नगर – नर्मदेची पायी परिक्रमा ही खडतर तपश्चर्याच आहे. आपली पूर्वपुण्याई असेल तरच नर्मदा मैय्या पायी परिक्रमा करू देते. परिक्रमा श्रद्धेने केल्यास जीवनातील शाश्वत आनंदाची प्राप्ती होते. भारतात देवीची शक्ती उपासना अनेक तपांपासून केली जाते. नर्मदेची पायी परिक्रमा ही शक्तीची उपासनाच आहे. निसर्गाशी एकरूप होण्यासह सामाजिक समरसतेचा आनंद नर्मदेची पायी परिक्रमा देते, असे नर्मदेची पायी परिक्रमा केलेले साहित्यिक पत्रकार श्री. मिलिंद चवंडके यांनी सांगितले. येथील दिल्लीगेट जवळील श्री नाना महाराज मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या २३१ व्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ‘नर्मदा परिक्रमा – एक दिव्य अनुभूती’ या विषयावर प्रवचन करतांना ते बोलत होते. मंदिराच्या वतीने श्री. भगवान देशमुख आणि सी.ए. श्री. संजय देशमुख यांनी त्यांना सन्मानित केले. श्री. अर्जुन गोंधळे यांनीही पुष्पहार घालून सन्मान केला.
प्रवचनास सर्वश्री अविनाश धर्माधिकारी, एन्.डी. कुलकर्णी, बंडोपंत कुलकर्णी, राजेंद्र भागानगरे, आनंद झारखंडे, नंदकुमार भागानगरे, विजय देशमुख, सौ. प्रियांका देशमुख यांच्यासह नगर शहर आणि उपनगरातील नर्मदाप्रेमी स्त्री-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. चवंडके त्यांचे दिव्य अनुभव भाविकांच्या पुढ्यात तन्मयतेने ठेवत असतांना उपस्थितांच्या अंगावर अनेकदा रोमांच उभे राहिले. डोळ्यांमधून पाणी ओघळले. त्यांच्या ओघवत्या रसाळ अमृतवाणीने श्रोतृवृंद भारावून गेला होता. प्रवचनाची सांगता श्रोत्यांच्या शंका-समाधानानंतर हरिपाठ आणि पसायदानाने करण्यात आली. ‘प्रवचनामधून नर्मदा परिक्रमेचे अद्भूत रूप मांडत असतांना आम्हाला परिक्रमा करत असल्याचा आनंद मिळाला’, अशा प्रतिक्रिया उपस्थितांमधून उमटल्या.