‘मी घरी सेवा करतांना ‘साक्षात् गुरुमाऊलींच्या वैकुंठात (परात्पर गुरु डॉ. आठवले निवास करत असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात) सेवा करत आहे’, असा भाव ठेवते. त्यामुळे मला प्रत्येक कृती करतांना आनंद होतो. मला आलेल्या अनुभूती मी गुरुचरणी अर्पण करते.
१. भावाच्या स्तरावर केलेले प्रयत्न
१ अ.‘सूर्यनारायण घरी येणार आहे’, असा भाव ठेवून सिद्धता करणे : ‘मी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करते. मी दारासमोर रांगोळी काढते. ‘साक्षात् सूर्यनारायण घरी येणार आहे’, या भावाने मी त्याच्या स्वागताची सिद्धता करते.
१ आ. अग्निहोत्र करतांना ठेवलेला भाव : ‘प्रत्यक्ष श्री नारायण रथामध्ये बसून येत आहे’, असा भाव ठेवून मी प्रतिदिन सकाळी अग्निहोत्र करते. तेव्हा मला वातावरणात चैतन्य जाणवते.
१ इ.‘गुरूंना अपेक्षित अशी सेवा व्हावी’, या भावाने मी प्रत्येक कृती करते.
१ ई. वास्तूशुद्धी करतांना ठेवत असलेला भाव : मी प्रतिदिन वास्तूशुद्धी करतांना ‘घरात सर्वत्र गुरुमाऊलींचे अस्तित्व आहे’, असा भाव ठेवते. ‘त्यांना कोणताही त्रास होऊ नये’, यासाठी मी सात्त्विकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते.
२. अनुभूती
अ. मला घरातील प्रत्येक वस्तूकडे पाहून आनंद होतो. मला ‘प्रत्येक वस्तू गुरूंची सेवा करत आहे’, असे वाटते.
आ. ‘पहाटेच्या वेळी घरासमोरची वेगवेगळी झाडे आणि पक्षी घराकडे कृतज्ञताभावाने पहात नामजप करत आहेत’, असे मला वाटते.
इ. सकाळी तुळशीची पूजा करत असतांना ‘तुळशीमाता आनंदी असून ती हसत आहे’, असे मला वाटते.
ई. ‘घरासमोरच्या फुलझाडांवरील फुले गुरुचरणी अर्पण होण्यासाठी लवकर फुलत आहेत’, असे मला जाणवते.
उ. मला साधना करायला उत्साह येतो. मला काही वेळा ताण किंवा माझ्या मनात नकारात्मक विचार आल्यास माझा नामजप त्वरित चालू होतो. तेव्हा माझ्या मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात.
ऊ. ‘मारुतिराया या वैकुंठाचे रक्षण करण्याची सेवा करत आहे’, असे मला जाणवते आणि मला कृतज्ञता वाटते.’
– सौ. स्वराली उत्तम दवणे, सांखळी, गोवा. (३.२.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |