‘आमचे मूळ गाव सांगली आहे. तेथे माझे सासर आणि माहेरचे सर्व कुटुंबीय रहातात. आमचे पूर्वीपासून सर्वांशी चांगले संबंध आहेत. ४.८.२०२३ या दिवशी मी आणि माझे यजमान (पू. सदाशिव नारायण परांजपे) काही कामानिमित्त सांगलीला गेलो होतो. त्या वेळी कुटुंबियांना भेटण्यासाठी गेल्यावर आलेला अनुभव खाली दिला आहे.
१. जाऊबाई वार्धक्याने रुग्णाईत असल्याने स्मृतीभ्रंश होऊन रात्रंदिवस असंबद्ध बोलत असणे
मागील ४ वर्षांपासून सांगली येथील माझ्या चुलत जाऊबाई श्रीमती मंगला दामोदर परांजपे (वय ९३ वर्षे) वार्धक्याने रुग्णाईत होत्या. त्यांना सांगली येथील प.पू. राम (दास राम) गोविंद केळकर यांनी अनुग्रह दिला होता. त्या सतत नामजप करायच्या. माझ्या जाऊबाईंचे दोन भाऊ सज्जनगडावर समर्थ रामदासस्वामींच्या सेवेत असतात. त्यामुळे त्यांचे माहेरचे घराणे साधक वृत्तीचेच होते. त्यांच्या माहेरी सातार्याला श्रीविष्णूचे मंदिर आहे.
त्यांना वार्धक्यामुळे ४ वर्षांपासून स्मृतीभ्रंश झाला होता. त्यामुळे त्या रात्रंदिवस असंबद्ध बोलत असत. (मला वाटते, ‘त्यांच्यावर अनिष्ट शक्तींचे आक्रमण झाल्यामुळे त्या अखंड बोलत होत्या आणि साधनेपासून परावृत्त झाल्या होत्या.’) स्मृतीभ्रंश झाल्यामुळे त्या त्यावर मात करू शकत नव्हत्या आणि नामजपही करू शकत नव्हत्या.
२. शारीरिक आणि मानसिक व्याधींमुळे जाऊबाई भेटण्याच्या स्थितीत नसूनही त्यांना भेटायला जाण्याचे ठरवणे
आम्ही सांगलीला त्यांना भेटायला जायचे ठरवले. मी हे सर्व माझी मोठी मुलगी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना सांगितले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आई, त्यांना काही कळत नसले, तरी तुम्ही दोघे त्यांना भेटून या.’’ त्यांचा मुलगा श्री. संजय दामोदर परांजपे याला आम्ही त्यांच्याकडे येत असल्याचे सांगितले. तेव्हा तो मला म्हणाला, ‘‘काकू, तू आईला भेटायला येणार आहेस; पण ती भेटण्याच्या स्थितीत नाही. ती रात्रभर बडबड करते आणि दिवसा डोळेही उघडत नाही आणि काही बोलतही नाही. ती कुणाला ओळखतही नाही.’’ मी त्याला म्हटले, ‘‘त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. निदान आम्ही त्यांना पाहून तरी येतो. तेवढेच आम्हाला समाधान वाटेल.’’
३. जाऊबाईंना त्यांच्या गुरूंचे स्मरण करून दिल्यावर आणि प्रार्थना करण्यास सांगितल्यावर त्यांनी तशी प्रार्थना करणे
६.८.२०२३ या दिवशी आम्ही जाऊबाईंना भेटण्यासाठी गेलो. आम्ही तेथे गेल्यावर त्या झोपलेल्याच होत्या. मी त्यांना म्हणाले, ‘‘मंगलावहिनी, डोळे उघडा. कोण आले आहे, बघा. तुमचे लाडके भावोजी नंदाकाका (दीर, पू. सदाशिव परांजपे) आले आहेत आणि मी तुमची शैला (पू. (सौ.) शैलजा परांजपे). आम्ही तुम्हाला नमस्कार करतो.’’ एवढे म्हटल्यावर त्या डोळे मिटूनच ‘‘हो’’, असे म्हणाल्या. नंतर परात्पर गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले), तुम्हीच मला त्यांच्याशी पुढील संभाषण करायला शिकवले. मी त्यांना म्हणाले, ‘‘वहिनी, तुम्हाला प.पू. केळकर महाराज आठवतात का ? त्यांना प्रार्थना करा, ‘हे गुरुदेवा, मला तुमच्या चरणांशी घेऊन चला. हे रामराया, मला आता तुझ्या चरणांशी घेऊन चल.’ असे सांगितल्यावर आश्चर्य म्हणजे; त्या हे सर्व दोन वेळा बोलल्या. मी म्हटले, ‘‘वहिनी, श्रीराम, श्रीराम म्हणा.’’ त्याप्रमाणे त्या तसेच म्हणाल्या.
४. जाऊबाईंना अनिष्ट शक्तींच्या कह्यातून सोडवण्यासाठी प्रार्थना करणे आणि नंतरचे २ दिवस त्यांनी श्रीरामाचा जप करणे
त्यानंतर आम्ही त्यांच्यापुढे हात जोडून उभे राहिलो आणि देवाला प्रार्थना केली की, ‘हे परमेश्वरा, यांना या क्लेशातून मुक्त करा. यांना अनिष्ट शक्तींनी आपल्या कह्यात घेतले आहे. त्यामुळे पूर्वी त्या अखंड नामात असूनही त्यांना गुरु आणि देव यांचे विस्मरण झाले आहे.’ आपल्या शिष्याची काळजी गुरूंनाच असते. पुढे दोन दिवस त्या सारख्या ‘श्रीराम, श्रीराम’, असे म्हणत होत्या. भक्ताची काळजी देवालाच असते.
५. दोन दिवसांनी जाऊबाईंचे निधन होणे
आम्ही ६.८.२०२३ या दिवशी त्यांच्याकडे गेलो आणि ९.८.२०२३ या दिवशी त्यांचे निधन झाले. गुरुदेवा, आमचे माध्यम करून तुम्हीच त्यांना नाम घ्यायला आणि प्रार्थना करायला सांगितली. तुम्हीच त्यांना या नश्वर देहातून मुक्त केलेत.
६. प्रार्थनेतील शक्ती आणि तिचे महत्त्व लक्षात येणे
गुरुदेवा, ३ वर्षांपूर्वी आपल्या कृपेमुळेच आम्ही सांगली येथून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवेला आलो. त्या वेळी सांगली येथील आमच्या कुटुंबियांना हे पटले नव्हते. आम्ही त्यांना साधनेचे महत्त्व पटवून देत होतो; पण ते त्यांना पटले नाही. आम्ही जाऊबाईंना अंत्यसमयी प्रार्थना सांगितली आणि ती त्यांनी म्हटली. हे माझ्या पुतण्यांनी (श्री. संजय आणि श्री. विजय परांजपे) अनुभवले. नंतर दोन दिवसांनी जाऊबाईंचे निधन झाले. त्या वेळी माझे पुतणे आम्हाला म्हणाले, ‘‘काका-काकू, तुम्ही दोघे आलात आणि आईला प्रार्थना सांगितलीत; म्हणूनच तिची या क्लेशातून लवकर मुक्तता झाली.’’ यातून हे लक्षात येते की, ‘माणसाला अनुभूती आल्यावरच तो देवावर विश्वास ठेवतो. गुरु अशा अनुभूती देऊन मानवाला साधनेचे महत्त्व पटवून देतात.’ गुरुदेवा, यासाठीच ‘तुम्ही आम्हाला सांगलीला पाठवलेत’, असे मला वाटले.
‘गुरुदेवा, यावरून लक्षात आले की, देवाला कळकळीने हाक मारली की, लगेचच तो भक्ताच्या साहाय्याला धावून येतो. तुमच्यामुळे आम्हाला हे सगळे शिकायला मिळाले. हे गुरुदेवा, माझ्या जाऊबाई त्यांच्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे साधना करत होत्या. त्यांना अंतसमयी साधनेचा विसर पडला, तरी गुरुतत्त्व सगळीकडे एकच कार्य करत असल्यामुळे तुम्हीच त्यांचे गुरु झालात आणि त्यांना नामाची आठवण करून दिलीत, याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. गुरुदेव, तुम्हीच त्या वेळी आमच्याकडून योग्य प्रार्थना करून घेतलीत. प्रार्थनेतील शक्ती आणि तिचे महत्त्व किती आहे, याची तुम्ही अनुभूती दिली. तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– (पू.) सौ. शैलजा परांजपे, ढवळी, फोंडा, गोवा. (२०.८.२०२३)
|