शन’ वाहिनी गेल्या २० वर्षांपासून आवाज उठवत आहे. मंदिरांच्या सरकारीकरणामुळे मंदिरातील निधी अधार्मिक कार्यासाठी वापरला जातो. प्रतिवर्षी १ लाख ६० सहस्र कोटी रुपये, म्हणजे एका मासात भारत सरकारच्या वस्तू आणि सेवा करापेक्षा (जीएस्टी) अधिक पैसा मंदिरामध्ये प्रतिवर्षी येतो. ‘त्याच्या नियोजनाऐवजी त्याचा दुरुपयोग अधिक होतो’, असे म्हणणे योग्य ठरेल. या प्रकरणामध्ये केंद्रशासनाने कारवाई करावी, यासाठी हिंदूंनी पाठपुरावा घ्यायला हवा.’’
मंचावर उपस्थित असणार्या शरद पवार यांनी आव्हाड यांच्या हिंदुद्वेषी विधानावर आक्षेप का घेतला नाही ? – चव्हाणके
‘प्रभु श्रीराम शाकाहारी नव्हते, तर मांसाहारी होते’, असे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य गंभीर आणि अक्षम्य अपराध आहे. अशा अपराध्याला महाराष्ट्र शासनाने तात्काळ अटक करून कठोर शासन करायला हवे. फळे, कंदमुळे खाणार्या श्रीरामाला आपण अवतार मानतो, तसेच देव मानतो. केवळ भारतातच नाही, तर भारताबाहेरही श्रीरामाचे कोट्यवधी भक्त आहेत. आव्हाड यांच्यामुळे त्या भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. जितेंद्र आव्हाड) यांनी असे वक्तव्य केले, तेव्हा शरद पवार हेही उपस्थित होते. त्यांनी त्या वेळी आणि आतापर्यंत यावर काहीच आक्षेप का घेतला नाही ? त्यांच्या पक्षाने आव्हाड यांच्यावर कारवाई का नाही केली ? प्रभु श्रीरामचंद्रांचा अवमान होत असतांना शरद पवार यांचे मौन, हेही पापच आहे. आव्हाड आणि त्यांना पाठीशी घालणारे हे सगळे अपराधी आहेत. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी या वेळी सुरेश चव्हाणके यांनी केली.