साधकांना आईच्या मायेने घडवणार्‍या सनातनच्या ६९ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) अश्विनी पवार !

पू. (सौ.) अश्विनी पवार

१. साधकांना अंतर्मुखतेकडे नेणारा पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा चैतन्यदायी सत्संग !

‘पू. (सौ.) अश्विनी पवार देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील साधकांसाठी सत्संग घेतात. त्या वेळी ‘ईश्वरी चैतन्य कार्यरत होऊन त्यांच्या मुखातून ईश्वरच बोलत आहे’, असे मला जाणवते. त्या साधकांना नेमकेपणाने त्यांच्या चुकांच्या मुळाशी घेऊन जातात. त्यामुळे ‘त्या सत्संगात साधक अंतर्मुख होतो’, असे मला जाणवते.

कु. नलिनी राऊत

२. ‘साधकांना प्रसाद चांगलाच मिळायला हवा’, ही तळमळ असणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

पू. (सौ.) अश्विनीताईंसाठी संध्याकाळचा प्रसाद बनवण्याची सेवा माझ्याकडे असते. पू. ताईंनी प्रसाद ग्रहण केल्यानंतर त्यांना ‘पदार्थ तिखट किंवा तेलकट आहे, त्यात मीठ अल्प किंवा अधिक आहे’, यांसारख्या काही त्रुटी जाणवल्यास त्वरित माझ्या लक्षात आणून देतात आणि ‘योग्य कसे असायला हवे ?’ ते सांगतात. हे सांगत असतांना त्यांच्यातील ‘साधकांना प्रसाद चांगलाच मिळायला हवा’, ही तळमळ आणि साधकांविषयीचे अपार प्रेम जाणवते.

३. पू. (सौ.) अश्विनी पवार आश्रमात असल्याने साधकांना त्यांचा आधार वाटणे

पू. अश्विनीताई सातत्याने विविध सेवांमध्ये व्यस्त असतात. ‘त्या आश्रमात आहेत’, या जाणिवेने त्यांचा साधकांना आधार वाटतो. कधीतरी त्यांना वैयक्तिक कामानिमित्त बाहेरगावी जावे लागल्यास साधकांना त्यांची अनुपस्थिती जाणवते. साधक प्रसाद किंवा महाप्रसाद ग्रहण करत असतांना साधकांची दृष्टी ‘पू. (सौ.) अश्विनीताई कुठे दिसतील ?’, या विचाराने नकळत त्यांचा शोध घेत असते. हेच ‘पू. ताईंचे वैशिष्ट्य आहे’, असे मला वाटते.

४. सर्वांवर वात्सल्यमय प्रीती करणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

कधी एखाद्या साधिकेची प्रकृती पुष्कळ बरी नसते. तिला थकवा आलेला असतो. त्या वेळी अकस्मात् तिची पू. ताईंशी भेट होते किंवा त्यांनी संबंधित साधकाची विचारपूस केलेली असते, तर कधी त्यांनी साधिकेला प्रेमाने जवळ घेतलेले असते किंवा तिच्या पाठीवरून हात फिरवलेला असतो. त्या क्षणी त्या साधिकेला होत असलेले त्रास दूर होतात. अशा प्रकारची अनुभूती माझ्यासारख्या अनेक जिवांनी घेतली आहे.

५. अहंशून्यता

‘देवद आश्रमातील ज्या खोलीत पू. (सौ.) अश्विनीताई सेवा करतात, त्या खोलीचे आकारमान वाढून तेथील प्रकाश आणि चैतन्य यांत वृद्धी झाली आहे’, असे मला जाणवते. याविषयी मी पू. ताईंना सांगितले असता त्या म्हणाल्या, ‘‘अहो ताई, येथे गुरुकार्य चालते ना !’  त्यामुळे असे जाणवते.’’

६. अनुभूती

पू. (सौ.) अश्विनी पवार दास मारुतीच्या मूर्तीचे दर्शन घेत असतांना ‘मारुतिरायाने त्यांना हात उंचावून आशीर्वाद दिला’, असे जाणवणे : देवद आश्रमातून दास मारुतीची मूर्ती शक्तीरथामधून (मोठ्या चारचाकी वाहनातून) रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पाठवण्यासाठी आश्रम परिसरात ठेवली होती. त्या वेळी पू. (सौ.) अश्विनीताई मारुतिरायाचे दर्शन घेण्यासाठी आल्या. त्यांनी मारुतिरायाला भावपूर्ण नमस्कार केला. त्या वेळी ‘मारुतिरायाने पू. (सौ.) अश्विनीताईंना हात उंचावून आशीर्वाद दिला’, असे मला जाणवले.

६ अ. या प्रसंगानंतर काही दिवसांनी माझी पू. ताईंशी भेट झाली. त्या वेळी मी पू. ताईंना याविषयी सांगितल्यावर पू. ताईंचा भाव जागृत झाला. तेव्हा मला पू. ताईंचा देवाप्रतीचा भाव अनुभवता आला.

७. कृतज्ञता

‘हे गुरुमाऊली, ‘आपण पू. (सौ.) अश्विनीताई आणि आश्रमातील सद्गुरु अन् संत यांच्या माध्यमातून आपले प्रतिरूपच प्रतिदिन अनुभवायला देता’, याबद्दल आम्ही सर्व साधक आपल्या चरणी शरणागतीने कृतज्ञता व्यक्त करतो. ‘ही सर्व सूत्रे सुचवून तुम्हीच लिहून घेतलीत’, याबद्दल तुमच्या कोमल चरणी शरणागतभावाने कोटीश: कृतज्ञता!’

– सुश्री (कु.) नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक