रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात हिंदु राष्ट्राची अनुभूती घेणारे सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी (वय ७९ वर्षे) आणि सौ. सुलभा कुलकर्णी (वय ७४ वर्षे) !

‘२७ ते ३०.९.२०२३ या कालावधीत आम्हाला गुरुमाऊलींच्या कृपेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाच्या दर्शनाची सुवर्णसंधी लाभली. यासाठी आम्ही उभयता अत्यंत कृतज्ञ आहोत. आम्हाला अदमासे १६ – १७ वर्षांपूर्वी या आश्रमाच्या दर्शनाची संधी मिळाली होती. त्यानंतर आम्ही भक्तीसत्संग आणि दैनिक यांतून भूवैकुंठाचे वर्णन अन् महती ऐकत आणि वाचत होतो. आश्रमदर्शनाचा निरोप मिळाल्यापासून आणि आश्रमात आल्यापासून ‘आम्हाला प्रत्येक श्वासाबरोबर आश्रमाच्या कणाकणातील चैतन्य ग्रहण करता येऊ दे आणि प्रत्येक क्षणी आमचा प्रारब्धाचा डोंगर न्यून होऊ दे’, अशी आमच्याकडून प्रार्थना होत होती. आश्रमाचे साक्षात् भूवैकुंठात झालेले परिवर्तन पाहून आम्हाला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

श्री. दत्तात्रेय कुलकर्णी

१. आश्रमदर्शन करतांना अनुभवलेले दिव्य अमृतकण

१ अ. मुख्य प्रवेशद्वार – आश्रमाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंच्या चौथर्‍यांवरील ऐरावत (हत्तींच्या मूर्ती), त्रिशूळ, सिंहध्वज आणि गजध्वज यांनी आमचे स्वागत केले. तेथील शक्ती, चैतन्य आणि आनंद अनुभवत आम्ही आश्रमाच्या प्रांगणात प्रवेश केला.

१ आ.  आश्रम परिसर – तेथील श्री सिद्धिविनायकाची मूर्ती, श्री भवानीदेवीची मूर्ती, कमलकुंड आणि कमलपीठ आणि यज्ञभूमी पाहून ‘सर्वत्रच्या साधकांच्या रक्षणासाठी प्रमुख देवीदेवता सिद्ध झाल्या आहेत’, असे जाणवले. त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतांना आम्हाला चैतन्य आणि शक्ती अनुभवता आली.

१ इ. दक्षिणाभिमुखी मारुतीचे दर्शन घेतांना – ‘मारुति आम्हा सर्व साधकांना खांद्यावर घेऊन वायुवेगाने गुरुदेव आणि श्रीराम यांच्या चरणांजवळ घेऊन जात आहे’, असे जाणवले. हे पाहून शिष्यभाव, सेवाभाव आणि समर्पणभाव जागृत झाले.

सौ. सुलभा कुलकर्णी

१ ई. धर्मध्वजाला वंदन करतांना आमच्याकडून हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना झाली आणि आम्ही अभिमानाने जयघोष केला.

१ उ. आश्रम परिसरातील औदुंबराची रोपे पाहून – ‘दत्ततत्त्व आश्रम परिसरात कार्यरत असून ब्रह्मा, विष्णु आणि महेश स्वरूपात अनुक्रमे परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ आपल्या पाठीशी आहेत’, असे जाणवले. त्यामुळे आमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढले.

१ ऊ. स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र – त्यात सात्त्विकता जाणवून ‘प.पू. भक्तराज महाराज स्थूलरूपाने आश्रम आणि सर्व साधक यांचे रक्षण करत आहेत’, असे जाणवले.

१ ए. श्रीकृष्णाचे छायाचित्र – ‘श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र आश्रम आणि साधक यांच्याभोवती फिरत असून साधकांचे रक्षण करत आहे. आश्रमातील वातावरण शुद्ध होत आहे आणि कोणत्याही बाजूकडे पाहिल्यास श्रीकृष्ण आपल्याकडेच पहात आहे’, असे जाणवले.

१ ऐ. ध्यानमंदिरातील गुरुशिष्य परंपरा आणि देवतांची मांडणी – प.पू. गुरुदेवांच्या शिष्यभावाचे मूर्तीमंत रूप पहाण्यास मिळाले. गुरुपरंपरेचे दर्शन घेतांना चैतन्य अनुभवता येऊन काही काळ ध्यानावस्था येऊन सर्व जगाचा क्षणभर विसर पडला. त्यांना कृतज्ञतापुष्पांची ओंजळ अर्पण केल्यावर कृतकृत्यता वाटली.

१ ओ. आश्रमात विविध ठिकाणी लादीवर उमटलेले ‘ॐ’ पाहून आश्रमातील सात्त्विकतेचे स्थूलरूपात दर्शन झाले.

वरील आणि इतर अनेक पालट पाहून ‘हिंदु राष्ट्र प्रथम भूवैकुंठरूपी रामनाथी आश्रमात येणार’, याची प्रचीती आली.

२. शिकायला मिळालेली सूत्रे

अ. आश्रमातील सर्वच सेवांचे नियोजन, स्वच्छता, सात्त्विक वातावरण, आधुनिकीकरण आणि साधकांचा प्रेमभाव अन् नम्रता पाहून हिंदु राष्ट्राची प्रत्यक्ष झलक अनुभवता आली.

आ. आश्रमास भेट देणार्‍या प्रत्येकाला आनंद देण्याचे विनम्रतेने, सौजन्याने आणि प्रेमाने नियोजन केले जाते. साधकांनी आमच्या भेटीदरम्यान माझी पत्नी सौ. सुलभाचा वाढदिवस साजरा करून आणि माझा (श्री. कुलकर्णी यांचा) ‘साधनाप्रवास’ हा लेख प्रसिद्ध करून आमचा आनंद द्विगुणित केला.

३. संत आणि सद्गुरु यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

अ. आपण बाहेर समाजात संतांसाठी वेगळी व्यवस्था, त्यांचे मानपान, त्यांचे समाजात न मिसळणे इत्यादी प्रकार पहातो. इथे आश्रमात मात्र सर्व संत आणि सद्गुरु इतके सहजतेने सर्वांशी वागतात की, आपल्यालाच संकोचल्यासारखे होते.

आ. सद्गुरु गाडगीळकाकांना आम्ही लांबून नमस्कार करताच त्यांनी बसल्या ठिकाणाहून उठून आमच्याजवळ येऊन विचारपूस केली. किती ही नम्रता आणि प्रेमभाव !

इ. पू. संदीपदादा (सनातनचे संत पू. संदीप आळशी) जेवतांना आमच्याजवळ येऊन बसत आणि आमची प्रेमाने चौकशी करत. त्यांनी सौ. सुलभाच्या वाढदिवशी तिला नमस्कार करून शुभेच्छा दिल्या. किती ही अहंशून्यता आणि मायेचा ओलावा !

ई. पू. परांजपेकाका आणि पू. (सौ.) परांजपेकाकू यांनी वाढदिवसाच्या दिवशी औक्षण केले आणि आशीर्वाद दिले. किती हा प्रेमभाव, निर्मळता आणि सहजता !

उ. हे सर्व पाहून ‘सर्व संत आणि सद्गुरु हिंदु राष्ट्राचे आधारस्तंभ आहेत’, याची प्रचीती येते.

ऊ. गुरुमाता श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सत्संगात परमोच्च प्रीती आणि तत्त्वनिष्ठता अनुभवायला मिळाली.

आम्हाला आश्रमातील चैतन्य, शक्ती आणि आनंद यांमुळे सतत उत्साही अन् आनंदी रहाता आले. त्याच उत्साहात माझी (श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांची) नेहमीची व्यष्टी साधनेची सूत्रे, प्राणायाम, व्यायाम, फिरणे यांमध्ये गुरुकृपेने कोणताही खंड पडला नाही. याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो.

गुरुदेवांनी लिहून घेतलेली ही सूत्रे गुरुचरणी कृतज्ञताभावाने समर्पित करत आहोत.’

– आपले चरणदास,

श्री. दत्तात्रय बाळकृष्ण कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७९ वर्षे) आणि सौ. सुलभा दत्तात्रय कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७४ वर्षे), सांगली. (४.१०.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक