प्रत्येक रुग्ण साधकावर अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्रेमाने उपचार करणारे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे (वय ६४ वर्षे) !

मार्गशीर्ष कृष्ण नवमी (५.१.२०२४) या दिवशी आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांचा ६४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने वेद कुटुंबियांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे

आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांना ६४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

१. श्रीमती मिथिलेश वेद (पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद यांच्या पत्नी, अयोध्या)

१ अ. साधकांना साधनेचे दृष्टीकोन समजावून सांगणे : ‘वर्ष २००० मध्ये आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे उत्तर भारतात अध्यात्म प्रसारासाठी यायचे. ‘साधकांची साधना चांगली व्हावी’, यासाठी ते प्रत्येक सूत्र चांगल्या प्रकारे समजावून सांगत असत.

१ आ. आधुनिक वैद्य मराठेकाका अयोध्या येथील शिबिरात साधकांकडून झालेल्या चुका त्यांना अत्यंत विनम्रतेने समजावून सांगत असत.

१ इ. स्वतःची प्रकृती बरी नसतांनाही रुग्ण साधकांना औषधोपचाराविषयी मार्गदर्शन करणे : वर्ष २०१९ मध्ये आम्ही अयोध्या येथे घरी असतांना एकदा माझ्या यजमानांची (सनातनचे १०७ वे (समष्टी) संत पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद यांची) प्रकृती पुष्कळच बिघडली; परंतु तेव्हा आम्हाला ‘आधुनिक वैद्य मराठेकाकांचीच प्रकृती बरी नाही’, असे समजले. पू. वेद यांना अत्यंत वेदना होत होत्या आणि अयोध्येतील आधुनिक वैद्यांच्या औषधांनी त्यांना काहीच गुण येत नव्हता; म्हणून शेवटी पू. वेद यांनी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना करून आधुनिक वैद्य मराठेकाकांना भ्रमणभाष केला आणि स्वतःच्या प्रकृतीच्या संदर्भात सांगितले. तेव्हा मराठेकाका त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही रामनाथी आश्रमात या. येथे आपण चांगल्या आधुनिक वैद्यांना दाखवू.’’

२. सौ. क्षिप्रा जुवेकर (पू. (कै.) डॉ. वेद यांची मुलगी) (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), जळगाव

२ अ. प्रवास करून थकून आल्यावरही साधिकेच्या शंकांचे निरसन करणे : ‘एकदा सनातन संस्थेने प्रकाशित केलेला एक ग्रंथ वाचतांना माझ्या मनात काही प्रश्न निर्माण झाले. त्याच रात्री आधुनिक वैद्य मराठेकाका आमच्या घरी रहायला आले होते. ते दूरवरून प्रवास करून आले होते आणि अत्यंत थकले होते; परंतु ‘मी ग्रंथातील काही प्रश्न विचारण्यासाठी काढले आहेत’, हे त्यांना समजल्यावर त्यांनी विश्रांती न घेता माझ्या सर्व शंकांचे निरसन केले.

२ आ. पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद रुग्णाईत असतांना कुटुंबियांना प्रेमाने आधार देणे : कोरोनाच्या काळात पू. बाबांची (पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद यांची) प्रकृती अकस्मात् गंभीर झाली. तेव्हा आधुनिक वैद्य मराठेकाकांनी आम्हाला पुष्कळ आधार दिला. ते आम्हाला प्रेमाने

श्रीगुरूंवरील श्रद्धा वाढवायला सांगायचे. त्यामुळे पू. बाबा कर्करोगाने रुग्णाईत असतांना आणि त्यांनी देहत्याग केल्यावरही आम्ही पुष्कळ स्थिर राहू शकलो. आधुनिक वैद्य मराठेकाकांनी आम्हाला केवळ मानसिक स्तरावर सांभाळले नाही, तर आध्यात्मिक स्तरावरही योग्य दृष्टीकोन दिले. दृष्टीकोन देतांना त्यांनी आमच्या भावनाही लक्षात घेऊन आम्हाला मार्गदर्शन केले. त्यामुळे एवढ्या कठीण प्रसंगातही आम्ही सर्व जण स्थिर राहू शकलो.

२ इ. श्री. प्रशांत जुवेकर यांच्या शस्त्रकर्माच्या वेळीही त्यांच्या प्रकृतीची सतत विचारपूस करून आधार देणे : श्री. प्रशांत जुवेकर (माझ्या यजमानांचे) यांचे नाशिक येथे मोठे शस्त्रकर्म झाले, तेव्हाही आधुनिक वैद्य मराठेकाका त्यांच्या प्रकृतीचा सतत पाठपुरावा घेऊन आम्हाला आधार देत होते.

३. श्री. प्रशांत जुवेकर (पू. (कै.) डॉ. नंदकिशोर वेद यांचा जावई) आणि सौ. क्षिप्रा जुवेकर (पू. (कै.) डॉ. वेद यांची मुलगी), जळगाव

३ अ. आधुनिक वैद्य मराठे संपूर्ण समर्पणभावाने आणि एकाग्रतेने औषधोपचार करत असणे : आधुनिक वैद्य मराठे त्यांच्याकडे येणार्‍या रुग्णाला होणारा त्रास जणू ‘त्यांना स्वतःला त्रास होत आहे’, अशा भावाने रुग्णावर संपूर्ण समर्पणभावाने आणि एकाग्रतेने औषधोपचार करतात.

३ आ. संत आणि रुग्ण साधक यांच्यावर औषधोपचार करतांना भेद न करणे : आधुनिक वैद्य मराठेकाका अनेक संतांवरही उपचार करतात; परंतु आजपर्यंत त्यांच्याकडून ‘संतांविषयी अधिक संवेदनशीलता आणि बाकी रुग्णांना अल्प महत्त्व दिले’, असे कधीच झाले नाही. ‘प्रत्येकच रुग्णाला ते त्याच संवेदनशीलतेने, अत्यंत तळमळीने आणि आस्थेने पहातात’, असे आम्ही अनुभवले आहे.’

श्रीगुरूंच्या कृपेने आम्हाला आधुनिक वैद्य मराठेकाकांचे सान्निध्य आणि मार्गदर्शन मिळत आहे. यासाठी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’


सनातनचे २६ वे (समष्टी) संत पू. सदाशिव (भाऊ) परब (वय ८२ वर्षे) यांना आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

पू. सदाशिव (भाऊ) परब

‘वर्ष २००४ पासून मी आधुनिक वैद्य मराठेकाकांना ओळखतो. माझ्याकडे गोवा येथील डिचोली आणि वाळपई येथील प्रचाराची सेवा होती. तेव्हा प्रत्येक ३ मासांनी मला वाळपई येथील धामसे सेवाकेंद्रात सेवेसाठी जावे लागत होते. धामसे सेवाकेंद्र आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांच्या जागेत आहे. सौ. मराठेकाकू कधी धामसे येथे आल्या, तर त्या साधकांसाठी सकाळचा अल्पाहार आणि दुपारचा महाप्रसाद यांची व्यवस्था आनंदाने अन् प्रेमाने करायच्या. त्यामुळे माझी आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे आणि त्यांच्या पत्नी सौ. मंगला मराठे यांच्याशी चांगली ओळख आहे.

१. पू. सदाशिव (भाऊ) परब यांना आवश्यक असलेली मधुमेहाची औषधे तत्परतेने आणि प्रेमाने पाठवणे

वर्ष २००८ मध्ये मला मधुमेह झाला. उपचारांसाठी मी आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांच्याकडे जात असल्यामुळे माझी त्यांच्याशी जवळीक वाढली. वर्ष २०११ पासून मी प्रचारकार्यानिमित्त महाराष्ट्रात असतो. त्यामुळे मला प्रत्येक मासाला मधुमेहासाठी जेवढी औषधे लागतात, तेवढी औषधे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे मी जिथे सेवेला असतो, तिथे पाठवून देतात. औषधांसाठी माझा त्यांच्याशी वरचेवर संपर्क होतो. मी प्रत्येक १- २ मासांनी रक्ताची तपासणी करून आलेला अहवाल त्यांना पाठवतो. त्याप्रमाणे ते माझ्या औषधांचा डोस उणे-अधिक करून ती औषधे तत्परतेने न चुकता मला पाठवतात. ते वरचेवर माझ्या आरोग्याचीही प्रेमाने विचारपूस करतात. ते माझ्याशी स्वतःच्या पाठच्या भावाप्रमाणे प्रेमाने वागतात.

२. घरच्या शुभकार्याला पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा आशीर्वाद मिळाल्यावर त्यात समाधानी असणे

मराठेकाका माझ्याशी मनमोकळेपणाने वागतात. त्यांच्या घरी शुभकार्य करण्याचे ठरल्यावर ते मला ‘‘शुभकार्यासाठी उपस्थित राहिलात, तर बरे होईल’’, असे आवर्जून सांगतात. मला त्यांच्या शुभकार्याला उपस्थित रहाता न आल्यास ते वाईट वाटून न घेता मला समजून घेतात. ते मला म्हणतात, ‘‘पू. भाऊकाका तुमचा आशीर्वाद मिळाला, तरी आम्ही समाधानी आहोत.’’ शुभकार्य झाल्यानंतर ते त्याचे सविस्तर वर्णन सांगून ‘‘अजून काय करायला हवे होते ?’’ असे मला विचारतात. त्यांच्यात पुष्कळ भाव आहे.

३. जाणवलेला पालट

अलीकडे मला आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांच्या तोंडावळ्यावर  पुष्कळ चैतन्य जाणवते.

४. कृतज्ञता

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी माझ्याकडून हे लिखाण लिहून घेतले’, यासाठी मी त्यांच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– आपला चरणसेवक,

(पू.) सदाशिव (भाऊ) परब, कोल्हापूर सेवाकेंद्र (१.११.२०२३)


आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांच्यामध्ये जाणवलेले चांगले पालट

१. श्रीमती अदिती देवल, (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६५ वर्षे) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१ अ. कुठल्याही प्रश्नांची त्वरित उत्तरे देणे : ‘पूर्वी आधुनिक वैद्य मराठेकाका यांना माझा रक्तदाब वाढलेला असतांना ‘कुठली गोळी घेऊ ?’, असे विचारल्यावर त्यांच्याकडून उत्तर मिळायला विलंब होत असे; पण आता मी काहीही विचारले, तरी ते त्याचे त्वरित उत्तर देतात. आम्ही संकलित करत असलेल्या लेखात कधी वैद्यकीय दृष्टीने काही लिहिलेले असते. ‘ते योग्य आहे का ?’, असे विचारल्यावर ते त्वरित उत्तर देतात. ‘आता त्यांच्यात चांगला पालट झाला आहे’, असे मला जाणवते.’ (१.४.२०२३)

२. अधिवक्त्या (सौ.) दुर्गा मिलिंद कुलकर्णी, फोंडा, गोवा.

१. ‘आधुनिक वैद्य मराठेकाका यांच्या चेहर्‍यावर तेज जाणवते.

२. त्यांच्याशी बोलतांना सकारात्मक स्पंदने जाणवतात.

३. पूर्वी त्यांचे बोलणे समजायला जड जायचे. आता त्यांच्या बोलण्याचे सहज आकलन होते.

परात्पर गुरुदेव, मराठेकाकांसारखे आधुनिक वैद्य साधक आपणच आम्हाला दिलेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला तुमची प्रीती अनुभवता येते. त्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’ (७.३.२०२३)


सर्वांशी जवळीक असणारे आणि सनातनच्या साधकांचा आधार असणारे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे !

१. होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी, नागेशी, गोवा.

१ अ. सतत उत्साही आणि कार्यरत असणे : ‘आधुनिक वैद्य मराठेकाका सतत उत्साही आणि कृतीशील असतात. त्यांच्या वयाच्या (वय ६३ वर्षे) मानाने ते विश्रांती न घेता सतत सेवारत असतात. वयाच्या तुलनेत काकांची क्रियाशीलता पाहून आम्हा सर्वांनाच उत्साहाने सेवा करण्याची प्रेरणा मिळते.

१ आ. ‘सेवा आणि त्यातील बारकावे विसरू नये’, यासाठी गजर लावणे : काकांकडे अनेक सेवा असल्यामुळे आणि ‘वयोमानानुसार सेवा अन् त्यातील बारकावे विसरू नये’, यासाठी ते प्रत्येक सेवेसाठी गजर (Reminder) लावून ठेवतात.

१ इ. सेवेचा ध्यास : मागील मासात काकांची ‘अँजिओग्राफी’ झाली. त्यानंतर ४ दिवसांत सेवेच्या ध्यासाने ते पुन्हा आश्रमात येऊ लागले.’ (७.३.२०२३)

२. वैद्या (कु.) मोनिका अरविंद कल्याणकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

२ अ. साधकांना घडवणे : ‘मला वैद्यकीय सेवेसाठी रामनाथी (गोवा) येथून सनातनच्या आश्रमातून देवद, पनवेल येथील  आश्रमामध्ये जायचे आहे’, हे कळल्यानंतर रामनाथीतील माझे वैद्यकीय प्रशिक्षण यथायोग्य व्हावे; म्हणून डॉ. मराठेकाका यांनी ‘त्यांच्याकडून आणि अन्य वैद्यांकडून मी कशा प्रकारे शिकल्यास लाभ होऊ शकतो ?’, हे सांगून माझ्या शिकण्याचे नियोजन केले. त्यांच्या हसत-खेळत शिकवण्याच्या कौशल्यामुळे (कठीण गोष्ट सोदाहरण सोपी करून सांगण्यामुळे) शिकणार्‍यालाही आनंद मिळतो. मला ‘एक चांगली साधक वैद्या’ म्हणून घडवण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले. माझ्याप्रमाणे अन्य अनेक वैद्यांनाही त्यांनी घडवले आहे. ते कोणत्याही गोष्टीचा सर्वांगाने विचार करण्यास शिकवतात आणि रोगाचे कारण शोधून ते रोग मुळापासून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतात.

२ आ. डॉ. मराठेकाकांमध्ये ‘इतरांना मनापासून साहाय्य करणे’ हा गुण प्रकर्षणाने जाणवतो. ते स्वतःचा विचार न करता नेहमी इतरांच्या भल्याचाच विचार करतात.

२ इ : डॉ. मराठेकाकांकडे पुष्कळ ज्ञान आणि अनुभव आहे, तरीही ते शिकण्याच्या स्थितीत असतात. त्यांच्या अनेक ओळखी असून त्यांनी सर्वांना चांगले जोडून ठेवले आहे. त्यांना काही अडले, तर ते तज्ञांकडून समजून घेतात. यातून त्यांच्यातील ‘अहं अल्प आहे’, हे जाणवते. त्यांच्याशी बोलतांना किंवा त्यांना प्रश्न विचारतांना कधीही ताण येत नाही.

२ ई. डॉ. मराठेकाकांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे अनेक रुग्णांना त्यांच्याकडूनच वैद्यकीय सल्ला हवा असतो. रुग्णांना ते केवळ भेटले, तरी आनंद होतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने या जिवाला वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली आणि त्यांनीच ही सूत्रे लिहून घेतली; म्हणून त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (१२.४.२०२३)

३. अधिवक्त्या (सौ.) दुर्गा मिलिंद कुलकर्णी, फोंडा, गोवा. 

३ अ. ‘आधुनिक वैद्य मराठे एवढे उच्चशिक्षित असूनही त्यांचे राहणीमान साधे आहे.

३ आ. आधुनिक वैद्य, त्यांची रुग्णालये आणि औषध विक्रेते यांना चांगले जोडून ठेवणे : काकांचे समाजातील लोकांशी पुष्कळ चांगले संबंध आहे. समाजातील आधुनिक वैद्य, त्यांची रुग्णालये आणि औषध विक्रेते यांना त्यांनी चांगले जोडून ठेवले आहे. त्यांच्या या गुणाचा लाभ त्यांना सेवेत आणि साधकांना त्यांच्या उपचारांत होतो.

३ इ. यजमानांच्या रक्तातील ‘हिमोग्लोबिन’ न्यून झाल्यावर त्यांच्यासाठी आवश्यक असलेले ‘इंजेक्शन’ अल्प मूल्यात मिळवणे आणि यजमानांच्या मनाची ‘इंजेक्शन’ घेण्याची सिद्धता करून घेणे : जानेवारी २०२३ मध्ये माझ्या यजमानांच्या रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण ६ ग्रॅम प्रती डेसिलीटर इतके न्यून झाले होते (सर्वसाधारणपणे युवा पुरुषांमध्‍ये हिमोग्‍लोबिन १४ ते १८ ग्रॅम प्रती ‘डेसिलीटर’ असते.); परंतु यजमानांची रुग्णालयात भरती होऊन ‘इंजेक्शन’ घ्यायची सिद्धता होत नव्हती. मराठेकाकांनी त्यांना सर्व उपचार सांगून त्यांच्या मनाची सिद्धता करून घेतली. त्यांनी संबंधित रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांना भ्रमणभाषवर लघुसंदेश करून ‘किती मात्रा (डोस) औषध लागेल ?’, हे विचारले आणि ते ‘इंजेक्शन’ सवलतीच्या मूल्यात मिळण्यासाठी हितचिंतक आणि औषध विक्रेते यांना भ्रमणभाषवर लघुसंदेश पाठवला. त्याचप्रमाणे ‘काही अडचण आल्यास ते ‘इंजेक्शन’ परत करावे लागेल’, असेही त्यांना सांगितले. अशा प्रकारे काकांनी सर्वतोपरी साहाय्य केल्यामुळे माझ्या यजमानांना ‘इंजेक्शन’ घेता आले.

३ ई. आधुनिक वैद्य मराठेकाका यांना असलेले ज्ञान आणि अनुभव याचा त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही अहं जाणवत नाही.’ (७.३.२०२३)

४. कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

४ अ. कर्मयोगी : ‘ते त्यांच्यातील कौशल्य आणि ज्ञान यांचा साधना म्हणून पुष्कळ चांगल्या पद्धतीने उपयोग करतात. ‘काका कर्मयोगानुसार साधना करतात’, असे मला जाणवते.

४ आ. अल्प अहं : काका अनेक गोष्टी एकाच वेळी करत असतात. त्यांना वैद्यकीय क्षेत्रातील पुष्कळ अनुभव आहे, तरीही त्यांना त्याचा अहं नाही.

‘आम्हाला अशा अष्टपैलू आणि गुणी काकांचा सहवास मिळत आहे’, त्याबद्दल परम पूज्य डॉक्टरांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) चरणी कृतज्ञता.’

५. रजनी नगरकर (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

५ अ. सेवेची तळमळ : ‘काका वैद्यकीय सेवेचा मोठा व्याप सहजतेने सांभाळतात. ते अन्य वैद्यांचेही मार्गदर्शन घेत असतात. सहसाधकांच्या साधनेकडे लक्ष देणे आणि त्यांचा आढावा घेणे, अशा अनेक सेवा ते अन्य साधकांच्या साहाय्याने सहजतेने करतात.

५ आ. कर्तेपणा देवाच्या चरणी अर्पण करणे : काकांचे त्यांच्या डॉक्टरी पेशावर इतके प्रेम आहे की, ते प्रत्येक रुग्ण साधकात देव बघतात. रुग्ण साधकाची प्रकृती ठीक झाल्यावर काकांच्या चेहर्‍यावर जी क्षणिक आनंदाची झलक दिसते, ती बघण्यासारखी असते. ते तेव्हा दाखवत नाहीत; पण मनातून देवाला सांगत असतात, ‘देवा, तूच या रुग्णाला बरे केलेस ना ? त्याचे श्रेय तूच घे.’ नंतर नेहमीप्रमाणे ते त्या रुग्णाशी बोलू लागतात.

५ इ. समाजातील आधुनिक वैद्यांशी चांगले संबंध ठेवून त्यांना सनातन संस्थेच्या समष्टी कार्यात सहभागी करून घेणे : त्यांच्या समष्टी सेवेतील महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचे समाजातील अनेक तज्ञ आधुनिक वैद्यांशी चांगले संबंध आहेत. त्यांनी रुग्ण साधकांना समाजातील आधुनिक वैद्यांकडे पाठवून समाजातील आधुनिक वैद्यांना एक प्रकारे सनातन संस्थेशी जोडले असून संस्थेच्या समष्टी कार्यात सहभागी करून घेतले आहे. ‘ही त्यांची पुष्कळ मोठी समष्टी सेवाच आहे’, असे मला वाटते.’ (१०.३.२०२३)

६. सौ. अवंतिका दिघे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

६ अ. सेवाभाव : ‘मराठेकाकांची सेवा अविरत चालू असते. ते वैयक्तिक कामानिमित्त घरी असले, तरी ‘व्हॉट्स ॲप’ किंवा भ्रमणभाष करून त्वरित उत्तरे देतात. ते ‘आवश्यक सूत्रे आणि ‘कृती काय करायची ?’, तेही सुचवतात. ते सेवा करतांना कुठे चालढकलपणा किंवा टाळाटाळ करत नाहीत.

६ आ. तत्परता आणि प्रेमभाव : ‘आधुनिक वैद्य मराठेकाकांमध्ये आता प्रेमभाव वाढला आहे. त्यांना काही प्रश्न ‘व्हॉट्स ॲप’वर विचारले, तरी ते त्याची उत्तरे त्वरित आणि आवश्यक शब्दांत देतात. आजार आणि औषध यांविषयीची माहिती समजावून सांगतात.’

(क्रमशः)

(७.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या आणि साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक