साधकांचा आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी नामजप करणार्‍या सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारे (वय ८४ वर्षे) !

‘आज मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी (२.१.२०२४) या दिवशी पू. कुसुम जलतारेआजी यांचा ८४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. कुसुम जलतारे

पू. (श्रीमती) कुसुम जलतारे यांच्या चरणी ८४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. आध्यात्मिक ऊर्जेच्या बळावर कृती करणे

‘पू. जलतारेआजी यांचे वय ८४ वर्षे झाले असले, तरीही त्या आध्यात्मिक ऊर्जेच्या बळावर कुठलीही कृती बराच वेळ करू शकतात, उदा. सलग २ घंटे नामजप करणे, इमारतीचे ३ – ४ माळे चढणे, धार्मिक विधीसाठी बराच वेळ बसणे.

अधिवक्ता योगेश जलतारे

२. साधकांचा आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी नामजप करणे

पू. जलतारेआजी साधक आणि संत यांना होणारे आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी नामजप करतात. त्यांनी नामजप केल्यावर साधकांचा त्रास उणावतो. काही वेळा पू. आजींना त्या साधकासाठी दुसरा नामजप करण्यासाठी निरोप येतो. तसा निरोप येण्यापूर्वीच पू. आजींचा दुसरा नामजप आपोआप चालू होतो.

३. वार्धक्यामुळे जाणवणारी भीती दूर होणे

पूर्वी पू. आजींना वार्धक्यामुळे एकटे असतांना असुरक्षित वाटत असे. ‘आपल्या सभोवती नेहमी कुणीतरी असावे’, असे त्यांना वाटत असे. सहसाधिकांच्या व्यस्ततेमुळे पू. आजींना बराच वेळ खोलीत एकटे रहावे लागते; मात्र त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. आता पू. आजींना एकटेपणाची भीती वाटत नाही.

४. साक्षीभावाच्या स्थितीत रहाणे

पू. आजींचे देहभान पुष्कळ अल्प झाले आहे. त्या नेहमी साक्षीभावाच्या स्थितीत असतात. त्या लौकिक जगात रहात असूनही त्याविषयी पू. आजींच्या मनात काहीच विचार नसतात. कुणी पू. आजींशी अनावश्यक बोलत असल्यास त्या सतत नामजप करतात. आमचे काही कुटुंबीय पू. आजींना भ्रमणभाष करून त्यांच्याशी कौटुंबिक विषयांवर बोलत असतात. तेव्हा पू. आजी थोडा वेळ त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात आणि नंतर मला त्या व्यक्तीशी बोलायला सांगतात. पू. आजींना मायेतील गोष्टींविषयी बोलण्याऐवजी आध्यात्मिक विषयांवर बोलायला आवडते.

५. आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी नामजप करतांना ध्यान लागणे आणि देवता अन् श्री गुरु यांचे दर्शन होणे

पू. आजी साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी नामजप करतात. तेव्हा त्या भावस्थितीत असतात आणि त्यांचे ध्यान लागते. त्या वेळी त्यांना देवता आणि श्री गुरु यांचे दर्शन होते. साधकांना होणारा आध्यात्मिक त्रास दूर झाल्यावर पू. आजींना पुष्कळ आनंद होतो.’

– अधिवक्ता योगेश जलतारे (पू. जलतारेआजींचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.१२.२०२३)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.