TMC Attack ED Team : तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर धाड घालण्यासाठी गेलेल्या ‘ईडी’च्या पथकावर आक्रमण !

२०० जणांनी केलेल्या आक्रमणात पथकाच्या वाहनांची तोडफोड !

पथकाच्या वाहनांची तोडफोड

कोलकाता – बंगालमधील संदेशखळी येथे तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याच्या घराजवळ अंमलबजावणी संचालनालयाच्या (‘ईडी’च्या) पथकावर आक्रमण करण्यात आले. रेशन वितरण घोटाळ्याच्या प्रकरणी शेखच्या घरावर धाड घालण्यासाठी ‘ईडी’चे पथक तेथे गेले होते. या वेळी २०० हून अधिक लोकांनी ईडीचे अधिकारी आणि केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलाचे सैनिक यांच्यावर आक्रमण केले. जमावाने सरकारी अधिकार्‍यांच्या वाहनांचीही तोडफोड केली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

(सौजन्य : Republic World)

शाहजहान शेख संदेशखळीतील ‘डॉन’ ! – राहुल सिन्हा, भाजप नेते

गुंडांचा भरणा असलेला तृणमूल काँग्रेस पक्ष !

‘ईडी’च्या पथकावर झालेल्या आक्रमणाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना भाजपचे बंगाल राज्याचे माजी अध्यक्ष राहुल सिन्हा म्हणाले, ‘तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख संदेशखळी परिसरातील ‘डॉन’ आहे. त्याच्यावर हत्येचे अनेक गुन्हे नोंद आहेत. तो तृणमूल काँग्रेसचा नेता असल्याने पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत. आम्ही या घटनेचा निषेध करत कारवाई करण्याची मागणी करत आहोत.’

‘ईडी’च्या पथकावर आक्रमण

भविष्यात बंगाली लोकांसोबतही हे घडेल ! – सुकांत मजुमदार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले, ‘संदेशखळी येथे आज ज्या पद्धतीने ‘ईडी’च्या पथकावर आक्रमण झाले, त्यावरून रोहिंग्या मुसलमान बंगालमध्ये घुसून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहेत, हे दिसून येते. हे केवळ ‘ईडी’सोबतच होणार नाही, तर भविष्यात बंगाली लोकांसोबतही हे घडेल. विद्यमान सरकार जोपर्यंत सत्तेत असेल, तोपर्यंत असेच होत राहील.’

मंत्री ज्योती प्रियो मलिक आणि गिरणी मालक रेहमान यांना केली होती अटक !

या रेशन वितरण घोटाळ्याच्या प्रकरणी १४ ऑक्टोबर २०२३ या दिवशी तपासयंत्रणेने पीठ आणि तांदूळ गिरणी मालक रेहमानला अटक केली होती. नंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी बंगालचे मंत्री ज्योती प्रियो मलिक यांनाही अटक करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

सत्ताधारी पक्षातील नेतेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला वेशीवर टांगत आहेत. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने यांस मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे समर्थन असणार, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? त्यामुळे आतातरी केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !