ऐन वेळी अडचणी येऊनही गुरुकृपेमुळे निर्विघ्नपणे पार पडलेली हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

१. ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा चालू होण्याच्या २ घंटे आधी एका पोलीस अधिकार्‍यांनी कार्यालयात बोलावले आहे’, असे समजणे

‘२५.३.२०२३ या दिवशी एका भागात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित केली होती. हिंदु राष्ट्र-जागृती सभा सायंकाळी ६ वाजता आरंभ होणार होती. ही सभा चालू होण्याच्या २ घंटे आधी दुपारी ४ वाजता एका विभागाच्या पोलिसांचा मला भ्रमणभाष आला. ते मला म्हणाले, ‘‘तुमच्या समितीच्या संदर्भात गार्‍हाणे (तक्रार) आले आहे. तुम्ही पोलीस अधिकार्‍यांना भेटायला कार्यालयात जा किंवा त्यांच्याशी भ्रमणभाषवर बोला.’’ त्यांनी मला त्या पोलीस अधिकार्‍यांचा  भ्रमणभाष क्रमांक दिला.

श्री. हितेश निखार

२. पोलीस अधिकार्‍यांनी‘लगेच भेटायला या’, असे सांगणे

मी त्या पोलीस अधिकार्‍यांना भ्रमणभाष केला. त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही आताच भेटायला या.’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘साहेब, आमची ६ वाजता सभा आहे. आमची बरीच सिद्धता (तयारी) व्हायची आहे. मी थोड्या वेळाने आलो, तर चालेल का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमच्या सभेत अडचण निर्माण होऊ नये’, असे वाटत असेल, तर आताच या. नंतर मी दुसर्‍या पोलीस ठाण्यात जाणार आहे. तुम्ही आता आला नाहीत, तर तुम्हाला दुसर्‍या पोलीस ठाण्यात यावे लागेल.’’ मी त्यांना ‘येतो’ असे सांगितले. मी याविषयी माझ्या उत्तरदायी कार्यकर्त्यांना सांगितले.

३. ‘पोलीस ठाण्यात किती वेळ थांबावे लागेल ?’, या विचाराने ताण येणे

तेव्हा ते कार्यकर्ते मला म्हणाले, ‘‘मी प्रार्थना करतो आणि तुम्हीही करा अन् त्यांनी मला आणखी एका कार्यकर्त्यांना समवेत घेऊन जाण्यास सांगितले.’’ आम्ही पोलीस अधिकार्‍यांच्या कार्यालयामध्ये गेलो. त्या पोलीस अधिकार्‍यांनी आम्हाला त्यांच्या कक्षामध्ये बोलावले. त्यांनी आम्हाला आमचा परिचय विचारला. आम्ही त्यांना माहिती सांगत होतो. त्या वेळी मला पुष्कळ ताण आला होता; कारण सभा सायंकाळी ६ वाजता चालू होणार होती. आम्ही पोलीस ठाण्यात असतांनाच ४.३० वाजले होते. ‘ते आमचा आणखी किती वेळ घेणार ?’, या विचाराने मला ताण येऊ लागला.

४. गुरुदेवांना प्रार्थना करणे आणि ‘सनातन संस्था’ हे नाव ऐकून पोलीस अधिकार्‍यांना चांगले वाटणे अन् त्यांची सनातन संस्थेविषयी श्रद्धा असणे आणि त्या वेळी ‘गुरुदेव समोर आहेत’, असे जाणवणे

आम्ही गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) प्रार्थना केली. आम्ही पोलीस अधिकार्‍यांना सांगितले, ‘‘हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांच्या सहयोगाने ही सभा होत आहे.’’ तेव्हा ‘सनातन संस्था’ हे नाव ऐकून त्यांना चांगले वाटले. ते हसून म्हणाले, ‘‘अच्छा, सनातन संस्था का ? मला संस्थेचे कार्य ठाऊक आहे. माझी बहीण सनातनचे कार्य करते. मी तिच्याकडून सात्त्विक उत्पादने घेत असतो. मी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला महाशिवरात्रीच्या दिवशी भेट दिली आणि सात्त्विक उत्पादने विकत घेतली.’’ आम्हाला आलेला ताण त्यांचे बोलणे ऐकून नाहीसा झाला. ते आमच्याशी प्रेमाने बोलले. तेव्हा ‘साक्षात् गुरुदेव समोर आहेत’, असे मला जाणवले.

५. एका संघटनेचा हिंदु राष्ट्र-जागृती सभा होण्यासाठी विरोध असतांनाही पोलीस अधिकार्‍यांनी ‘निश्चिंतपणे सभा घ्या’, असे सांगणे

ते पोलीस अधिकारी म्हणाले, ‘‘ख्रिस्ती आणि कम्युनिस्ट (साम्यवादी) यांची एक संघटना आहे. तुमच्या सभेचा रिक्शांच्या माध्यमातून प्रचार होत असतांना त्या वेळी ‘हिंदु’ हा शब्द अनेक वेळा उच्चारला जात होता. त्या संघटनेने त्यावर आक्षेप घेत ‘ऑनलाईन’ गार्‍हाणे नोंदवले आहे. त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘ही सभा होऊ देऊ नका’, असे सांगितले आहे; पण तुम्ही निश्चिंतपणे सभा घ्या.’’

६. त्यांचे बोलणे ऐकून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. ‘गुरुदेव कठीण प्रसंगी कसे सांभाळून घेतात !’, हे मी अनुभवले. त्यानंतर आम्ही तेथून निघालो आणि सभास्थळी आलो.

७. विरोध करणार्‍या संघटनेची महिला कार्यकर्ती सभास्थानी येणे आणि तिला विचारणा केल्यावर ती निघून जाणे अन् गुरुकृपेमुळे हिंदु राष्ट्र-जागृती सभा निर्विघ्नपणे पार पडणे

सभा चालू होण्याआधी ६ पोलीस हवालदार, २ गुप्तचर पोलीस सभास्थानी आले होते. ज्या संघटनेच्या वतीने गार्‍हाणे नोंदवण्यात आले, त्या संघटनेची एक महिला कार्यकर्ती तेथे आली होती. त्या महिला कार्यकर्तीने आम्हाला अनेक प्रश्न विचारले. ती महिला ध्वनीमुद्रण आणि ध्वनीचित्रीकरण करू लागल्यावर आम्ही तिला विचारणा केली. तेव्हा ‘ती महिला पत्रकार आहे’, असे आम्हाला समजले. आम्ही त्या महिलेला आणखी विचारणा करू लागल्यावर ती महिला निघून गेली. केवळ गुरुकृपेमुळे सभा निर्विघ्नपणे पार पडली.

८. सभा झाल्यानंतर आम्ही लगेच सभेच्या विज्ञापनाचा फलक (होर्डिंग) काढला. त्या वेळी तेथे काही मुले उभी होती. ती मुले म्हणाली, ‘‘छान झाली तुमची सभा, विषय छान होते.’’

केवळ गुरुकृपेमुळेच मी हिंदु राष्ट्र-जागृती सभेची सेवा करू शकलो आणि लिहून देऊ शकलो. कृतज्ञ आहे गुरुमाऊली !’

– श्री. हितेश निखार, वर्धा.