Ayodhya New Airport : ‘महर्षि वाल्मीकि अयोध्या धाम’ असे असणार अयोध्येतील विमानतळाचे नाव

आज पंतप्रधान मोदी करणार उद्घाटन !

‘महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथे बांधण्यात आलेल्या श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव पालटण्यात आले आहे. ‘महर्षि वाल्मीकि आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, ३० डिसेंबर या दिवशी अयोध्येत जाऊन या विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. याखेरीज अयोध्येच्या पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचेही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान मोदी या वेळी नवीन ‘अमृत भारत’ आणि ‘वन्दे भारत’ रेल्वेगाड्यांना  हिरवा झेंडा दाखवतील. ते राज्यातील १५ सहस्र ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या  अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

अयोध्येतील अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा १ सहस्र ४५० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ ६ सहस्र ५०० चौरस मीटर असेल, जे प्रतिवर्षी सुमारे १० लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी सज्ज असेल. टर्मिनल इमारतीचा पुढचा भाग अयोध्येतील आगामी श्रीराममंदिरासारखा दर्शवण्यात आला आहे. टर्मिनल इमारतीच्या आतील भागात स्थानिक कला, चित्रे आणि भगवान श्रीराम यांचे जीवन दर्शवणारी भित्तीचित्रे सजलेली आहेत.